नाशिक,२सप्टेंबर २०२२ – नाशिक शहरा सह जिल्ह्यात काल सायंकाळी जोरदार पाऊस झाला.नाशिक जिल्ह्यातील सिन्नरतालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन तब्बल १६५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. शिवाय या पावसात हजारो हेक्टर वराळ पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सिन्नर मध्ये .मुसळधार पावसामुळे सरस्वती नदीला मोठा पूर आला हे पाणी बाजारपेठेत शिरल्याने या पुरात २५ ते ३० जण अडकले होते.पाण्यात अडकलेल्या या नागरिकांना स्थानिक नागरीक आणि प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या साह्याने सुखरूप बाहेर काढले. अचानक पाणी बाजारपेठेसह घरात शिरल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
काल रात्री झालेल्या मुसळधार पाऊसामुळे सिन्नर शहरातील भैरवनाथ मंदिरासमोरील सरस्वती नदीलगतच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांमध्ये पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. तर तालुक्यातील दापूर येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधील पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे.दरम्यान मागील दोन दिवसांपासून सिन्नर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु असून पहिल्या दिवशी ८० मिमी तर दुसऱ्या दिवशी १२५ मिमी तर काल रात्री तब्बल १६५ मिलीमीटर पावसांची नोंद करण्यात आली आहे. एकूणच या पावसाने सिन्नरकरांची दाणादाण उडवली असून सिन्नरच्या सरस्वती नदीला पूर आला आहे.