(दीपक ठाकूर,नाशिक) नाशिक हे तीर्थक्षेत्र ते वाइन कॅपिटल, करन्सी नोट प्रेसपासून सिक्युरिटी प्रेसपर्यंत, एचएएल ते देशातील कांदा आणि द्राक्षांचे सर्वात मोठे उत्पादक अशा विविध गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे.पण आज नाशिकचा आणखी एक पैलू मी उलगडणार आहे.नाशिक हे भारताचे मिसळ जंक्शन आहे आणि मी हे विधान अतिशय जबाबदारीने करत आहे. मिसळ हे नाशिककरांचे प्रमुख खाद्य आहे. मिसळची चव आणि घटक शहरागणिक बदलतात. पण नाशिकला त्याची एक खास चव आहे.
नाशिकमध्ये जवळपास २०० लहान-मोठे मिसळ जॉइन्ट्स असतील आणि प्रत्येकाचे स्वतःचे खास वैशिष्ट्य आहे. बारदान फाट्याजवळ साधना सारखे मोठे जॉइन्ट्स आहेत. जिथे तुम्हाला मिसळ तर मिळतेच पण त्या व्यतिरिक्त तुम्ही घोडेस्वारी, खास चुलीवरचे आईस्क्रीम आणि हो तोंडाला पाणी आणणारी गुळाची जिलेबी यांचा अस्वाद घेऊ शकता. हे नाशिककरांच्या रविवारची सुट्टी एन्जॉय करायच्या ठिकाणांपैकी एक आहे.
त्यानंतर गंगापूररोडवर बार्बेक्यू मिसळ हा अनोखा प्रकार अनुभवायला मिळतो.जर तुम्हाला थोडी चमचमीत मिसळ हवी असेल तर तुम्हाला गडकरी चौका जवळ असलेल्या सिटी कंपाऊंडमध्ये हिरवी मिसळ,तसेच मुंबई नाक्यावरची भगवती येथे काळी मसालेदार रस्सा असलेली मिसळ मिळेल.रविवार कारंजा जवळील शनी गल्लीशेजारी लोकमान्य येथे लाल-गरम रस्सा मिसळ म्हणजे स्वर्गीय अनुभूती. मिसळप्रेमी पंचवटी कारंजा येथील अंबिका कधीही चुकवू शकत नाहीत. पूर्वीच्या पिढीतील लोकांना अजूनही जुन्या नाशिकमध्ये वारंवार भेट दिली जाणारी सीताबाईंची मिसळ आठवते.तिचे वैशिष्ट्य म्हणजे ती मिसळ बशीत मिळायची.
श्याम सुंदर, विहार कृष्णा विजय ,तुषार इत्यादी ठिकाणी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मिसळ साठी तोबा गर्दी होते.अतिशय झणझणीत आणि चटपटीत मिसळ म्हणजे सिडको तील भामरे मिसळ या यादीत अव्वल स्थानावर आहे. भद्रकाली येथील ओम टी हाऊस हे असेच एक जॉईंट आहे जिथे तुम्हाला नाशिक मधील यशस्वी व्यावसायिक ,राजकीय नेते आणि प्रथितयश डॉक्टर्स, आर्किटेक्ट इत्यादी रविवारी मिसळचा आनंद घेताना दिसतात. सर्वच नाशिककरांप्रमाणे मीही मिसळचा निस्सीम चाहता आहे आणि मी असे वेगवेगळे जॉइन्ट्स शोधण्याचा नेहमी प्रयत्न करतो. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की तुम्हाला सर्वात चविष्ट मिसळ रस्त्याच्या कडेला असणाऱ्या गाडी वरच मिळू शकते, मग ती अशोकस्तंभावरची बजरंग मिसळ किंवा नेहरू बागेवरची मिसळ, दोघेही अफलातून आहेत.
नाशिकची मिसळ संस्कृती अशी आहे की त्याच्या एका प्लेटबरोबर तुम्हाला अमर्यादित रस्सा मिळतो आणि जर तुमची वेटरशी मैत्री असेल तर तुम्हाला कांद्याची अतिरिक्त वाटी मोफत मिळू शकते. मला खात्री आहे की एक मिसळ बारा पाव या प्रसिद्ध वाक्याचा उगम नाशिकमध्येच झाला असावा. आता मिसळ म्हणजे नक्की काय ?असा प्रश्न काहींना पडला असेल.नाशिकमध्ये मिसळ मध्ये अगदी साधेपणा ठेवतात. म्हणजे उसळीवर ते शेव आणि बारीक चिरलेला कांदा टाकतात. त्यावर गरमागरम लाल किंवा काळा रस्सा टाकतात, सोबत तर्री ची वाटी आणि दही .तळलेले पापड हे आणखी याबरोबरचे विशेष आकर्षण असते कोथिंबीर ही लक्झरी आणि उपलब्धतेची बाब आहे.त्याच्या जोडीला दोन पाव म्हणजे एक मिसळ प्लेट परीपूर्ण होते.
यानंतर तुम्ही तुम्हाला हवा तेवढा मोफत रस्सा मागू शकता पण पाव मात्र आकारले जातात. ही मिसळ प्लेट तुमचे भूक पूर्ण भागवते तुमच्या आणि त्यानंतर पुढचे काही तास तुमचे पोट ये दिल मांगे मोर अजिबात म्हणणार नाही. मिसळ खाणे नाशिककरांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. त्यापेक्षा मी म्हणेन की मिसळ खात नाही असा नाशिककर मिळणे अवघड आहे.
पुण्याला जाताना मी नारायणगाव येथे मिसळ खाण्यासाठी थांबतो पण अगदी स्पष्टपणे सांगायचे तर त्यांचा अननस शिरा खायलाच खरं तर थांबतो. कोल्हापुरात तुम्हाला मिसळ सोबत ब्रेड स्लाइस मिळतात हे म्हणजे टक्सिडो सूट वर स्लीपर घालण्यासारखे आहे. पुण्यात, एका प्रसिद्ध मिसळ जॉईंटमध्ये मला मिसळवर पोहे खाण्याचा भयानक अनुभव आला होता. खान्देशात तर मिसळी मध्ये फरसाण टाकतात जे जातीवन्त मिसळ या संकल्पनेचा प्रचंड अपमान करतात. जगभर नाशिक हे इतर शेकडो गोष्टींसाठी ओळखले जात असेल पण आम्हा नाशिककरांसाठी ती मिसळ पंढरी आहे. तर मित्रांनो पुढच्या वेळी नाशिकला भेट द्याल तेव्हा मिसळ नावाच्या स्वर्गीय पदार्थाचा आस्वाद घ्यायला विसरू नका.
दीपक ठाकूर,नाशिक
९८२३३५१५०५