नाशिक – पुस्तके माणसाला समृद्धी देतात. लॉकडाऊनच्या काळात घरात राहणाऱ्या माणसांना पुस्तकांचा मोठा आधार वाटला होता. तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे समाजाच्या मानसिकतेवर त्याचे परिणाम दिसून येऊ लागले आहेत. अशावेळी वाचन संस्कृती टिकविली पाहिजे आणि त्यासाठी पुस्तकांची देवाण-घेवाण मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे यासाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानने ग्रंथ तुमच्या दारी हा उपक्रम राबविला आहे. त्याला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्याच बरोबर जगातल्या १५ देशात कुसुमाग्रज प्रतिष्ठानची ही योजना पोहोचली आहे. सव्वालक्ष पुस्तके वाचकांपर्यंत घेऊन जाण्याचे काम कुसुमाग्रज प्रतिष्ठानने केले असल्याची माहिती ” ग्रंथ तुमच्या दारी ” या योजनेचे संकल्पक विनायक रानडे यांनी सायखेडा महाविद्यालयात या उपक्रमाचा शुभारंभ करताना केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सौ.सुनीता घुमरे होत्या. कार्यक्रमास प्रसिद्ध उद्योजक गुणवंत मणियार, लेखक प्रा. डॉ.शंकर बोऱ्हाडे हे उपस्थित होते.
यावेळी बोलताना विनायक रानडे म्हणाले, कुसुमाग्रज प्रतिष्ठानने ग्रंथ तुमच्या दारी ही योजना लोकसहभागातून सुरू केली. वाढदिवसाला पुस्तक भेट देत ही योजना सुरू झाली. त्यानंतर पुस्तके वाचकांपर्यंत गेली पाहिजे यासाठी पुस्तक पेटीची संकल्पना राबविली गेली. शंभर पुस्तकांची एक ग्रंथ पेटी तयार करून त्या विविध क्षेत्रात दिल्या जात आहेत. महाराष्ट्रातील सहा तुरुंगात या ग्रंथ पेट्या दिल्या गेल्या आहेत. लोकांच्या मागणीनुसार कुसुमाग्रज प्रतिष्ठान या ग्रंथ पेट्या लोकांपर्यंत पोहोचवीत आहे. त्यासाठी कोणतेही फी घेतली जात नाही किंवा या योजनेसाठी कुणालाही मानधन, प्रवास खर्च दिला जात नाही. एक आदर्श ग्रंथ वितरण प्रणाली कुसुमाग्रज प्रतिष्ठानने विकसित केली आहे आणि त्याचा लाभ जगभरातले मराठी वाचक घेत आहेत. या योजनेतून मराठीतील कितीतरी लेखक , प्रकाशक वाचकांच्या दारी पोहोचले आहेत. वाचकांची रुची लक्षात घेऊन विविध प्रकारची पुस्तके ग्रंथ पेटीत दिली जातात. लोकांनी ग्रंथ वाचावे आणि निरामय आनंदी जीनव जगावे एवढीच आमची अपेक्षा आहे.
सायखेडा खेरवाडी या परिसरात मराठा विद्या प्रसारक समाजाने शाळा सुरु केली तेंव्हा आमचे वडील माणकचंद मणियार यांनी शाळेसाठी स्वतःची इमारत दिली होती. आज शाळेबरोबरच संस्थेने महाविद्यालय सुरु केले आहे. येथे वाचकांसाठी कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या ग्रंथ तुमच्या दारी ही योजना सुरू केल्याबद्दल गुणवंत मणियार यांनी कुसुमाग्रज प्रतिष्ठानला धन्यवाद दिले. या गावांनी मागणी केल्यास आणखी ग्रंथ पेट्या उपलब्ध करून द्याव्यात त्यासाठी आपण कुसुमाग्रज प्रतिष्ठान बरोबर राहू असे अभिवचन मणियार यांनी यावेळी दिले.
ज्ञानशील, कर्मशील समाज निर्माण होण्यासाठी ग्रंथ तुमच्या दारी या उपक्रमाचा लाभ होईल तसेच विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये वाचनाची गोडी वाढेल असे प्रा.डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी यावेळी बोलताना सांगितले. सायखेडा महाविद्यालयाच्या वतीने कुसुमाग्रज प्रतिष्ठानने ग्रंथ तुमच्या दारी उपक्रम सुरू केल्याबद्दल प्राचार्य डॉ सौ. सुनीता घुमरे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. महेश बनकर यांनी केले. प्रा. कुलथे यांनी आभार मानले. कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात प्राध्यापक उपस्थित होते.