नाशिक (प्रतिनिधी) ः दिव्यांगाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन सकारात्मक असून त्यासाठी विविध सामाजिक संस्था त्यांच्यासाठी आपुलकीच्या जाणिवेतून कार्यरत आहेत. दिव्यांगामध्ये सक्षम व्यक्ती म्हणून जगण्याचे सामर्थ्य अशा संस्थांकडून होत असते. त्यामुळेच त्यांच्यात नवे काही करण्याची उमेद निर्माण होते. शासकीय यंत्रणेमार्फत दिव्यांगांसाठी अनेक योजना असून त्यांच्यापर्यंत या योजना पोहोचविण्यासाठी संस्थांनी पुढाकार घ्यावा व त्यांच्यात हक्कांबद्दल जागृती निर्माण करावी, असे प्रतिपादन जिल्हा परिषद नाशिकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केले.
कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी कृत्रिम पाय वाटप शिबिराचे वाटप करण्यात आले होते. त्याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून लिना बनसोड बोलत होत्या.विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, मिशन इंस्टिट्यूट फॉर ट्रेनिंग रिसर्च अँड एक्शन, नागपूर आणि फ्रीडम ट्रस्ट, चेन्नई, हॅपाग लॉयड ,मित्रा नागपूर,कुसुमाग्रज प्रतिष्ठान,नाशिकजिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानेकुसुमाग्रज स्मारक येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. शिबिरात १०३ लाभार्थीना दहा लाखाहून अधिक रकमेच्या ,कृत्रिम पाय व वस्तूंचे वाटप करण्यात आले.
लीना बनसोड पुढे म्हणाल्या की, अशा शिबिरातून दिव्यांगामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो व त्यांना उभारी मिळते.हपॅग लॉयडचे, कार्यकारी संचालक डॉ. सच्चिदानंद शर्मा म्हणाले की, दिव्यांगाविषयी समाजाचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी मदतीचा व आपुलकीचा हात द्यावा.त्यांच्यातून त्यांच्यात जीवन जगण्याची, खंबीरपणेउभे राहण्याची जिद्द निर्माण होईल. सामाजिक संस्थांनी निरपेक्ष भावनेने काम करण्याची गरज आहे. असेही ते म्हणाले. फ्रीडम ट्रस्ट,चेन्नई चे संस्थापक संचालक डॉ. सुंदर सुब्रमण्यम म्हणाले की, आपल्या सर्वांच्या एकत्रितपणातून दिव्यांगाच्या आयुष्यात नवे घडवण्यासाठी मनाची इच्छाशक्ती बळकट करणे गरजेचे आहे. दिव्यांग आपल्या कर्तुत्त्वाने सर्वच क्षेत्रात वेगळेपण सिद्ध करत आहेत. त्यासाठी त्यांना समजून घ्यावे, त्यांचे मुलभूत प्रश्न सोडवावेत.
विश्वास ज्ञान प्रबोधिनीचे संस्थापक व मार्गदर्शक विश्वास ठाकूर म्हणाले की, निश्चित ध्येय घेऊन समाज विकासासाठी संस्थांनी योगदान द्यावे. समाजमूल्य हा दिव्यांगासाठी कृतीशील विचार आहे. त्याच जाणिवेतून विश्वास ग्रुपचे उपक्रम समाजाशी नाळ जोडणारे आहेत.
जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी योगेश पाटील म्हणाले की, दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या विविध शासकीय योजना ह्या त्यांचे जीवन सुखकर होण्यासाठी स्वावलंबीपणे जगण्यासाठी आहेत. त्यांचा जास्तीत जास्त बांधवांनी लाभ घ्यावा व अशी शिबिरे त्यांच्यात जनप्रबोधनासाठी महत्त्वाची ठरावी. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन मित्रा संस्था नागपूरचे अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी केले.
याप्रसंगी समीर सक्सेना,अनिशा दलाल, डोवीनेल हारा, अमर्त्य सन्याल, विक्रांत अगुर्डे तसेच संजय पुसाम, पंकज खाझोडे, सुंदरकुमार घारोडीया आदींनी परिश्रम घेतले.