नाशिक – इंडियन ऑर्थोपेडिक असोसिएशन या अस्थिरोग तज्ञांच्या राष्ट्रीय संघटनेची वार्षिक परिषद नुकतीच गोवा येथील डॉ. शामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे संपन्न झाली. २१ ते २५ डिसेंबर दरम्यान आयोजित या परिषदेस देशभरातून साडेसहा हजारहून अधिक अस्थिरोग तज्ञ सहभागी झाले अशी माहिती परिषदेचे सहयोजक, तथा महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेचे उपाध्यक्ष, नाशिकमधील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. संजय धुर्जड यांनी दिली.
इंडियन ऑर्थोपेडिक असोसिएशनची वार्षिक परिषद दर वर्षी देशाच्या विविध शहरांमध्ये आयोजित केली जाते. महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेला गेल्या वर्षीच्या परिषदेचे यजमानपद बहाल झाले होते. परंतु, कोविड महामारी व लॉकडाऊन मुळे मुंबई येथे नियोजित असलेली परिषद ऐन वेळी गोव्याला हलविण्यात आली. गोवा सरकार, आरोग्य विभाग तसेच गोवा मेडिकल कॉलेज यांच्या सहकार्याने ही परिषद आयोजित करण्यात आली.
परिषदेचे उदघाटन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते, तसेच राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बी. शिवशंकर, महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. अजित शिंदे, गोवा मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. बांदेकर, तसेच परिषदेचे मुख्य आयोजक सचिव डॉ. राम चढ्ढा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले, असे डॉ. धुर्जड यांनी सांगितले.
अधिक माहिती देतांना त्यांनी सांगितले की पाच दिवस चाललेल्या या परिषदेस साडेसहा हजाराहून अधिक अस्थिरोग तज्ञांनी सहभाग नोंदवला. या परिषदेत शैक्षणिक, वैज्ञानिक तसेच संशोधनपर व्याख्यानांनसह विविध कार्यशाळा आणि व्यावसायिक कंपन्यांचे प्रदर्शन आयोजित केले गेले. शास्त्रोक्त ज्ञानाचे आदानप्रदान करण्यासाठी वार्षिक परिषद आयोजित केली जाते. तसेच संघटनेचे कारभार करत असतांना कार्यकारिणीची बैठक तसेच सर्व सदस्यांची वार्षिक सर्वसाधारण सभाही यावेळी आयोजित केली जाते. नाशिकमधील अनेक अस्थिरोग तज्ञांनीही या परिषदेस हजेरी लावली. कोविडच्या तिसऱ्या लाटेची सावट असल्याने कोविड संदर्भातील सर्व प्रतिबंधात्मक व खबरदारीच्या उपाययोजना पाळून सदर परिषद आयोजित केली गेली.
डॉ. धुर्जड हे महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेचे उपाध्यक्ष तसेच या परिषेदेचे सह-आयोजक सचिव म्हणून काम बघितले. गेल्या दोन वर्षांपासून राज्य संघटनेचे काम करतांना अनेक स्तुत्य उपक्रम राबविले गेले, तसेच संघटनेचे कार्य सुलभ करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. नाशिकला पहिल्यांदाच असा बहुमान मिळाला असून, परिषद यशस्वीपणे पार पडल्याने नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रातून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे. त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय स्तरावरील परिषद झाल्याने त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांना महत्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्या कारकिर्दीची सांगता राष्ट्रीय परिषदेच्या यशस्वी आजोजनाने झाल्याने भविष्यात आणखी मोठी जबाबदारी घ्यावी अशी इच्छा अनेक डॉक्टरांनी व्यक्त केली.