‘बहरला हा मधुमास नवा’
लेखिका - आदिती मोराणकर,बालक पालक नात्यावर आधारित बाल मानसशास्त्र व संगोपन लेखमाला : ३२
‘बहरला हा मधुमास नवा’ हे ट्रेन्डींग गाण्यावर चालू असलेले रील तुम्ही बघितले असतीलच. मोजक्या हालचाली आणि एका सिग्नेचर स्टेप वर संपणार हे रील बघताना आपल्याला मजा वाटते पण हे रील कुणीही केलं, कुठेही केलं तरी त्यात ‘तोच तोच पणा’ आहे, एक दुसऱ्याची कॉपी आहे याचा आपल्याला राग येत नाही किंबहुना आपणही हळूच मोबाईल कोपऱ्यात ठेवून एकदा तरी या गाण्यावर इतरांची कॉपी करून रील बनवण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारच्या सामाजिक कॉपीकडे आपण डोळे झाक करतो मग मुलांनीच दुसऱ्यांची कॉपी केली तर आपल्याला का राग येतो?
मागचा लेख वाचून खूप चांगले प्रतिसाद आले. अशोक मानकर काकांचे मी विशेष आभार मानते. शिक्षण क्षेत्रातील एका ज्येष्ठ व्यक्तीने लेख वाचून होताच फोन करून मन भरून कौतुक केलं आणि तो क्षण मनावर कोरला गेला!
मी मांडलेले विचार पालकांना आवडत आहेत, त्यातून त्यांचं आणि मुलांचं नातं बहरतं आहे, याचा मला मनापासून आनंद वाटतो. तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छा कायम सोबत राहू देत. त्या शुभेच्छा मनात ठेवूनच आजच्या विषयाला हात घालते आहे.
आपल्या आजूबाजूला चाललेले किंवा घडत असलेले हे प्रसंग एखाद्या रियालिटी शो पेक्षा कमी नाहीत. आपलं मूल जणू काही एखाद्या रियालिटी शोमध्ये परफॉर्म करत आहे आणि जर त्यांनी परफॉर्म केलं नाही तर त्याचं “एलिमिनेशन” होणार आहे ही भीती पालकांना सतत वाटत असते.
पालक म्हणतात हे स्पर्धेचे युग आहे. त्यांची मुलं स्पर्धेत मागे पडायला नको म्हणून पालकांमध्येच स्पर्धा लागलेली दिसते. स्पर्धेमुळे मुलांच्या जगण्यातला आनंद संपून गेला आहे. “मुलं अतिशय तणावाखाली आहेत” याची जाणीव पालकांनाही असते मात्र आत्ता, या स्पर्धेत जर आपलं मुलं हरलं तर आयुष्याच्या रेसमध्ये ते कसे जाऊ शकेल ही भीती बाळगून पालक मुलांना त्याही अवस्थेत स्पर्धेतून बाहेर पडू देण्यास नकार देतात. यामुळेच मुलं प्रचंड दडपणाखाली असतात. छोट्या छोट्या नैसर्गिक गोष्टींचा आनंद देखील मुलं घेऊ शकत नाहीत.
माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक पालकांना मी नेहमी एक गोष्ट सांगते की, “देवाने तुम्हाला हातीपायी धड, दिसायला बरं, मेंदूनी ठीक ठाक मूल दिलेल आहे याचा आनंद माना आणि टक्केवारीच्या चक्रव्यूहात मुलाला न अडकवता त्यांना जगण्याचा आनंद घेऊ द्या!” पण बहुतांश पालक हे सगळं ऐकण्याच्या मनस्थितीतच नसतात. त्यांची सतत तुलना चालू असते. “तुला अजून का जमत नाही? त्याने हे करून दाखवलं, त्याचा तू प्रयत्न तरी केलास का?” या संवादा पलीकडे “तू आज जे काही केलंस, तो प्रयत्न छान होता. पुढच्या वेळेला अजून छान कर.” असे म्हणणारे पालक बोटावर मोजण्याइतकेच भेटतात.
अहो, प्रत्येक मुलाची आवड वेगळी आहे, बुद्धिमत्ता वेगळी आहे आणि मुलांचे हे वेगळेपण पालक म्हणून आपणच जपायला हवं. ‘बहरला हा मधुमास नवा’ हे ट्रेन्डींग गाण्यावर चालू असलेले रील तुम्ही बघितले असतीलच. मोक्या हालचाली आणि एका सिग्नेचर स्टेप वर संपणार हे रील बघताना आपल्याला मजा वाटते पण हे रील कुणीही केलं, कुठेही केलं तरी त्यात ‘तोच तोच पणा’ आहे, एक दुसऱ्याची कॉपी आहे याचा आपल्याला राग येत नाही किंबहुना आपणही हळूच मोबाईल कोपऱ्यात ठेवून एकदा तरी या गाण्यावर इतरांची कॉपी करून रील बनवण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारच्या सामाजिक कॉपीकडे आपण डोळे झाक करतो मग मुलांनीच दुसऱ्यांची कॉपी केली तर आपल्याला का राग येतो? खरंतर मुलं तूमच्या अपेक्षा पुर्ण करण्यासाठी, तुम्हाला खुश करण्यासाठीच कॉपी करत असतात. आपल्या मुलांनी काहीतरी वेगळं केलं तर आपल्याला ते चालतच नसतं कारण आपल्याला त्यांनी चौकट मोडायला नको असतं.
तुमची मुलं चारचौघांत ‘वेगळी’ दिसावी असं तुम्हालाच वाटतं नसतं. समजा तुम्ही एखाद्या नर्सरीत गेलात, म्हणजे ‘झाडांच्या नर्सरीत’ आणि आजूबाजूला फक्त गुलाबाचीच रोपं दिसली तर तुम्हाला तिथे थांबवसं वाटेल? काही काळ तुमचं मन रमेलही कदाचित पण नंतर मात्र नजर फिरवाल तिकडे गुलाब बघून तुम्हालाही कंटाळाच येईल. असंच आपल्या आजूबाजूला असलेली सगळी मुलं सारखीच झाली, सारख्याच गुणवत्तेची झाली, सारख्याच स्वभावाची झाली तर विभिन्नता कुठे राहील? आनंद कसा मिळेल? जर नर्सरी झाडांची असेल तर तिथे विविध प्रकारची, विविध रंगांची, आकाराची, सुवासाची, फुलं -फुल झाडं असायला हवेत ना? प्रत्येकाने ‘मला गुलाबच हवा’ असा अट्टाहास का धरावा? आणि जर तुम्हाला गुलाबच हवा असेल तर त्याचे टोचणारे काटे सहन करूनही त्या गुलाबाला खत पाणी घालण्याचं काम करणं पालक म्हणून तुम्हाला जमणार आहे का?
आपण लावून दिलेल्या रेसमधून मुलांनी बाहेर पडलेलं सुद्धा आपल्याला आवडत नाही. खरंतर आपल्याला एखादी गोष्ट जमली नाही की आपण त्याचा दुसऱ्यांदा साधा प्रयत्नही करत नाही पण मुलांनी मात्र याची त्याची कॉपी करून का होईना रेस पूर्ण करायलाच हवी हा आपला हट्ट असतो. ‘आपली मुलं आदर्श म्हणून आपल्याकडे बघत आहेत’ हे कधीही विसरू नका, कारण तुम्ही जसं वागता ते आई-बाबा म्हणून बरोबरच आहे हा दृष्टिकोन घेऊन मुलं चालत असतात आणि म्हणूनच तुमचं त्यांच्यासमोर थकणे, हारणे हे त्यांच्या विकासाला मारक ठरतं.
मुलांना काय हवं? काय नको? त्यांना काय करायला आवडतं? त्यांची स्वप्न काय आहेत? याचा विचार पालक म्हणून आपण करतो का? तुम्ही म्हणाल, “काय हवं नको हे आम्ही 24 तास बघतो. एक पेन्सिल किंवा पेन संपण्याच्या आत दुसरा त्याला आणून दिलेला असतो. शूज फाटण्याच्या आत दुसरा जोड आलेला असतो. कपडे तर ढीगभर आहेत, कपाट उघडलं की कपड्यांचा पाऊस पडतो. हॉटेलिंग, पिक्चर, फिरायला जाण हे तर कायमचं ठरलेलंच आहे मग अजून काय बघायला हवं?”
हे सगळं तुम्ही करता यात वाद नाही पण हे सगळं करत असताना तुमचं मूल मनातून आनंदी आहे की नाही हे तुम्ही तपासता का? आपलं मूल हुशार नाही म्हणून त्याला सतत टोमणे मारायचे, त्याच्यावर जबरदस्ती करायची, तो दुसऱ्यांपेक्षा कसा कमी पडतो हे दाखवून द्यायचं आणि मग त्याला मुलामा लावण्यासाठी हॉटेलमध्ये खायला न्यायचं, फिरायला जायचं, याचा ‘शून्य’ उपयोग होतो. मुलांना जोर जबरदस्ती करून शिकवता येत नाही. शिकण्याची उर्मी मनात तयार झाली की मुलं आपोआप शिकतात आणि म्हणूनच ‘शिकवण्याआधी ते शिकण्याची गरज’ मुलांमध्ये निर्माण व्हायला हवी.
तुम्ही तासंतास कष्ट करून मुलांसाठी एखादा गोड पदार्थ बनवता आणि मुलासमोर ठेवता त्यावेळेला मुलाच्या पोटात भूक नसेल तर चूक तुमचीही नाही आणि मुलाचीही नाही. चुकली आहे ती वेळ! मुलाच्या भुकेच्या वेळेला जर तुमचा पदार्थ तयार असता तर मुलांनीही भूक लागली म्हणून दोन घास जास्त खाल्ले असते आणि तुमच्या मेहनतीचा विजय झाला असता पण तो पदार्थ सजवण्याच्या नादात तुम्ही गरजेपेक्षा जास्त वेळ घेतला आणि खूप भूक लागली म्हणून समोर येईल ते खाऊन मुलांनी पोट भरून घेतलं तर तुमच्या पदरी नाराजीच येणार आहे. याचाच अर्थ मुलाला ज्यावेळेस जी गोष्ट शिकण्याची भूक असेल त्यावेळेस ते शिक्षण, ते ज्ञान देण्यासाठी पालकांनी जागरूक असायला हवं. शिक्षणाचा पसारा मांडून ‘आता यातून तुला जे पाहिजे ते खा’ असं म्हटलं आणि मुलाला शिक्षणाची भूकच नसेल तर समोर मांडलेलं ज्ञान हे फक्त “पसाराच” बनुन राहतं.
प्रत्येक मुलामध्ये सृजनात्मक विचार असतात. आपण मुलांचं बोलणं नीट ऐकलं तर ते लक्षातही येतं. कालच सेटवर सखू आणि उमा आत्या (आपल्या झी मराठीवरच्या यशोदा मालिकेतल्या कलाकार) बोलत होत्या. उमाचं वय १८ वर्ष आणि सखूचं 4 वर्ष ! सखुचे बाबा काल सेटवर आले होते आणि सखू त्यांच्या मांडीत बसून त्यांच्या केसांच्या छोट्या छोट्या वेण्या घालण्याचा प्रयत्न करत होती, तेव्हा उमाने तिला बाबांबरोबरचे तिचे फोटो दाखवले, ज्यात उमासुद्धा तिच्या बाबांच्या वेण्या घालून वेगवेगळ्या पोज मध्ये फोटो क्लिक करत होती. दोघींचं वय वेगळं असलं तरीही आतली ऊर्जा आणि बाबांवरचं प्रेम सारखंच होतं. निरागस सखुची बडबड चालू होती आणि बोलता बोलता ती नाचत होती. अचानक थोडासा पाय घसरून ती पडेल की काय असं वाटलं आणि तिचा बाबा म्हणाला, “अग तोंडावर पडशील मग धुळ लागेल तोंडाला… मी लहान असताना मी पण असाच मातीत तोंडावर पडलो होतो.” त्यावर कसलाही विचार न करता सखू पटकन म्हणाली, “तुम्ही मातीत तोंडावर पडले म्हणून तुम्हाला दाढी उगवायला लागली का?” हा किती निरागस प्रश्न आहे. मातीत काही पडलं तर ते उगवतं आणि ‘बाबा तोंडावर मातीत पडला म्हणून आता त्याच्या तोंडावर दाढी उगवते आहे’ हा विचार ही लहान मुलं करू जाणे !
मुलांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं तरी या सृजनाचा आनंद आपल्यालाही घेता येतो. सखुशी गप्पा मारताना तिच्या वडिलांनी ‘मी लहानपणी पडलो’ ही आठवण शेअर केली आणि त्यातूनच पुढची विनोद निर्मिती झाली, सखूच्या विचारांची ‘सुपीकता’ आमच्या लक्षात आली. आपण मुलांशी मोकळेपणाने बोलायला हवे. मुलांच्या मनाला, त्यांच्या मताला किंमत द्यायला हवी. आपण मुलांच्या मताला किंमत दिली की मुलांना पालक हवे हवेसे वाटू लागतात. कदाचित आपण आज जे करतो आहे त्याचे परिणाम लगेच दिसणार नाहीत पण काही वर्षानंतर ही मुलं जेव्हा मोठी होतील आणि तरीही तुमच्याशी ‘कनेक्टेड’ राहतील, तुमच्या मतांचा आदर करतील, त्यावेळेस तुम्हाला त्यांचे लहानपणीचे दिवस आठवतील आणि तुम्ही त्यांना लहानपणीच निर्णयक्षमता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि इतरांच्या मतांचा आदर करायला शिकवलं याचा तुम्हाला अभिमानच वाटेल.
मुलांना अनुभवातून शिकायला खूप आवडत असतं. शून्य ते आठ वर्षातल्या मुलांचा कल प्रत्येक गोष्ट स्वतः करून बघण्याकडे असतो. मुलांच्या मेंदूत विविध पेशींची जुळणी होत असते. केलेल्या क्रियेतून त्यांचा मेंदू अधिक कार्यरत होतो आणि त्यांचे अनुभव पक्के होतात. जी मुलं टीचर टीचर खेळतात त्यांना एका गटाचे नेतृत्व करण्याची आवड आहे हे लक्षात घ्यावं. जी मुलं जेवण वाढताना आईबरोबरच पाट-पाण्याची तजवीज करतात त्यांचे सामाजिक भान उत्तम होणार आहे याची खात्री बाळगावी. जी मुलं आल्या गेल्या पाहुण्यांसमोर न लाजता उभी राहतात तेव्हा त्यांना आत्मभान आलेले आहे याचा आनंद बाळगून कृपया त्यांच्या कलागुणांचं, त्यांच्या कवितांच प्रदर्शन मांडायला त्यांना भाग पाडू नका. तुम्ही जेव्हा जेव्हा मुलांना आलेल्या पाहुण्यांसमोर ‘अमुक कविता म्हणून दाखवा बाळा’ असं म्हणता ना, तेव्हा प्रत्येक वेळेस एक प्रकारच्या वधु परीक्षेच्या अनुभवातून मुल जात असतं. “जमलं तर कौतुक होईल पण जर नाही जमलं तर मात्र पाहुणे गेल्यावर आपली खैर नाही’’ या विचारानेच मूल गर्भगळीत होऊन जातं. अशा वेळेला आपलं मूल नक्की कस आहे आणि त्याचे किती प्रदर्शन मांडावं हेही पालक म्हणून आपल्याला समजायला हवं. आपली मुलं आपल्याला प्रिय असतातच. त्यांच्या काळजीपोटीच आपण सगळं करत असतो, मग ही काळजी आपल्या वागणुकीतून मुलांना दिसते का?
यापुढे आपल्या काळजीची त्यांना जाणीव होईल, ही काळजी मुलांना समजेल याची तुम्ही ‘जाणीवपूर्वक काळजी घ्या’ मुलांना कमी लेखू नका. उत्क्रांतीच्या नियमानुसार दर दहा वर्षांनी येणारी पुढची पिढी ही अधिकाधिक हुशारच जन्माला आलेली असते आणि त्यांची ही हुशारी सिद्ध करण्यासाठी, वाढवण्यासाठी त्यांना त्यांच्या पद्धतीने व्यक्त होऊ द्या. हालचालींची, बोलण्याची, शब्दांची ,भावनांची मोकळीक द्या नाहीतर प्रत्येकाच आयुष्य ‘बहरला हा मधुमास नवा’ सारखं होऊन एका सिग्नेचर स्टेप वर संपून जाईल. परत भेटूया पुढच्या लेखात धन्यवाद!
आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)
संचालिका : ईस्कुलिंग व्हर्च्युअल डिजीस्मार्ट किंडरगार्टन.
eskooling2020@gmail.com | 8329932017 / 9326536524
![Aditi Morankar](https://janasthanonline.com/wp-content/uploads/2021/07/Aditi-Morankar.jpg)
उत्तम अभ्यापूर्वक लेख आणि तोही अगदी सोप्या भाषेत!