कर्कायन -चला रोखूया कॅन्सर!’डॉक्टर्स ऑन ड्युटी’ची जनजागृती मोहीम नाशिकमध्ये १२ जुलैला

कर्करोगाविषयीची भीती दूर करत,प्रतिबंधात्मक उपायांवर केंद्रित अनोखा कार्यक्रम

0

नाशिक, दि.७ जुलै २०२५ – Cancer Awareness Program Nashik  कर्करोग… एक असा शब्द ज्याचा उच्चार झाला की अनेकांच्या मनात भीतीचे सावट पसरते. कारण अनेकांच्या मनात आजही ‘कॅन्सर म्हणजे मृत्यू’ हे समीकरण घट्ट बसले आहे. मात्र आधुनिक वैद्यकीय प्रगतीमुळे आज कर्करोगावर मात करणे शक्य झाले आहे. औषधोपचारांसोबतच मानसिक बळ, सकारात्मक दृष्टीकोन आणि योग्य जीवनशैली हे सर्व घटक यशस्वी उपचारांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. पण कॅन्सर होण्याआधीच त्याला अटकाव करता आला, तर? हेच ध्येय ठेवून ‘डॉक्टर्स ऑन ड्युटी’ टीमने एक आगळा-वेगळा जनजागृती उपक्रम राबवला आहे – ‘कर्कायन – चला रोखूया कॅन्सर!’

१२ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता, कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा सभागृहात हा जनजागृतीपर कार्यक्रम होणार असून, या वेळी नाशिकमधील चार नामवंत डॉक्टरांचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळणार आहे.

यात सहभागी असलेले डॉक्टर म्हणजे –(Cancer Awareness Program Nashik)

🔹 डॉ. विजय घाटगे – सीनियर फिजिशियन व नेफ्रोलॉजिस्ट
🔹 डॉ. नितीन घैसास – आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हृदयतज्ज्ञ
🔹 डॉ. चंद्रकांत संकलेचा – प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ
🔹 डॉ. विनिता देशपांडे – जीवनशैली मार्गदर्शक व काउंसलर

या चारही डॉक्टरांशी संवाद साधण्याचं माध्यम असणार आहे प्रसिद्ध जाहिराततज्ज्ञ श्री. नंदन दीक्षित, जे प्रेक्षकांच्या मनातील प्रश्न डॉक्टरांसमोर मांडणार आहेत.

‘कर्कायन’ या नावामागे दडलेला अर्थही लक्षवेधी आहे – ‘कर्क’ म्हणजे कॅन्सर आणि ‘आयन’ म्हणजे मार्ग. कॅन्सरकडे जाणारा मार्ग ओळखून, तो थांबवणं हेच या उपक्रमाचं प्रमुख उद्दिष्ट आहे.

कार्यक्रमामागील प्रेरणा व तयारी
मागील वर्षी याच टीमने “जीवनशैलीं आजारांना प्रतिबंध हाच उपाय” या विषयावर अत्यंत यशस्वी चर्चासत्र आयोजित केलं होतं, ज्याला नाशिककरांचा उदंड प्रतिसाद मिळाला. तेव्हापासून अशा कार्यक्रमांची मागणी वाढली आणि त्यातूनच ‘कर्कायन’ उपक्रमाची कल्पना साकार झाली. मागील ६-७ महिन्यांपासून ही टीम सातत्याने अभ्यास, संशोधन, चर्चा आणि इतर तज्ज्ञांशी संवाद साधत या विषयावर काम करत होती.

विशेष म्हणजे, सहभागी डॉक्टर हे कर्करोग तज्ज्ञ नसले तरी माणुसकीच्या भावनेतून आणि सामाजिक जबाबदारीतून ते हा विषय सादर करणार आहेत. त्यांची वर्षानुवर्षांची वैद्यकीय आणि सामाजिक अनुभवसंपन्नता हा कार्यक्रम अधिक प्रभावी बनवणार आहे.

जीवनशैली आणि कर्करोग – एक जवळचं नातं
सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण ज्या अनेक गोष्टींचा संपर्क घेतो, त्या नकळत आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम करत असतात. यामध्ये टूथपेस्ट, चहाचा कागदी कप, प्लास्टिक बाटलीतील पाणी, मिठाईमधले रंग, केकचे घटक अशा असंख्य गोष्टी कर्करोगास कारणीभूत ठरू शकतात. त्याचबरोबर व्यायामाचा अभाव, तणावपूर्ण जीवन, चुकीचे आहारविहार आणि झपाट्याने बदलणारी जीवनशैली या सर्व गोष्टीही कर्करोग वाढण्याला कारणीभूत ठरतात.

म्हणूनच कर्करोगावर उपचारांपेक्षा प्रतिबंध महत्त्वाचा आहे. ‘कर्कायन’ कार्यक्रमातून या सर्व बाबींचं सखोल विश्लेषण होणार आहे. आरोग्याविषयी जागरूक असलेल्या प्रत्येक व्यक्तीने या कार्यक्रमाला उपस्थित राहणं गरजेचं असल्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे.

कार्यक्रमासाठी पाठिंबा
‘कर्कायन’ या उपक्रमाला हर्ष कन्स्ट्रक्शन, नूतन इंडेन, सन फार्मास्युटिकल्स, दातार डायग्नोस्टिक्स, लुपिन फार्मा आणि लोकमान्य बँक यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांचं प्रायोजकत्व लाभलेलं आहे. तसेच नाशिकमधील अनेक डॉक्टर, उद्योजक आणि नागरिकांचे मोलाचे सहकार्यही मिळाले आहे.

या कार्यक्रमात वैद्यकीय मार्गदर्शनासोबतच व्यक्तिगत सवयी, बदल आणि प्रतिबंधात्मक उपाय या सर्व घटकांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. नाशिककरांनी या अनोख्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असा संदेश आयोजकांनी दिला आहे.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!