अहमदाबाद,दि,३ नोव्हेंबर २०२४ –गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात रविवारी पहाटे ३.४ रिश्टर स्केलचा भूकंप (Earthquake )झाला. इन्स्टिट्यूट ऑफ सिस्मोलॉजिकल रिसर्चने (ISR) ही माहिती दिली. या भूकंपामुळे जिल्ह्यात कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.गांधीनगर-आधारित ISR ने सांगितले की भूकंप पहाटे ३.५८ वाजता जाणवला आणि त्याचा केंद्रबिंदू लखपतच्या उत्तर-ईशान्य ५३ किमी अंतरावर होता.
ISR डेटानुसार, यापूर्वी २७ ऑक्टोबर रोजी राज्याच्या सौराष्ट्र प्रदेशातील अमरेली जिल्ह्यात ३.७ तीव्रतेचा भूकंप झाला होता. गुजरातमध्ये भूकंपाचा धोका खूप जास्त आहे. गुजरात राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (GSDMA) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या २०० वर्षांत नऊ मोठे भूकंप झाले आहेत. GSDMA नुसार, २००१ चा कच्छचा भूकंप गेल्या दोन शतकांमध्ये भारतात झालेला तिसरा सर्वात मोठा आणि दुसरा सर्वात विनाशकारी भूकंप होता.
२६ जानेवारी २००१ रोजी गुजरातला ६.९ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला, ज्याचा केंद्रबिंदू कच्छमधील भचाऊ जवळ होता आणि संपूर्ण राज्य प्रभावित झाले. GSDMA च्या आकडेवारीनुसार, या भूकंपात सुमारे १३,८०० लोकांचा मृत्यू झाला आणि १.६७ लाख लोक जखमी झाले.