
नाशिक | दि. १३ डिसेंबर २०२५ – Emergency Days Book देशात आणीबाणी लागू होऊन पन्नास वर्षे पूर्ण होत असताना, त्या काळातील वास्तव अनुभव मांडणाऱ्या ‘आणीबाणीचे ते दिवस’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवार, दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता नाशिकमध्ये होत आहे. हे पुस्तक ज्येष्ठ स्वयंसेवक भास्कर ब्रह्मनाथकर यांनी लिहिले असून, आणीबाणीच्या काळात त्यांनी भोगलेल्या कारावास, अत्याचार व अन्यायाचा शब्दालेख या पुस्तकात मांडण्यात आला आहे.
भास्कर ब्रह्मनाथकर यांनी आणीबाणीच्या काळात नाशिक येथील तुरुंगात दोन वेळा कारावास भोगला होता. त्या काळातील अनुभव, वेदना आणि लोकशाहीवर झालेल्या आघाताचे वास्तव चित्रण त्यांनी या पुस्तकात केले आहे. ‘जे भोगले ते लिहिले’ या स्वरूपात मांडलेले हे पुस्तक वाचकांमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरले आहे.या कार्यक्रमास ख्यातनाम विचारवंत, वक्ते व पूर्वांचलचे अभ्यासक सुनील देवधर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तर महाराष्ट्र लोकतंत्र सेनानी संघाचे अध्यक्ष रघुनाथराव दीक्षित हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.
‘आणीबाणीचे ते दिवस’ (Emergency Days Book)या पुस्तकाची ही तिसरी आवृत्ती असून, यापूर्वीच्या दोन्ही आवृत्त्यांना वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. हे पुस्तक गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा सभागृहाशेजारील, तिसऱ्या मजल्यावरील टी. ए. कुलकर्णी सभागृहात प्रकाशित होणार आहे. या महत्त्वपूर्ण पुस्तक प्रकाशन कार्यक्रमास नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ‘शब्दमल्हार प्रकाशन’ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

