मुंबई – विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आजही विरोधक सरकारवर चांगलेच आक्रमक झाले होते. विधानसभेचे कामकाज सुरु होण्याआधी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केले. यावेळी त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
अधिवेशन म्हटलं की टोलेबाजी आणि जुगलबंदीचा खेळ हा ठरलेला असतो. यात नाव न घेता एकमेकांवर प्रहार देखील केले जातात. अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच असतात , काही प्रश्नांवर आक्रमकपणे तर काही प्रश्नांवर हसत खेळत टोलेबाजी करत सरकारकडून उत्तरं काढण्याचा प्रयत्न केला जातो. आज दुसऱ्या दिवशी अशीच जुगलबंदी रंगली ती छगन भुजबळ आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात. विषय होता दाढीचा. तो ही राज्यातील काळ्या दाढीचा आणि केंद्रातील पांढऱ्या दाढीचा. भुजबळ आणि फडणवीसांची ही जुगलबंदी पाहून सभागृहात वातावरण हलके फुलके झाले.
एका चर्चेदरम्यान भुजबळ यांनी दाढीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चिमटा काढला. भुजबळांनी म्हटलं की, तुम्ही मुख्यमंत्री झालात ते मला चांगलं वाटलं. वेगळ्या पद्धतीनं मला चांगली गोष्ट वाटते कारण की हे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिले दाढीवाले मुख्यमंत्री आहेत. पण यांची काळी दाढी आहे. त्यांचा प्रभाव हा महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. पण त्यातही सफेद दाढी आणि काळी दाढी हा फरक आहे. सफेद दाढीचा प्रभाव हा हिंदुस्तान भर आहे, असं भुजबळ म्हणताच सभागृहातील इतर सदस्यांनी त्याला हसून दाद दिली !