नाशिक – नाशिक विभागीय माहिती उपसंचालक या पदावर ज्ञानेश्वर इगवे यांची पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली असून त्यांनी आज नाशिकचे जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांच्याकडून या पदाची सुत्रं स्वीकारली आहेत. हे पद नोव्हेंबर २०१६ पासून रिक्त होते.
पदोन्नतीना पदस्थापना झालेले इगवे यापूर्वी मंत्रालयातील माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात वरिष्ठ सहाय्यक संचालक म्हणून वृत्तचित्र शाखेत कार्यरत होते.
श्री. इगवे यांनी नासिक येथील यशवंत चव्हाण मुक्तविद्यापीठात दृकश्राव्य केंद्रात सन १९९१ ते २००३ याकाळात आपल्या सेवेची सुरूवात केली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात शासनाने सरळ सेवेने सन २००३ साली त्यांची वृत्त चित्र शाखेत वरिष्ठ सहाय्यक संचालक म्हणून नियुक्ती केली. त्यांनी २००८ ते २०१२ पर्यंत बीड व २०१२ ते २०१५ पर्यंत धुळे येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम केले. त्यानंतर ते २०१५ पासून मंत्रालयात पुन्हा वरीष्ठ सहाय्यक संचालक म्हणून कार्यरत होते.
श्री. इगवे हे मुळचे बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथील असून त्यांचे महाविद्यालयालयीन शिक्षण औरंगाबाद येथे झाले आहे.
त्यांनी राज्यशास्त्र या विषयात एम. ए. केले आहे, तसेच वृत्तपत्र विद्या पदवी आणि नाट्यशास्त्र विषयात पदविका संपादन केली आहे.
आज त्यांनी जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांच्याकडून पदभार स्वीकारला, त्यावेळी सहाय्यक संचालक मोहिनी राणे, माहिती अधिकारी अर्चना देशमुख, उपसंपादक जयश्री कोल्हे, माहिती सहाय्यक किरण डोळस, प्रविण बावा व विभागीय माहिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.