आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा चेहरा बदलण्याची मोठी संधी : देवेंद्र फडणवीस
२०४ कोटींच्या विविध विकास कामांचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्तेभूमीपूजन व लोकार्पण संपन्न
नाशिक,दि १० फेब्रुवारी, २०२४ – आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टिने नाशिक व त्र्यंबकेश्वरचा विकास होण्यासाठी आराखडा तयार करावा, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. जेणेकरून या आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा चेहरा बदलण्याची संधी निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मेळा बसस्थानकाच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.यावेळी अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ,ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, ॲड राहुल ढीकले, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हाधिकारी जलज शर्मा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय पालवे, परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक अरुणकुमार सिया यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,नाशिक शहर हे विकासासाठी दत्तक घेतले असल्याने येणाऱ्या काळात शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्न करणार आहे. नाशिक शहर प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली तपोभूमी असून स्वातंत्र्यवीर सावरकारांच्या ज्वाजल्य विचारांची भूमी म्हणून नाशिकची ओळख आहे.आगामी कुंभमेळा लक्षात घेता नाशिक व त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राच्या विकासाच्या माध्यमातून एक आधुनिक शहर म्हणून नाशिकची ओळख निर्माण होण्यास मदत होईल, असे ही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
रिंगरोड हा शहराच्या विकासाचे केंद्र मानले जाते. आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने शहरात नियोजित असलेल्या रिंगरोड काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. तसेच नाशिक पुणे फास्ट रेल्वेमार्ग तयार करण्यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. यासोबतच नाशिक शहरासाठी निओ मेट्रोचा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारला सादर करण्यात येणार आहे. नाशिक शहराचा चेहरा बदलण्यासाठी विविध प्रकल्प नाशिकला देण्यासाठी केंद्र व राज्य शासन कटीबद्ध आहे. आज आधुनिक सुविधेने सज्ज असे मेळा बस स्थानकाचे लोकर्पण झाले आहे.या स्मार्ट बसस्थानकासाठी लवकरच स्मार्ट बस उपलब्ध होणार आहेत.नाशिकच्या विकासाच्या अनुषंगाने प्रलंबित असणारी विकास कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील,असा विश्वास ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सर्वांना दिला.
मंत्री छगन भुजबळ म्हणाले,मेळा बसस्थानक पाहिल्यावर बसस्थानक नाहीतर विमानतळावर आल्याची अनुभूती येते.आरोग्य विद्यापीठात मेडिकल कॉलेज आणि रूग्णालय व्हावे, गंगापुर डॅम परिसरात कन्व्हेन्शन सेंटर, साहसी क्रीडा संकुल,कृषि टर्मिनल मार्केट, इगतपुरीला हिल्स स्टेशन,व्दारका ते नाशिक रोड रस्त्याचे चौपदरीकरणासह उड्डाणपुल अशा विविध विकास कामांच्या माध्यमातून नाशिकच्या विकासासोबत राज्याचा देखील विकास करण्यात यावा, अशी अपेक्षा मंत्री श्री भुजबळ यांनी व्यक्त केली.
पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, मेळा बसस्थानक बघितल्यावर एसटी परिवहन विभाग कात टाकत असल्याचा विश्वास व्यक्त केला. त्याचप्रमाणे येत्या २०२७ मध्ये येणारा कुंभमेळ्याचा आराखडा लवकरच तयार करुन राज्य शासनास सादर करू,असे ही पालकमंत्री श्री भुसे यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मेळा बसस्थानकाच्या कोनशिलेचे अनावरणा यासोबतच विविध विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. श्वास फाउंडेशन संचालित अटल स्वास्थ्य रथ व दहा हजार मुलींना गर्भाशय कर्करोग प्रतिबंधक लसीकरण करणाऱ्या वाहिकेचे देखील लोकार्पण यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केले. तर कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचे आभार मेळा बसस्थानकाचे विभाग नियंत्रक अरूण सिया यांनी मानले.
असे आहे राज्यातील पहिले वातानुकुलीत मेळा बसस्थानक:
कुंभमेळ्याच्या पार्शवभूमीवर बांधलेले नवीन मेळा बसस्थानकाच्या १.७३ हेक्टर जागेमध्ये वसलेल्या या बसस्थानकात ६०३३.२२ चौरस मीटर इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. या बसस्थानकात २० प्लॅटफॉर्म असून ४ प्लॅटफॉम हे वातानुकूलित आहेत. यासोबतच….
वाहतूक नियंत्रण कक्ष,
आरक्षण कक्ष
हिरकणी कक्ष
महिला, पुरुष चालक
वाहकांसाठी स्वतंत्र विश्रामगृह
उपहारगृह एस. टी. बँक,
तळघरामध्ये प्रशस्त पार्किंग
स्थानक प्रमुख कक्ष,
८ वाणिज्य आस्थापना
पॉवर रूम
वाहनतळास ट्रिमिक्स काँक्रीट
या कामांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले लोकार्पण व भूमिपूजन….
अभिवन भारत मंदिर भूमिपूजन
संत शिरोमणी गोरोबा काका मंदिर सभामंडप भूमीपूजन
प्रमोद महाजन उद्यान भूमीपूजन
स्मार्ट स्कूल लोकार्पण
अटल स्वाभिमान भवन लोकार्पण
स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव भूमीपूजन
अटल जलकुंभ व सुरेश मानकर जलकुंभ लोकार्पण
सातपूर पोलीस स्टेशन नवीन इमारतीचे उद्घाटन
बालाजी मंदिर भक्त निवास
सोमेश्वर धबधबा येथील गोदावरी नदीवरील पूल
नविन नाशिक येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (सेंट्रल पार्क) टप्पा क्र.२
नाशिक पश्चिम मतदार संघात विविध ठिकाणी सीसीटिव्ही बसविणे