मुंबई – मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवणारा सुप्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदेचे छोट्या पडद्यावर पुनरागमन होते आहे. छोट्या पडद्यावरून श्रेयसने अभिनव क्षेत्रात पदार्पण केले.सुरुवातीला अल्फा मराठी तसेच झी मराठीवरील आभाळमाया,अवंतिका त्याचप्रमाणे दूरदर्शनवरील गाजलेली मालिका दामिनी या मालिकेतून श्रेयसचा यशस्वी प्रवास सुरु झाला.श्रेयस आता झी मराठीवर येणारी “माझी तुझी रेशीमगाठ” या मालिकेतून टेलिव्हिजन क्षेत्रात रसिकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे.
“माझी तुझी रेशीमगाठ” या मालिकेचा प्रोमो नुकताच रिलीज झाल्यामुळे रसिकप्रेक्षकांमध्ये या मालिके विषयी प्रचंड उत्सुकता आहे.या मालिकेत श्रेयस तळपदे बरोबर प्रार्थना बेहेरे प्रमुख भूमिकेत असणार आहे.मालिकेचे कथानकात वेगळेपण असून एक सुंदर प्रेमकथा रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.श्रेयस बरोबर या मालिकेत अजून कोणकोण स्टारकास्ट आहे हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे.हि मालिका झी मराठीवरून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.
या नवीन मालिके बद्दल बोलतांना श्रेयस म्हणाला, ” पुन्हा एकदा आपल्या मराठी टेलिव्हिजनच्या माध्यमातून एका दमदार कथानकासोबत पुनरागमन करताना मला प्रचंड आनंद होतो आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ हि मालिका खूप वेगळी आहे ही एक अनोखी प्रेमकथा आहे जी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे, यातील माझी भूमिका प्रेक्षकांना आपलीशी वाटेल.”