गई बोले रे धिन्ना

लेखिका - आदिती मोराणकर : मुलांच्या भावविश्वाच्या चढउतारांचा वेध घेणारी लेखमाला -३०

0

आदिती मोराणकर

एखाद्याची पतंग कटली तर आनंदाने ओरडत, ‘कटलेली पतंग फक्त आपल्याला मिळावी’ या अपेक्षेने धावणारी लहान मुलं बघितली की दोन गोष्टी मनात येतात. एकीकडे त्यांचा उत्साह भारावून टाकणारा असतो मात्र दुसरीकडे “लहानपणापासूनच दुसऱ्यांच्या गोष्टींवर नजर ठेवून, ती गोष्ट आपल्याला लुटता कशी येईल?” हा विचार रुजु लागलेल्या या पिढीची चिंता वाटायला लागते. माझा पतंग उडवतांनाचा आनंद क्षणभरच टिकतो कारण पुढच्या क्षणी मनात विचार येतो की “आकाशात उंच भरारी घेत असतांना त्या पतंगाची दोरी दूर कुठे तरी खाली एका माणसाच्या हातात असते आणि तो माणूस पतंगाची दिशा आणि दशा ठरवत असतो. आपण पालकही मुलांना पतंगासारख वागवतो का ?”.

अलीकडेच घडलेल्या दोन घटनांवरून पालकांची ‘ढील देण्याची’ आणि ‘फिरकी आवळून ताब्यात ठेवण्याची’ प्रवृत्ती मला नव्याने जाणवली.पुण्यामध्ये आपल्या लहान मित्राबरोबर शाळेत जातांना चार वर्षाच्या मुलाचं अपहरण झालं. सुदैवाने आठवडाभराच्या प्रतीक्षेनंतर चार वर्षाचं ते बाळ सुखरूप आई वडिलांच्या कुशीत पोहोचलं. मात्र या घटनेने ‘आपल्या चार वर्षाच्या मुलाला पाठीवर दप्तर अडकवून शाळेत एकटं पाठवण्याची मानसिकता’ किती धोकादायक आहे हे अधोरेखित झालं. यालाच मी “ढिल देणं” म्हणते. मुलाच्या वयाचा, त्याच्या प्रकृतीचा, आजूबाजूच्या सामाजिक परिस्थितीचा अभ्यास न करता, कुठल्याही वयाच्या मुलाला कुठलीही गोष्ट करून बघण्याची मुभा देणं याला “ढील देणंच” म्हणता येईल ना?

दुसरी दुर्दैवी घटना एका वेगळ्याच पालक प्रवृत्तीवर भाष्य करते. इथे सोशल मीडियावर एका वडिलांनी लिहिलेली पोस्ट फिरत असते. ज्यामध्ये करूणायुक्त शब्दात ते वडील ‘माझं काय चुकलं?’ असा प्रश्न पोस्ट वाचणाऱ्यालाच विचारतात. ही पोस्ट वाचताना वाईट वाटतच होतं पण अगदी लहानपणी जर पालकांनी, विशेषतः आईने त्यांच्या मुलाकडे लक्ष दिलं असतं, त्याच्या जडणघडणीत येणाऱ्या सर्व चढ-उतारांचा नीट अभ्यास केला असता, त्याच्या स्वभावात होणाऱ्या हिंसक बदलांची वेळीच नोंद घेतली असती तर २२ वर्षाचा आपला तरुण मुलगा गमावल्याचं दुःख त्या वडिलांना असं वेशीवर टांगावं लागलं नसतं. वडील पोलीस खात्यात असल्याने त्यांच्या चिरंजीवांनी वयाच्या २२ व्या वर्षापर्यंत “माझं कोणी काही बिघडवू शकत नाही” या एकाच ब्रीदवाक्यावर अनेक वाईट कृत्य केली. दुर्दैवाने ती सगळी खूप उशिरा प्रकाशात आली पण जोवर या गोष्टी लक्षात आल्या तोवर मुलगा हाताबाहेर गेलेला होता.

त्यानंतर पालकांनी त्याला  सुधारगृहात ठेवण्याचा असफल प्रयत्न केला. तिथून बाहेर आल्यानंतर तो स्वतःच्या कर्माने सेंट्रल जेलची हवा खाऊन आला. त्याच्या वडिलांच्या शब्दात सांगायचं तर, “घरात मुलगा जन्माला येणे या एका आनंदापलीकडे  या नालायक मुलाने शेवटच्या श्वासापर्यंत आम्हाला इतर कुठलाही आनंद दिला नाही.” किती दुर्दैवी आहे, आपला २२ वर्षाचा मुलगा देवाघरी जातो आणि वडील मात्र “बरं झालं तो गेला कारण तो जगला असता तर समाजाला धोकाच होता” अशा शब्दात स्वतःच्या भावना व्यक्त करतात यापेक्षा वाईट काय असू शकतं?

खरंतर सुरुवातीला ‘पतंगाचा’ उल्लेख केला त्याचा संबंध मला या दोन्ही घटनांशी लावता येईल. पतंग हळूहळू वर जातो आणि वर गेल्यानंतर मात्र अचानक त्याच्यामध्ये आणि दुसऱ्या पतंगांमध्ये चढाओढ सुरू होते. ‘तुझा पतंग माझ्या पतंगापेक्षा वर कसा गेला?’ ही मानवी ईर्षा त्या आकाशात विहरणाऱ्या पतंगांचा मांजा कापु पाहते आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याचा एक खेळ सुरू होतो. मनाला गंमत देण्याइतपत या खेळाची मर्यादा राहिली तर त्याचा आनंद घेता येतो पण जर एखादा माणूस इरेला पेटला तर मात्र दुसऱ्याचा पतंग कापण्यासाठी तो कुठल्याही थराला जाण्याची तयारी करतो. त्यातच इतर पतंग ‘न’ उडवणारे ‘एखाद्याचा पतंग कधी कटतो आणि आपण जाऊन तो सगळ्यात आधी कसा लुटतो’ यासाठी सज्ज असतात.

आपल्याला पतंग उडवता येत असो, नसो, हा भाग अलाहिदा पण दुसऱ्याची कटलेली पतंग बघितल्यावर “गई बोले रे धिन्ना” असे मोठ्याने ओरडून आनंद व्यक्त करायचा आणि भरकटत खाली येणारी पतंग ‘लुटण्यासाठी’ रस्त्याने सैरावैरा पळत सुटायचं या मानसिकतेची ही पिढी जेव्हा पालकांच्या भूमिकेत जाते तेव्हा दुसऱ्यांच्या गोष्टीवर नजर ठेवण्याची लहानपणापासून लागलेली सवय  तसंच “आनंद वाटणं” आणि “आनंद लुटणं” यातला फरक लक्षात न आल्याने ते कधी आपल्या मुलांना जास्त ढिल देतात तर कधी गरजेपेक्षा जास्त फिरकी आवळून धरतात.

‘पतंग उडवणे’ या खेळाला माझा अजिबात विरोध नाही मात्र पालक म्हणून आपण कधीतरी आपल्या मुलांना या पतंगासारखा वागवतो का? हा विचार मनाला अस्वस्थ करतो आहे.

सई चार साडेचार वर्षाची असतांना असंच संक्रांतीच्या दिवसांमध्ये आम्ही मागे अंगणात बसलो होतो. मुलांचं पतंग उडवण्याचं प्रमाण आणि उत्साह थोडासा मावळला होता, तरीही आकाशात दोनेक पतंग दिसत होत्या.

सहज बसल्याबसल्या आपल्या लेकीशी गप्पा माराव्या या हेतूने मी सईला म्हटलं, “यातली एक पतंग तू आहे आणि एक पतंग मी आहे. तू सांग,तू कुठली पतंग आहेस?”

“मी ‘ती लाल’ पतंग आहे “ सई म्हणाली.

आकाशात पाहिलं तर लाल पतंग उंच उडत होती. तारेवर एक कटलेली पतंग लटकत होती. तिच्याकडे सईचं लक्ष वेधण्यासाठी मी मजेतच म्हटलं,”बरं मग ती तारेवर अडकली आहे ना, ती पतंग म्हणजे मी!”

आता सईला गंमत वाटत होती. ती खरोखरच ‘लाल पतंग’ असल्यासारखी अंगणात हात पसरून इकडून तिकडे पळत होती.

मी तिला म्हटलं,”लाल पतंग, तू किती छान उडते आहेस. मला तारेवर लटकून कंटाळा आलाय.”

“मग तू माझ्याबरोबर ये. आकाशातून खूप गंमत दिसते. तुला मज्जा येईल!” लाल पतंग अर्थात सई म्हणाली.“हो ? तू नेशील मला तुझ्याबरोबर?”

क्षणभर थांबून ‘लाल पतंग’ मला म्हणाली,”मी तिकडे तुझ्याजवळ आले की मी तुला घेऊन जाईल.” असं म्हणून हात पसरून ती माझ्यापासून अजूनच लांब पळाली. त्यानंतर थोड्या थोड्या वेळाने मी तिला “मला ने, मला ने  गं” अशी विनंती करत राहिले आणि लाल पतंग “थोडं थांब, थोडं थांब ना” म्हणत राहिली. बऱ्याच वेळानंतर मी कंटाळल्यासारखं दाखवत म्हणाले,”हे काय लाल पतंग? तू नुसतंच मला थांब-थांब म्हणतेस. तु मला नेतच नाहीयेस.”

त्यावर लाल पतंग म्हणाली,“अगं तुला समजतंय का? मी जरी इथे वर  उडत असले तरी माझी दोरी (मांजा शब्द तिला माहिती नव्हता)माझी दोरी दुसऱ्याच कुणाच्या तरी हातात आहे. मी नाही गं तुझ्याजवळ येऊ शकत!”

साडेचार वर्षाच्या मुलीचं हे उत्तर ऐकून डोळे लख्खकन् उघडले. आपली मुलं जेव्हा विविध क्षेत्रात त्यांची कामगिरी बजावत असतात, काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतात, त्यावेळी त्यांचा मांजा आपल्या फिरकीला गुंडाळलेला असतो. हा मांजा  योग्य प्रमाणात सोडला आणि योग्य प्रमाणात फिरकीला गुंडाळून ठेवला तरच त्यांची पतंग स्थिर रहात असते. नाहीतर कधी ती उंच जाते आणि दुसऱ्या क्षणाला खालीही येते.

पतंगाला उंची गाठण्यासाठी लागणाऱ्या तिन्ही गोष्टी म्हणजे आपण पालक! फिरकी, त्यातला मांजा आपणच असतो आणि पतंग हवेत उंच नेण्यासाठी स्थिर ठेवण्यासाठी लागणारा “योग्य वारा” ही आपणच!

आपल्या पतंगाची ‘फिरकी’ म्हणजे आपले कुटुंब, आपलं घर, घरातली माणसं! ही माणसं साधी, सरळ, प्रेमळ असतील तर ही फिरकी पतंगाला योग्य साथ देते. मात्र ही माणसं तर्कट, हेकट, रागीट असतील तर मांजा स्वतःकडे करकचून आवळून ठेवतात आणि पतंग कधीही मोकळा उडू शकत नाही. पतंगाला बांधलेला ‘मांजा’ म्हणजे आपली आपल्या मुलांशी जोडली गेलेली अदृश्य नाळ! ही नाळ तुटली तर नातं ‘पतंगासारखं’ भरकटतं. पतंगाला दिशा देणारा, स्थिरता देणारा वारा म्हणजे ‘आपले संस्कार’. एखाद्या परिस्थितीत किती वाहवत जायचं आणि किती स्थितप्रज्ञ रहायचं याचे संस्कारच आपल्या मुलांना स्पर्धेच्या युगामध्ये घरापासून लांब, आपल्या माणसांपासून दूर टिकवून ठेवतात.

मुलांना खूप मोकळीक देऊनही चालत नाही आणि मुलांचा ताबा स्वतःकडे ठेवूनही चालत नाही. शेवटी ते वाहणारं पाणी आहे. आपण फक्त हे ‘पाणी’ कुठे साचून त्याचं डबकं तर होत नाही ना? याकडे उघड्या डोळ्याने लक्ष द्यायला शिकल पाहिजे. पाण्याला वाहतं ठेवलं तर पाणी स्वतःची वाट आपोआप शोधतं. आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाहत रहाणारं पाणी ‘नितळ’ असतं. आपल्याही मुलांना ‘नितळ, निरामय’ बनवूया! दुसऱ्याची पतंग कटल्यानंतर त्यातला आनंद क्षणभर असला तरी तो आनंद ‘वाटून घ्यायचा असतो लुटायचा नसतो’ हे आपल्या मुलांना समजावून सांगूया. एखाद्याची पतंग कापण्याची ईर्षा ठेवण्यापेक्षा, त्याच्या पतंगीच्या बरोबरीने उडणारी आपली पतंग जास्तीत जास्त वेळ हवेत कशी राहील? याचा विचार करायला आपण मुलांना शिकवूया.

जेव्हा आपण आपली “मूल्यं” बदलू त्यावेळेला आपली मुलं “अमूल्य” होणार आहेत हे विसरू नका. यापुढे मुलांना किती “ढील द्यायची” आणि त्यांची “फिरकी किती आवळायची” याचं ‘गणित’ समजून घ्या म्हणजे आपल्या पतंगीचा “गई बोले रे धिन्ना” कधीच होणार नाही.

तुमच्या मुलांबद्दलचे प्रश्न तुम्ही ई-मेल किंवा व्हाट्सअप करून मला विचारू शकता. भेटूया मग पुढच्या सदरामध्ये एका नवीन विषयासह!

Aditi Morankar
आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)

आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)
संचालिका ईस्कुलिंग व्हर्च्युअल डिजीस्मार्ट किंडरगार्टन
eskooling2020@gmail.com | 8329932017 / 9326536524
https://www.instagram.com/theblooming.minds/

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.