गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग : गोदाकाठच्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा
नाशिक – नाशिक शहरासह गंगापूर धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने गंगापूर धरणातून आज पाण्याचा विसर्ग होणार आहे.
गंगापूर धरणाची पाणी पातळी आजच्यामितीस ७० टक्क्याच्या वर गेली असून सकाळी १० वाजता धरणातून ५०० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होणार आहे. तर दुपारी ४ नंतर हा विसर्ग वाढून ३००० क्युसेक ने वाढणार आहे. त्यामुळे नदी क्षेत्रा जवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यापासून नाशिक शहरात पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला होता परंतु आता गंगापूर धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाल्यामुळे नाशिककरांवर आलेले पाणी संकट टळणार आहे. लवकरच हा पाणी कपातीचा निर्णय मागे घेण्यात येणार असल्याचे समजते आहे. नाशिक शहर परिसरात होणाऱ्या पावसामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.