“अभ्यासाच्या गुणाकार दप्तराचा भागाकार”

1
आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)

घराच्या चार भिंतींच्या बाहेर जाऊन कसं जगायचं? कसं वागायचं ? काय करायचं ? हे सगळं आपण वर्गाच्या चार भिंतींच्या आत बसवुन मुलांना शिकवतो याला खरंच शिक्षण म्हणायचं का? दुसऱ्यांच्या मुलांनी चौकटीबाहेरचा विचार केला की आपण त्याच मुलांची उदाहरणं (यशोगाथा या गोंडस नावाने) आपल्या मुलाला देतो पण आपल्या मुलांनी चौकट मोडण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला चालतच नाही.

“नॉलेज कम्स बट विझडम् लींगर्स” अर्थात शिक्षणाने जे ज्ञान मिळेल ते काही काळासाठी तुमच्यासोबत राहील पण तुमच्या अनुभवातून मिळालेलं शिक्षण तुमचं जगणं व्यापून टाकेल, तुमचं आयुष्य घडवेल !

“पुढचे पाठ, मागचे सपाट” या शैक्षणिक संस्कृती मधून घडलेली एक पिढी आता पालकांच्या भूमिकेत आहे. “घोका आणि ओका” या पद्धतीवर आपला तेव्हाही विश्वास नव्हता आणि आजही नाहीये पण मग असं काय वेगळं करता येईल ज्याने किमान आपल्या पुढच्या पिढीचं नुकसान होणार नाही? आपल्या शिक्षणाने आपल्याला काय दिलं याचा नव्याने विचार करण्याची हीच ती वेळ आणि हाच तो क्षण !

आयुष्यातली उमेदीची वर्ष आपण शाळा-कॉलेजमध्ये शिक्षणाच्या नावाखाली घालवतो पण तिथून बाहेर पडल्यानंतर हे शिक्षण आपल्याला नक्की कुठे नेऊन उभं करतं याचा विचार व्हायलाच हवा. आपल्या मुलांना आपण असं काय देऊ शकतो जेणेकरून ती मुले त्यांच्या भविष्यासाठी तयार होतील याचा गंभीर विचार आता व्हायला हवा.

‘शिक्षणाचं ओझं नको, आनंद हवा.’ एकोणीसाव्या शतकामधील टायसन हा गाजलेला इंग्लिश कवी होता. “नॉलेज कम्स बट विझडम् लींगर्स” ही त्याचीच वाक्य आहेत.

या वाक्याचा सरळ सोपा अर्थ समजविण्यासाठी तुम्हाला मी एक गोष्ट सांगते. एका शाळेत एक मुलगा होता. शाळा चालू असताना अत्यंत आळसावलेला, शिक्षकांच्या बोलण्याकडे लक्ष न देणारा,शिक्षकांनी काही प्रश्न विचारले तर कधीच उत्तरं न देणारा हा मुलगा शाळा सुटल्यावर मात्र एका सेकंदात तरतरीत दिसायला लागायचा. शाळा सुटल्याची घंटा झालीरे झाली की आळोखे पिळोखे देत उठायचा आणि म्हणायचा,”चला, आता माझी शाळा सुरू झाली.” फळ्यावर लिहीलेलं पुसणारे शिक्षक त्याचं हे वाक्य ऐकून हैराण व्हायचे. त्याच्या या वाक्याचा कधीकधी शिक्षकांना रागही यायचा पण शाळा सुटलेली असायची आणि शिक्षकांची वेळही संपलेली असायची, त्याच्यामुळे या मुलाच्या नादी फारसं कुणी लागत नव्हतं.

एका शिक्षकाला मात्र त्याच्या या रोजच्या  वाक्याचा अर्थ समजून घ्यायचा होता. एक दिवस शाळा सुटल्यानंतर शिक्षकांनी त्या मुलाला विचारलं,”तुझी शाळा आत्ता सुरू झाली म्हणजे काय? कुठे आहे तुझी शाळा? मला दाखवतोस?” तो मुलगा पहिल्यांदा थोडा घाबरला. मग त्याला आनंद वाटला. इतक्या वर्षांमध्ये एकाही शिक्षकानी त्याला हा प्रश्न विचारला नव्हता, म्हणूनच मुलगा आनंदाने त्या शिक्षकांना घेऊन त्याची शाळा दाखवायला निघाला. सगळ्यात आधी त्यानी शिक्षकांसह त्याच्या वर्गाच्या चार भिंती ओलांडल्या, मग त्याने शाळेचं कुंपण मागे टाकलं. शाळेच्या बाहेर याची शाळा कशी असेल? असा प्रश्न शिक्षकांना पडला होता. शाळा सुटल्यानंतर बाहेर कुठेतरी जाऊन हा उनाडक्या करत असेल आणि शाळेच्या नावाखाली टाईमपास करत असेल अशी या शिक्षकाची पक्की समजूत झाली होती पण तरीही आज त्यांनी स्वतःहून त्याला विचारलं असल्यामुळे शिक्षकांना त्या मुलाबरोबर जाणं भाग होतं. एव्हाना त्यांनी शाळा मागे टाकली होती. गावाची वेसही ओलांडली होती. थोडं दूर गेल्यानंतर त्या मुलानी दप्तरातून वही काढली. समोर एक झाड होतं, त्या झाडावर बसलेल्या पक्षाचं चित्र मुलानी त्याच्या वहीत काढलं. त्याची एकाग्रता बघून शिक्षकांनाही आश्चर्य वाटलं. वर्गामध्ये पेंगुळलेला हा मुलगा या पक्षाचे चित्र काढताना किती तरतरीत वाटत होता, किती उत्साहाने त्याचे ब्रश, त्याची पेन्सिल त्या कागदावर चालत होती. त्याच्यातला हा उत्साह  आजपर्यंत शिक्षकांनी वर्गात कधीही बघितला नव्हता.

थोड्यावेळाने त्या मुलानी आजूबाजूच्या झाडांची काही पाने तोडली आणि ती पानं त्याच्या दप्तरात भरली. शिक्षकांनी त्याला विचारलं,”हे काय करतोस? तो पालापाचोळा तुझ्या दप्तरात कशाला भरतोस?” तो मुलगा हसला आणि म्हणाला, “सर पालापाचोळा नाही, ही औषधी पाने आहे. या प्रत्येक झाडाच्या पानाचा उपयोग मला माहिती आहे. आता मी गावात गेलो ना की खेळताना जखमा झालेली मुलं येतील , त्यांच्या जखमांवर यातली कुठली वनस्पती लावायची हे मला नक्की माहिती आहे.” शिक्षकांना या सगळ्या प्रकाराचं आश्चर्य वाटत होतं. त्यांनी त्या मुलाला विचारलं, “या सगळ्या औषधांची माहिती तुला कशी मिळाली? हे तर आपल्या अभ्यासाच्या पुस्तकात नाही मग तुला हे ज्ञान मिळालं कुठून?” मुलानी हसत उत्तर दिलं,”अहो सर मी घरी गेलो ना की माझी आज्जी मला यातले उपयोगी काय आणि निरुपयोगी काय याची सगळी माहिती देते. सुरुवातीला तिने मला कुठलंही झाड दिसलं की त्याची दोन पानं तोडून आण असं सांगितलं होतं.

मी शाळेतून घरी जाताना रोज वेगवेगळ्या झाडांची दोन दोन पानं घेऊन जात होतो. मग आजीने मला त्या झाडांची नावं, त्याचे औषधी गुणधर्म असं हळूहळू सांगायला सुरुवात केली आणि आज मला बऱ्यापैकी झाडांची माहिती आहे.

शिक्षक स्तब्ध होऊन ऐकत होते. वर्गामध्ये त्याच्यावर चिडणारे, त्याच्या आळशीपणावर रागावणारे शिक्षक त्याच्या या तरतरीतपणाने अगदी आतून हलले होते. आपण या मुलाला कुठल्या मोजपट्टी वर मोजत होतो याचं त्या शिक्षकांना आता वाईट वाटत होतं. शिक्षण म्हणजे काय फक्त पुस्तकात छापलेली अक्षरं नाहीत ! शिक्षण म्हणजे एखाद्याच्या अनुभवातून त्याला येत गेलेलं शहाणपण असाही अर्थ होतो हे आता पटलं ना तुम्हाला!

आपणही त्या शिक्षकांसारखं आपल्या मुलांना फक्त चार रेघी, दुरेघी आणि चौकटीत तर अडकवले नाहीये ना? त्यांना एखादी गोष्ट शिकायची असेल तर ते त्यांच्या पद्धतीने तिचा शोध घ्यायला बघतात पण आपण मात्र त्यांना अडवून परत एकदा त्या चौकटीच्या वहीमध्ये अडकवतो आणि त्यांच्या आयुष्याला एक प्रकारे चौकटच घालतो. दुसऱ्यांच्या मुलांनी चौकटीबाहेरचा विचार केला की आपण त्याच मुलांची उदाहरणं (यशोगाथा या गोंडस नावाखाली) आपल्या मुलाला देतो पण आपल्या मुलांनी चौकट मोडण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला चालतच नाही.

आपण जर आपल्या मुलांना समजून घेतलं तर ते त्यांच्या शिक्षणाचा अर्थ कितीतरी पद्धतीने व्यापक करतील. पाऊस शिकवताना वर्गाच्या चार भिंतीमध्ये बसवायचं आणि बाहेर रिमझिम पडणाऱ्या पावसाकडे बघत पावसाची जुनाट गाणी शिकवायची आणि वर्षोनुवर्षे एकाच चालीत “ये रे ये रे पावसा” म्हणण्यात कसलं आलंय नाविन्य? त्या पावसात भिजून , रिमझिम बरसणाऱ्या सरींमध्ये मिळणारा आनंद मुलांना घेऊ दिला तर मुलांनाही कदाचित येरे येरे पावसा व्यतीरिक्त नवीन गाणी सुचतील. त्या पावसामध्ये भिजण्याचा आनंद मुलांनी घेतला तर मुलांची सृजनशीलता अधिक वाढेल त्या पावसाचा आनंद मुलांनी घेतला तर पाऊस कुठून पडतो, त्याचा स्पर्श कसा असतो, तो पाऊस मातीवर पडल्यावर मातीचा गंध कसा येतो, अशा अनेक गोष्टींची अनुभूती मुलांना मिळेल, पण आपल्याला मुलांना चार भिंतीतच कोंडायचंय.  आपल्याला मुलांच्या पाठीवर दप्तराचं ओझं द्यायची घाई असते आणि वर्गाच्या चार भिंतींमध्ये मुलांच्या मेंदूवर कोरीव काम करण्याचा आपल्याला छंद जडलेला असतो. प्रत्येक मुलाच्या मेंदूवर एक ठराविक अभ्यासक्रम कोरला म्हणजे तो मुलगा या वर्षी पास होऊन पुढच्या वर्गात जायला लायक झाला असा शिक्का आपण त्याला मारतो आणि मोकळे होतो पण खरंच त्या मुलाने असे काय अनुभव घेतले? अशी कुठली अनुभूती घेतली ज्याने त्याचा सर्वांगीण विकास झाला याचा कोणीही विचार करत नाही.

अगदी प्राथमिक शाळेपासून कॉलेजपर्यंत कुठलंही शिक्षण घेतलं तरी “शिक्षण म्हणजे मेंदूमध्ये माहिती साठवणे” हा एकच अर्थ लावला जातो. ती माहिती वापरणे, तिचा योग्य ठिकाणी उपयोग करणे याला ही शिक्षण म्हणतात हे कोणीच समजून घेत नाही. दप्तरामध्ये पुस्तकांचं ओझं असलं आणि वर्गामध्ये आठ-दहा तास शिकवलं की शिक्षण झालं या मानसिकतेतून आता तरी आपण बाहेर यायला हवं.

मागच्या आठवड्यात आमच्या लहान लहान मुलांना आम्ही वर्तुळ (सर्कल) शिकवतांना सहज एक उपक्रम करायला दिला होता. वर्तुळ समजावून सांगितल्यानंतर ‘आता तुम्हाला कुठे कुठे वर्तुळ दिसतंय ते दिवसभर शोधायचं’ हा एक साधा गृहपाठ होता. दुसऱ्या दिवशी माझ्यापर्यंत आलेल्या प्रतिक्रियांनी मला अतिशय आनंद झाला. मुलांच्या शोधक नजरेने आईच्या टिकली पासून पंख्याचे रेगुलेटर ,रिमोट वरचे बटन , औषधाच्या बाटलीचे झाकण गोल आहे या सगळ्याचा शोध स्वतः घरात फिरून लावला होता. मला खात्री आहे आता ही मुलं वर्तुळ किंवा गोल आयुष्यभरात कधीही विसरणार नाहीत कारण त्यांनी फक्त पुस्तकात  गोल समजून घेतला नव्हता तर त्यांनी त्यांच्या अनुभवातून , त्यांच्या उपक्रमातून तो गोल शोधला होता. जेव्हा जेव्हा ते गोल शोधत होते त्या त्या वेळेला त्यांच्या मेंदूला हे पक्कं माहीत होतं की त्यांना काय शोधायचं आहे.

लहानपणापासून मुलांच्या मेंदूची आपण फक्त पिशवी बनवून ठेवतो आहे. एक अशी पिशवी ज्याच्या मध्ये सगळं साठवता येतं पण जेव्हा गरज असेल तेव्हा त्यातलं काढून ते वापरता येत नाही मग अशा पिशवीचा काय उपयोग?

मुलांनाही मन असतं. त्यांना प्रश्न पडत असतात. त्यांना जिज्ञासा असते, उत्सुकता असते पण जर मेंदूच्या पिशवी मध्ये खूप काही भरलेलं असेल तर अशा मुलांना दुसरं काहीही सुचत नाही म्हणून सगळ्यात पहिले मेंदूची पिशवी रिकामी करायला शिकलं पाहिजे. त्यांच्या डोक्यात काय चालू आहे, ते काय विचार करीत आहेत या गोष्टी संवादातुन त्यांच्याकडून काढून घेतल्या पाहिजेत. डोक्यात चाललेले विचार एका सकारात्मक पद्धतीने वळवायला पाहिजेत.  मुलांसाठी एक सकारात्मक आणि आनंदाचं वातावरण कसं तयार होईल यासाठी प्रयत्नही केले पाहिजेत.

शाळेमध्ये मिळणारं शिक्षण हे जरी तुम्हाला पुरेसं वाटत असलं तरीही ते मुलांसाठी पुरेसं नाही. शाळेव्यतिरिक्त बाहेर मिळणारं शिक्षणही मुलांना तेवढंच समृद्ध करत असतं आणि म्हणूनच शाळा संपल्यानंतर ट्युशन, ट्युशन संपल्यानंतर ,अमुक क्लास ,तो संपल्यानंतर तमुक  क्लास या एका साखळीमध्ये न अडकवता मुलांना जगू द्या. मुलांना त्यांचा शोध घेऊ द्या. आजूबाजूच्या गोष्टींमधून, आजूबाजूच्या वस्तूंमधून नवीन नवीन आकार शिकू द्या. शोध तेव्हाच लागतात जेव्हा नावीन्यपूर्ण दृष्टीने कुठल्या तरी जुन्या गोष्टीकडे बघितलं जातं

तुमचं मूल नवनवीन कल्पनांनी त्यांचं जगणं सजवू शकतो हे विसरू नका.वैज्ञानिक जसा शोध लावतात तसा आपली मुलं ही शोध लावू शकतात पण आपण मात्र त्यांची दृष्टी एका ठराविक चौकटीत अडकवून टाकतो. जे बाकीच्यांनी करून ठेवलंय तेच आपल्या मुलांनी गिरवावं आणि शिकावं असा आपण हट्ट धरतो आणि आपल्या मुलांचं आयुष्यभराचं नुकसान करतो. कुणीतरी करून ठेवलेल्या गोष्टीचा अभ्यास करण्यामध्ये चूक काहीच नाही पण आपल्या मुलांनी नवीन काही करूच नाही हा आग्रह कशासाठी?  मुलांनी काहीतरी नवीन करावं  पण आम्ही सांगतो ते आधी करावं असं म्हणणं म्हणजे मग तुमची इच्छा मुलांवर लादण्यासारखंच झालं ना! त्यांना त्यांच्या इच्छेने, त्यांच्या आवडीचं, त्यांना वाटेल ते नवीन करू देण्याची संधी पालकांनी द्यायला हवी. आपल्या भावी पिढीसाठी, त्यांच्या होऊ घातलेल्या भविष्यासाठी पालकांनी वेगळा विचार करण्याची गरज आहे. मुलांच्या शिक्षणासाठी आपण लाखो रुपये खर्च करतोय पण आपली मुलं खरंच शिकता आहेत का?  ते शिक्षण घेत असतील पण ते अनुभव सिद्ध होत आहेत का? हे बघायला हवं. त्यांना अनुभव देण्यासाठी योग्य अशा जागा शोधा, संधी निर्माण करा. मुलांना शाळेबाहेरची शाळा शोधू द्या. नवीन नवीन प्रयोगांमध्ये रमू द्या. त्यांच्यावर लादलेलं शिक्षण ते घेतीलच पण त्यांच्या आवडीचं असं काहीतरी एक काम त्यांना करू द्या ज्यातून त्यांना जगण्याची उर्मी मिळेल.

कोरोना काळात आपल्याला आपल्या शिक्षणाने नाही तर आपल्या मधल्या छंदांनी, आपल्या मधल्या गुणांनी आपल्या मधल्या कलांनी आपल्याला तारलं, जगण्याची हिंमत दिली. कठीण परिस्थितीमध्येही आपल्या मनाला शांतता दिली. कोणी गाणे ऐकून शांत झालं, कोणी नवीन नवीन रेसिपी बनवून बघितल्या, कोणी या काळात थांबलेलं लिखाण परत सुरु केलं तर कोणी कवितांच्या माध्यमातून व्यक्त झालं. कुणी एखादं वाद्य वाजवून स्वतःचं मन तर रमवलंच पण आजूबाजूच्यांनाही आनंद दिला. या सगळ्या संकटामधुन गगनभरारी घेण्यासाठी आपलं शिक्षण नाही तर आपल्या कला आपल्या पाठीशी उभ्या राहिल्या. ह्या अनुभवातून शहाणं होऊन मुलांना त्यांचा आनंद शोधु द्या आणि मन मोकळे जगू द्या. अभ्यासाच्या गुणाकार करा, आजूबाजूच्या परिस्थितीत त्यांनी काय काय शिकण्यासारखं आहे हे बघण्याची नजर तयार करा.

त्यांच्याकडे असलेल्या वस्तूंमधून त्यांना गणित कसे समजेल, निसर्गात फिरताना त्यांना भूगोल कसा समजेल ,आपण रात्री झोपताना सांगितलेल्या गोष्टींमधून इतिहास कसा उलगडेल, गाण्यांच्या भेंड्या खेळताखेळता शब्दांची गंमत आणि भाषा कशी अवगत होईल याकडे लक्ष द्या. यातूनच होणार आहे अभ्यासाचा गुणाकार आणि  एकदा अभ्यासाचा गुणाकार साधला की दप्तराचा भागाकार व्हायला अजिबात वेळ लागणार नाही.

मग करा प्रयत्न सुरू आणि पुढे टाका पहिलं पाऊल या दिशेने!  तुमचं अनुभवसिद्ध, आनंदी मूल आणि त्याला उत्तरोत्तर मिळत जाणारं यश हेच या  दिशेचा परमोच्च बिंदू असेल !

तुमच्या मुलांबद्दलचे प्रश्न तुम्ही ई-मेल किंवा व्हाट्सअप करून मला विचारू शकता. भेटूया मग पुढच्या सदरामध्ये एका नवीन विषयासह!

Aditi Morankar
आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)
आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)
संचालिका : ईस्कुलिंग व्हर्च्युअल डिजीस्मार्ट किंडरगार्टन.
eskooling2020@gmail.com | 8329932017 / 9326536524

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. […] नाही कि नववीपर्यंत त्यांनी मिळवलेलं उज्वल शैक्षणिक यश लक्षात आलं नाही. नववीपर्यंत सुद्धा […]

कॉपी करू नका.