क्रेडाई नाशिक मेट्रोच्या ‘एअरोनॉमिक्स 2025’ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
नाशिकच्या पर्यावरणपूरक विकासासाठी एकत्रित पाऊल
नाशिक, दि. २ जुलै २०२५ – CREDAI Nashik Metro नाशिक शहराचा प्रदूषणमुक्त आणि शाश्वत विकास साधण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोच्या पुढाकाराने ‘एअरोनॉमिक्स 2025’ या महत्वाकांक्षी मोहिमेचा भव्य शुभारंभ झाला. महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन झाले.
या उपक्रमाद्वारे स्वच्छ हवा, शून्य कचरा आणि सशक्त नाशिक या त्रिसूत्रीवर लक्ष केंद्रित करण्यात येणार असून, शहरातील पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृतीपासून उपाययोजनांपर्यंत अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत.
मंत्री पंकजाताई मुंडे यांचे स्पष्ट मत (CREDAI Nashik Metro)
मंत्री पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “नाशिक हे निसर्गदत्त शहर आहे, परंतु वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरणीय तणाव वाढत आहे. सांडपाण्याचे नियोजन, पाणीपुरवठ्याचे भविष्य, आणि ग्रामीण संधींवर भर देणे, या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत.”
त्यांनी यावेळी नदीपात्रात सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याच्या समस्येकडे लक्ष वेधत, राज्य शासन युद्धपातळीवर प्रक्रिया केंद्रांची उभारणी करत असल्याचेही सांगितले.
कार्यक्रमातील विशेष उपस्थिती
या कार्यक्रमात आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल आहेर, मनपा आयुक्त मनिषा खत्री, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अविनाश ढाकणे, क्रेडाई अध्यक्ष गौरव ठक्कर, उपाध्यक्ष उदय घुगे, मानद सचिव तुषार संकलेचा यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
मोहिमेची उद्दिष्टे:
हवेचा दर्जा सुधारणा (AQI)
स्वच्छ इंधन आधारित वाहतूक प्रोत्साहन
औद्योगिक प्रदूषणावर नियंत्रण
वृक्षारोपण आणि हरित क्षेत्र वाढवणे
कचरा व्यवस्थापनासाठी रिसायकलिंग आणि कम्पोस्टिंग
जनजागृती आणि लोकसहभाग
पुढील उपक्रम:
नाशिकला ‘ग्रीन सिटी’ म्हणून मान्यता मिळवण्यासाठी आयजीबीसीच्या सहकार्याने काम
स्टार्टअप स्पर्धेद्वारे घनकचरा व्यवस्थापन व हवेच्या गुणवत्तेवर उपाय सुचवणाऱ्यांना रोख पारितोषिक
वृक्षारोपण मोहिमेसाठी शहरभर जनसहभाग
लोकसहभाग आणि जनजागृती
क्रेडाईचे अध्यक्ष गौरव ठक्कर म्हणाले, “एअरोनॉमिक्स म्हणजे आपल्या जीवनशैलीतून पर्यावरणासाठी सकारात्मक बदल घडवण्याची चळवळ आहे. प्रशासन, शासन आणि नागरिक एकत्र आले तर नाशिक एक आदर्श पर्यावरणपूरक शहर होईल.”
या कार्यक्रमात नाशिक महानगरपालिका, निमा, आयमा, नाईस, नाशिक बार असोसिएशन, इंजिनियर्स, आर्किटेक्ट्स, डॉक्टर, शाळा व महाविद्यालय संघटनांचा सक्रीय सहभाग होता.
शपथ आणि सशक्त सहभाग
सर्व मान्यवरांनी पर्यावरण साक्षरतेची शपथ घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी मानद सचिव तुषार संकलेचा यांनी उपस्थितांचे आभार मानत, “ही मोहीम जनआंदोलनात रूपांतरित होईल, हीच अपेक्षा आहे,” असे सांगितले.
[…] क्रेडाई नाशिक मेट्रोच्या ‘एअरोनॉमिक… […]