कोरोना बॅच

4

आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)

या वर्षी दहावीच्या मुलांना मिळालेले यश हे शापीत आहे. त्यांना मिळालेल्या यशाचे श्रेय कोणीही मुलांच्या मेहनतीला देत नाहीये. एका “म्युट” जनरेशनचा निकाल काल लागला आणि आपण आजही त्यांना “म्युट”  ठेवायला बघतोय. त्यांना व्यक्त होण्याची संधीच आपण देत नाहीये कारण त्यांचे यश हे त्यांच्या मेहनतीने मिळाले आहे हेच आपण मान्य करत नाहीये.

“आई, एक तासानी माझा निकाल लागणारे!” बारा वाजता घड्याळ बघून सईने मला सांगितलं.

“आई, आता पंधरा मिनिटे राहिली आहेत” घड्याळात वाजले होते 12:45!

“आता २ मि. राहिले फक्त” 12:58 झाले होते.

सईचा उत्साह बघून मला माझ्या दहावीच्या निकालाचा दिवस आठवत होता पण माझ्या दहावीमध्ये आणि माझ्या लेकीच्या दहावीमध्ये जमीन-अस्मानाचं अंतर होतं. गेल्या वर्षभरात तिने काय काय सहन केलंय हे मी शब्दात नाही सांगू शकत. दुपारी  १ वाजे पासून साइटवर लॉगीन करण्याचा प्रयत्न चालू होता. शेवटी समजलं कि निकालाची वेबसाईट क्रॅश झाली. म्हणजे गमतीने सांगायचं तर दहावीतले विद्यार्थी तर पास झाले पण वेबसाईटच नापास झाली.

खूप वेळ वाट बघून शेवटी एकदाचा लागला बाबा  निकाल! माझ्या लेकीला 81.20 %  मिळाले.  खरंतर आत्तापर्यंत आम्ही सईचं यश टक्क्यांमध्ये किंवा श्रेणीमध्ये कधीच मोजलं नाही पण आपल्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये टक्केवारीला महत्त्व असल्याने आणि दहावी हे त्यातल्या त्यात एक महत्वाचं वर्ष असल्याने आमच्या व्यतिरिक्त इतरांनाच ‘सईला किती टक्के मिळाले’ हे जाणून घ्यायची उत्सुकता होती. सईला अनेक वर्षांपासून ओळखणाऱ्या आणि तिची जिद्द ठावुक असलेल्या लोकांनी सईचं खुपच कौतुक केलं. तिचं नाटक, सिरियल्सचं शूटिंग, लिखाण, कथ्थक, चित्र काढणं, आर्ट अँड क्राफ्टच्या वस्तू तयार करणं या सगळ्यातून वेळ काढून तिने अभ्यास केला व हे यश मिळवलं याचं सगळ्यांनाच कौतुक होतं‌. “इतकं सगळं करून इतके छान मार्क्स मिळाले ,शाब्बास सई” हे बहुतेक सगळ्यांचं कॉमन वाक्य होतं. मात्र तिच्या मित्र-मैत्रिणींना फोन केल्यानंतर तिचा मूड थोडाथोडा बदलत गेला. सगळ्यांना चांगले गुण  मिळाले होते पण त्या गुणांना वेगवेगळ्या प्रकारचे लेबल लागले होते. तिचे मित्र मैत्रिणी त्यांना मिळालेल्या कमेंट्स तिला सांगत होते आणि ते ती माझ्याशी मनमोकळ्या पद्धतीने  शेअर करत होती.

एकंदरीतच सगळ्यांच्या बोलण्यातुन एक गोष्ट जाणवली कि या वर्षी दहावीच्या मुलांना मिळालेले यश हे शापीत आहे. त्यांना मिळालेल्या यशाचे श्रेय कोणीही मुलांच्या मेहनतीला देत नाहीये. बदलत्या परिस्थितीनुसार, बदलत्या काळाबरोबर स्वतःला बदलणं किती अवघड असतं याचा अनुभव आपण सर्वांनी घेतला. आपल्यापेक्षाही जास्त बदलांना या मुलांना सामोरं जावं लागलं. एकतर दहावीचं वर्ष त्यात बदललेली शिक्षण पद्धती, डोळ्यासमोर शिक्षक नाहीत, आजूबाजूला समजावुन सांगणारे मित्र मैत्रिणी नाहीत, क्लासमध्ये शिक्षकांसमोर जाऊन बसण्याची मुभा नाही, अडलेले प्रश्न विचारण्यासाठी शिक्षक उपलब्ध नाहीत, जे काय प्रश्न आहेत ते सगळे त्या ऑनलाइन लेक्चर मध्ये विचारायचे , त्यातही शिक्षकांनी म्युट रहायला सांगितलं असेल तर प्रश्न विचारण्याची सोयच नाही. या “म्युट” जनरेशनचा निकाल काल लागला आणि आपण आजही त्यांना “म्युट”  ठेवायला बघतोय. त्यांना व्यक्त होण्याची संधीच आपण देत नाहीये कारण त्यांचे यश हे त्यांच्या मेहनतीने मिळाले आहे हेच आपण मान्य करत नाहीये.

पूर्ण वर्ष दहावीच्या मुलांनी कसं काढलं असेल याची आपण कोणीच कल्पना करू शकत नाही. सगळीकडे अनिश्चितता, शाळेत जाता येणार आहे की नाही? माहित नाही ! शाळेत गेलो तरी अभ्यासक्रम पूर्ण होणार आहे की नाही? माहीत नाही! अभ्यासक्रम पूर्ण न करता बोर्डाची परीक्षा कशी द्यायची? माहित नाही! वर्षभर अभ्यास करून परीक्षा होणार की नाही? माहीत नाही! परीक्षा रद्द झाल्या, आता आपले गुण कसे मिळणार? माहित नाही!

खरंतर दहावीचं वर्ष म्हणजे अजूनही आपल्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो आणि यावर्षी इतके अडथळे पार करून या मुलांनी जे यश मिळवलं त्याला आपण सहज “कोरोनाची कृपा” असं नाव देऊन टाकलं. या मुलांना यावर्षी कोरोनामुळे परीक्षा देता आली नाही पण मागच्या वर्षापर्यंत ते दरवर्षी शालेय परीक्षा देतच होते. मग त्यांना यावर्षी ‘कोरोनाची कृपा झाली’ म्हणून इतके चांगले टक्के पडले असं आपण कसं म्हणू शकतो?

या मुलांनी वर्षभर दहावीचा अभ्यास केला. त्या अभ्यासासाठी बदल आत्मसात केले.  कधीकधी आई-वडिलांचे बोलणे खाल्ले, कधीकधी आपलं मन मारून आवडती गोष्ट न करता पुस्तक घेऊन अभ्यासाला बसले आणि त्या अभ्यासावर त्यांना मिळणारे गुण आपण किती तकलादू ठरवले!

सईचा काल “निकाल” लागला  पण गेले वर्षभर तिची होणारी घुसमट, मित्र-मैत्रिणींना न भेटता , शाळेत न जाता घरात बसून अभ्यास करायला लागणं हा तिचा नाईलाज, ती घरी असतांनाही आमच्या कामानिमित्त आम्हाला बाहेर पडावं लागलं त्यावेळेला तिने घरात घालवलेला प्रत्येक क्षण, आजूबाजूच्या परिस्थितीचा तिच्यावर होणारा परिणाम, अभ्यासाव्यतिरिक्त दुसर्‍या कशात तरी मन गुंतवण्याची तिची तडफड, या सगळ्या गोष्टी आम्ही नजरेआड नाही टाकू शकत! कालच्या निकालानंतर तिला म्हणा किंवा या सगळ्याच मुलांना म्हणावा तसा आनंद व्यक्त करता आला नाही कारण कितीही चांगले टक्के मिळाले तरी “तुझं काय बाई नशीब चांगलं” “परीक्षा न देता पेढे वाटती आहेस?” “कोरोनाची कृपा दुसरं काय” “तुमच्या मार्कशीटवर कोरोना बॅच असा शिक्का मारायला हवा” “रिझल्टची लॉटरीच लागली तुला” असे वेगवेगळे वाक्य त्यांचा निकाल ऐकल्यावर आपल्यापैकी कित्येकांनी त्यांच्या पदरात टाकले. हे वाक्य बोलणार्‍यांना

एक मिनिटसुद्धा त्यांनी वर्षभर केलेली मेहनत दिसली नाही कि नववीपर्यंत त्यांनी मिळवलेलं उज्वल शैक्षणिक यश लक्षात आलं नाही. नववीपर्यंत सुद्धा कोरोना होता का यांना यश मिळवून द्यायला?

कोरोना संकटात, विपरीत परिस्थितीमध्ये, भांबावलेल्या मनस्थितीत, आयुष्यातल्या एका महत्त्वाच्या परीक्षेचा अगदी जीव तोडून अभ्यास करताना मी माझ्या लेकीला बघितलंय आणि तिच्या या प्रामाणिक प्रयत्नांची चेष्टा केली गेली? ९वी पर्यंत सुद्धा ती कधी 80 टक्‍क्‍यांच्या खाली आलीच नव्हती त्यामुळे तिला दहावीत मिळालेले 81% हे मला अगदी योग्य वाटतात. यात मला कुठेही शाळेची किंवा कोरोनाची कृपा वाटत नाही कारण मला माझ्या लेकीची पात्रता माहिती आहे‌.

अशीच कितीतरी दहावीची मुलं आपल्या आजूबाजूला असतील आणि आपण किती सहज त्यांच्या मेहनतीला “कोरोनाची कृपा”असं नाव देऊन टाकलं. किती सोपं वाटलं आपल्याला त्यांचं हे दहावीचं वर्ष! या मुलांचं जगणं,त्यांची तगमग, त्याची तडफड एका क्षणात कोरोनाच्या नावाखाली लपवायला आपल्याला काहीच वाटलं नाही. वर्षभर ही मुलं हतबल झालेली होती. काय करायचं, कसं करायचं हे त्यांनादेखील समजत नव्हतं तरीही नेटाने आणि वर्षभर अभ्यास करून ज्या दिवशी परीक्षा होईल त्या दिवशी पेपर देण्याची यांची तयारी होती. कॉलेजला जाण्याचं स्वप्न बघत त्यांनी हे वर्ष कसं काढलं असेल आणि आज कॉलेजच्या उंबरठ्यावर उभं असताना, त्यांच्या डोळ्यात एक मुक्त स्वप्न लहरत असताना, त्यांच्या मिळालेल्या यशाला आपण “नशीबवान” असल्याचं लेबल लावून टाकलं. एक कौतुकाची थाप देणं इतकं अवघड असतं का? हातात पेढे घेऊन वाकून नमस्कार करणाऱ्या मुलाला पाठीवर हात ठेवून “अरे वा! शाब्बास, आता पुढे काय करणार?” इतका साधा प्रश्न आपण विचारू शकलो नाही. त्यांना मिळालेले टक्के हे कोरोनाने त्यांच्या पदरात टाकलेले दान आहे असं आपण गृहीतच धरलं.

 2-5 टक्के मुलांना कोरोना परिस्थितीचा फायदा झाला असेल हे मान्य! यंदाचा रिझल्ट थोडा वेगळा लागला हे सुद्धा मान्य! काही लोकांच्या आग्रहाला बळी पडुन परीक्षा न घेता निकाल घोषित झाला.  परीक्षा न देताच अंतर्गत मूल्यमापन पद्धतीनुसार विद्यार्थ्यांना गुण दिले गेले आणि आपण त्या गुणांची थट्टा केली. अंतर्गत मूल्यमापन हे त्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या मागील वर्षीच्या परीक्षांवरच आधारित आहे हे आपण सोयीने विसरलो. त्यांना मिळालेले गुण हे हवेतुन प्रकट झालेले नाही तर हे गुण त्यांनी नववी आणि दहावी मध्ये ज्या परीक्षा दिल्या त्या परीक्षांचं मूल्यमापन आहे हे आपण समजूनच घेत नाही.

“लॉटरी रिझल्ट, मार्कांची खैरात, बिनविरोध पास” अशा हलक्या शेरेबाजीने आपण त्यांना दुखावलं. सोबतीला सोशल मिडियावर येणाऱ्या पोस्ट , मिम्स होत्याच!

अभिनंदनाच्या पोस्टपेक्षाही “लंगड्या घोड्यांनी कशी बाजी मारली, नापास होणारी मुलं सुद्धा या प्रवाहात कशी पास झाली” या सगळ्यावर येणाऱ्या विनोदांनी दहावीच्या मुलांचं परत एकदा मानसिक खच्चीकरण केलं.

या महामारीमध्ये आपण सगळ्यांनी भरपूर सोसलंय. काहींना शारीरिक नुकसान झालं, काहींना आर्थिक नुकसानीला सामोरे जावं लागलं, मानसिक नुकसान हे जवळपास प्रत्येकाचंच झालं आणि अशा या मानसिकतेमध्ये आपलं मूल किंवा आपल्या जवळपासचं एखादं मुल दहावीच्या उंबरठ्यावर असतांना आपण त्याला आधार द्यायचा सोडून त्याची खिल्ली उडवली हे तुम्हाला पटलं असेल तर तुम्हाला माणूसपणाचा परत एकदा नव्याने विचार करा.

सगळ्यांनी दहावीच्या मुलांची खिल्ली उडवली असं माझं अजिबात म्हणणं नाही पण एकंदरीतच कालचा दहावीचा निकाल लागल्यानंतर आजूबाजूला चाललेल्या चर्चा, व्हॉटसअप वर बदललेलं पोस्टचं स्वरूप, या सगळ्यांमधून जो सूर आळवला गेला त्यामुळेच या विषयावर आज मला व्यक्त व्हावंसं वाटलं‌.

आज अनेक गोष्टी ट्रायल अँड एरर बेसीसवर केल्या जातात. कित्येक गोष्टी आपणही नव्याने शिकतोय. अचानक शाळेच्या वर्गात न बसता घरामध्ये बसून लॅपटॉप समोर शिक्षण घेण्याची पद्धत मुलांना आत्मसात करावी लागली. मित्रमैत्रिणींशी गप्पा न मारता, हलके फुलके विनोद न करता, सहा सहा तास त्यांना एका जागी बसून त्या इडियट बॉक्स कडे सतत बघावं लागलं, एक तास संपला की दुसऱ्या विषयाचे शिक्षक येई पर्यंत मिळणारा पाच मिनिटांचा ब्रेकसुद्धा आपल्या मुलांच्या नशिबात नव्हता. या मुलांसाठी शिक्षकांनी सुद्धा स्वतःमध्ये बदल घडवून आणले आणि अत्यंत प्रामाणिक प्रयत्नांनी या मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. या गोष्टी लक्षात न घेता आपण त्यांच्या यशाला दोष लावतोय. केवळ परीक्षा घेतल्या गेल्या नाहीत म्हणून या मुलांना मिळणारे गुण ‘फुकट मिळालेत’ असं आपण म्हणू शकत नाही. कित्येक घरांमध्ये घरातला कर्ता माणूस गमावला होता, काही घरांमध्ये आई-बाबांची नोकरी गेली होती अशा परिस्थितीत आपल्या मुलांचं ऑनलाइन शिक्षण चालू राहावं म्हणून काय-काय प्रयत्न करून त्या पालकांनी मुलांना मोबाइल, लॅपटॉप, इंटरनेट उपलब्ध करून दिलं असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. आजूबाजूला माणसं त्रासलेली असतांना एकाग्रचित्ताने अभ्यास करण्यासाठी “एकलव्याची एकाग्रता” या मुलांनी स्वतःमध्ये बाणवली असेल त्याच आपण कौतुकच करायला हवं‌! त्यांनी दिलेल्या पेढ्याचा गोडवा आपल्या जिभेवर आणून त्यांच्यासाठी कौतुकाचे दोन शब्द बोलायला आपल्याला इतकं जड जातं?

या वर्षी दहावीत असणारी मुलं खऱ्या अर्थाने फाइटर आहेत. आजूबाजूच्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून, त्या सगळ्या गोष्टी पचवून, त्यांनी वर्षभर अभ्यास केला. नुसता अभ्यास केला नाही तर परीक्षेला बसण्याची तयारी सुद्धा दाखवली, परीक्षा झाली असती तर ही मुलं परीक्षा केंद्रावर जाऊन परीक्षा देणारच होती. घरामधलं सगळ्या प्रकारचं नुकसान त्यांनी अक्षरशः जड अंतकरणाने सोसलं, कुठल्याही गोष्टीचा बाऊ न करता निमुटपणे त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं  आणि अंतर्गत मूल्यमापन पद्धतीने त्यांना जे टक्के मिळाले त्यावर आता ते त्यांचं करिअर घडवू पाहत आहेत. अशा वेळेला आपण भक्कमपणे त्यांच्या सोबत राहायला हवं त्यांना मार्गदर्शन करायला हवं. त्यांना ज्या क्षेत्रात पुढे जायचं आहे त्या क्षेत्रातल्या संधी आपल्याला माहीत असतील तर आपण त्यांना त्या मोकळ्या मनाने सांगायला हव्यात‌. त्यासाठी काय करता येईल याचे प्रयत्नदेखील करायला हवेत.

या महामारीनंतर प्रत्येकालाच “शून्यातून जग” निर्माण करावं लागणार आहे आणि एक अतिशय सकारात्मक गोष्ट म्हणजे दहावी पास झालेली मुलं त्यांचं पहिलं पाऊल टाकत आहेत! या शून्यातून बाहेर यायला आपण त्यांना नक्कीच मदत करू शकतो. कुसुमाग्रजांच्या कवितेतली एक ओळ मला इथे आठवते आहे, “पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा” आज या दहावी पास झालेल्या मुलांचं फक्त एवढेच म्हणणं असावं असं मला वाटतं. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्या आणि बघा, ही मुलं शून्यातून विश्व निर्मितीच्या कार्याला किती झपाट्याने लागतील. त्यांच्या यशाला जी सुवर्ण झळाळी आहे ती त्यांना जाणवू द्या. त्यांच्या मेहनतीचे जे फळ त्यांना मिळाले आहे त्याची गोडी त्यांना चाखु द्या.

अजून किती महिने, किती वर्ष शाळा कॉलेजेस सुरू होणार नाहीत हे आपल्याला सुद्धा माहित नाही पण आपली एक कौतुकाची थाप या मुलांना एक नवीन उभारी देऊन जाईल‌ याची मला खात्री आहे.

तुमच्या मुलांबद्दलचे प्रश्न तुम्ही ई-मेल किंवा व्हाट्सअप करून मला विचारू शकता. भेटूया मग पुढच्या सदरामध्ये एका नवीन विषयासह!

Aditi Morankar
आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)

आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)

संचालिका : ईस्कुलिंग व्हर्च्युअल डिजीस्मार्ट किंडरगार्टन.
eskooling2020@gmail.com | 8329932017 / 9326536524
 
 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

4 Comments
  1. Savita Kshirsagar (Pekhale) says

    ताई कोरोना च्या संघर्षमय परिस्थितीत आपल्या मुलांनी प्राप्त केलेले यश हे खूप कौतुकास्पद आहे अशा परिस्थितीत आपण इतर मुलांशी तुलना न करता त्यांना कौतुकाची थाप देणं व त्यांच्यासाठी प्रेरणा देणे हेच कर्तव्य आहे

  2. सुधीर शिरसाठ says

    अतिशय वास्तविकतेला धरून मत व्यक्त केलंय. 👍👌

    1. Aaditi Tushar Morankar says

      धन्यवाद. करं मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला इतकंच

  3. Swati Pachpande says

    अतिशय संवेदनशीलतेने आजचे वास्तव लेखात चित्रित झालेले आहे ..अगदी पटले मनाला..
    खरोखरच mute असा हा दहावीचा निकाल आहे.. आशा करूया की आपण लवकरच unmute होत गुणवत्तेचा कस लावू या..

कॉपी करू नका.