नाशिकच्या भोंदू बाबावर पुण्यात गुन्हा दाखल 

महिलेची साडेतीन लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक

0

पुणे, दि. ३ जून : Nashik Fraud Case अंधश्रद्धेचा फायदा घेत एका महिलेची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलावर करणी करण्यात आली असून त्याच्या जीवाला धोका असल्याची भीती दाखवत नाशिकमधील एका भोंदू दाम्पत्याने तब्बल ३ लाख ९० हजार रुपये उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणी संबंधित दाम्पत्याविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला (वय ५३) आपल्या पती आणि मुलासह पुण्यातील लोहगाव परिसरात वास्तव्यास आहे. काही काळापासून तिच्या मुलाला मानसिक त्रास होत होता. त्यावर उपाय शोधत असताना २०२३ मध्ये त्याने समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ पाहिला. हा व्हिडीओ नाशिकमधील एका भोंदू दाम्पत्याने प्रसारित केला होता. व्हिडीओमधील दावे पाहून मुलाने संबंधित दाम्पत्याशी संपर्क साधला.

यानंतर आरोपी दाम्पत्याने फिर्यादीच्या कुटुंबाशी जवळीक साधली. काही दिवसांनी ते थेट त्यांच्या घरी पोहोचले. मुलाला ‘पिशाच्चबाधा’ झाली असून त्याच्यावर करणी करण्यात आली आहे, असा दावा त्यांनी केला. तसेच तातडीने विशेष अघोरी पूजा न केल्यास मुलाचा मृत्यू होऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी कुटुंबाच्या मनात निर्माण केली.भीती आणि संभ्रमाच्या अवस्थेत असलेल्या कुटुंबाने भोंदूंच्या सांगण्यावर विश्वास ठेवला. आरोपानुसार, महिलेला गुंगीचे औषध देण्यात आले आणि विविध धार्मिक विधी तसेच अघोरी पूजांच्या नावाखाली पैसे उकळण्यास सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला दोन लाख रुपये खर्च येणार असल्याचे सांगून रक्कम घेतली गेली.

Nashik Fraud Case त्यानंतरही आरोपींनी वेगवेगळ्या कारणांनी आणखी पैशांची मागणी केली. मुलावरील कथित बाधा पूर्णपणे दूर करण्यासाठी विशेष पूजा करावी लागेल, असे सांगत त्यांनी कुटुंबाला विविध ठिकाणी नेले. उज्जैन येथील स्मशानभूमीत विशेष विधी करणे आवश्यक असल्याचे सांगून तेथेही पूजा करण्यात आली. तसेच कोलकाता, जेजुरी आणि नाशिक येथे नेऊन वेगवेगळ्या धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले.

प्रत्येक वेळी मुलाच्या जीविताला धोका असल्याचे सांगून भीतीचे वातावरण निर्माण करण्यात आले. या भीतीपोटी महिलेकडून वेळोवेळी मोठ्या प्रमाणात पैसे घेतले गेले. अखेरीस या सर्व प्रकारात महिलेकडून एकूण ३ लाख ९० हजार रुपये उकळण्यात आल्याचे समोर आले आहे.

काळानुसार आरोपींच्या दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे फिर्यादी कुटुंबाच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. तक्रारीनंतर लोहगाव पोलीस ठाण्यात संबंधित भोंदू दाम्पत्याविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून आरोपींनी आणखी कोणाची फसवणूक केली आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. अंधश्रद्धा आणि भीतीचा गैरफायदा घेणाऱ्या अशा भोंदूंपासून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

समाजमाध्यमांवरील भ्रामक दावे, चमत्कारांच्या नावाखाली दिली जाणारी आश्वासने आणि अघोरी विधींमधून समस्या दूर होतात, अशा दाव्यांवर विश्वास ठेवू नये. कोणत्याही प्रकारची मानसिक, वैद्यकीय किंवा कौटुंबिक समस्या असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणेच योग्य असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!