विश्वास ! अतिविश्वास !! अविश्वास !!!

0

आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)

बागेत सी-सॉ खेळायला एकच मूल असेल तर त्याला खेळता येत नाही. क्रिकेट खेळण्यासाठी एकच खेळाडू असेल तर क्रिकेटही खेळता येत नाही, तसंच पालकत्वाचा खेळ रंगात यायचा असेल तर किमान दोन पक्ष हवेच. एक पक्ष आई-वडिलांचा आणि एक आपल्या उमलू पाहणाऱ्या मुलांचा! जशी एका हाताने टाळी वाजत नाही, तसंच ‘एकतर्फी पालकत्व’ शक्य नाही. माझ्या बोलण्याला आव्हान द्यायचं म्हणून तुम्ही कदाचित एका हाताने टाळी वाजवालही पण याच अट्टाहासाने जर एकतर्फी पालकत्व अनुभवायला गेलात तर ते ही तितकंच पोकळ आणि पोचट राहील याची खात्री बाळगा.

कुठल्याही नात्याचा पाया भक्कम असावा लागतो. त्यात ते नातं जर अगदी जवळच असेल तर नात्याचा पाया “विश्वास” असतो. पालक म्हणून आपलाही आपल्या मुलांवर खूप विश्वास असतो आणि हा विश्वासच आपल्या नात्याला फुलवत असतो, घट्ट धरून ठेवत असतो. अनेकदा मुलांकडून आणि आपल्याकडूनसुद्धा अशा काही गोष्टी घडतात ज्यामुळे विश्वास डगमगतो , काही प्रसंगी संपतो सुद्धा! एकदा विश्वास संपल्यानंतर ते नातं संपायला वेळ लागत नाही.

नातं म्हणजे काही मोबाईलचा रिचार्ज नाही. ‘एका कंपनीची सर्विस नाही आवडली तर नवीन रिचार्ज करण्याआधी दुसरी कंपनी ट्राय करून बघू’ असं पण बालक-पालक नात्यात म्हणू शकतो नाही. आपल्याला मिळालेले बालक आणि त्या बालकाला मिळालेले पालक हे दुकानातल्या ‘एकदा विकलेला माल बदलुन दिला जाणार नाही व परतही घेतला जाणार नाही’ या पाटीसारखे असतात. एकदा मिळाले कि “नो एक्सचेंज, नो रीप्लेसमेंट!”

“चार दिवस तुझ्याकडे घेऊन जा, म्हणजे त्याला आई बापाची किंमत समजेल!”
“हरप्रकारे समजावुन पाहिलं ग, ऐकतच नाही, आम्ही तर हात टेकले आता…”
“तू असं काही वागशील याचा स्वप्नात सुद्धा आम्ही विचार केला नव्हता आणि आज तु ही काय वेळ आणली?”
“मी तुला म्हटलं होतं ना माझ्या फ्रेंडसमोर हा विषय काढू नकोस पण मी ‘नाही’ म्हटलं की तू मुद्दाम त्यांच्यासमोर बोलतेस ना मम्मा?”
“मी माझ्या आईला माझी बेस्ट फ्रेंड समजत होते आणि बाबा तर एकदम कुल होते, पण आता ते दोघेही माझ्याशी जरा विचित्र वागतात. माझा मोबाईल तपासणं, सोशल मीडियावरचे माझ्या फ्रेंड्स, त्यांच्याशी मी नक्की काय चॅटिंग करते? हे सगळं जाणून घ्यायचा खूप प्रयत्न करत असतात”

ही सगळी वाक्य अगदी अलीकडच्या काही दिवसातली आहेत. कुठल्या ना कुठल्या घरात, काहीना काही बिनसलं आहे. कुठे मुलांचा हट्टीपणा आईला सहन होत नाही म्हणून मुलांना चार दिवस कोणीतरी घेऊन जावं अशी अपेक्षा आहे, तर कुठे मुलांना आपल्या जवळच ठेवून त्यांना शिस्त लावण्यासाठी तडफड चालू आहे .कुठे आईवडिलांवर असलेल्या विश्वासाला हलका तडा जायला सुरुवात झाली आहे, तर कुठे नात्यातला विश्वास संपल्यामुळे पालकांच विश्व शून्य झालं आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा पालकांशी आणि मुलांशी बोलण्याची वेळ येते तेव्हा ‘विश्वास, अविश्वास आणि अतिविश्वास’ हे तीन शब्द वारंवार चर्चेत येतात.

“विश्वास” मी जेव्हा या शब्दाकडे बघते तेव्हा यात मला एक कॉम्बिनेशन दिसतं. इंग्रजीतला We(वी) आणि मराठीतला श्वास! याचा अर्थ मी “आपण एकमेकांचा श्वास आहोत!” असा लावते. किती सुंदर संकल्पना आहे,  मुल आई-वडिलांचा श्वास असतंच, आई-वडीलही मुलांसाठी श्वासाइतकेच महत्त्वाचे असतात मग कालांतराने हे सुंदर नातं व्हेंटिलेटरवर का जातं?

आई बाबा आणि मुलांमध्ये विश्वास कमी होण्याची कारणे काय असतील? याचा विचार होणं गरजेचं आहे.
सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे स्मार्टफोनने ओवर-स्मार्ट होत असलेली पिढी ! आपण जेवढे यांना थांबवायला बघतो तेवढेच त्यांना आपण ‘नाही म्हणत असलेली प्रत्येक गोष्ट’ करून बघायचीच असते. आपण नाही का म्हणतोय? ती गोष्ट करण्यामध्ये काय वाईट आहे? हे ‘येन केन प्रकारेण’ मुलांना समजून घ्यायचं असतं. यासाठी सगळ्यात पहिला आधार मिळतो तो सोशल मीडियाचा आणि इंटरनेटचा…

“तुम्हाला रात्री साडेआठपर्यंत चॅटिंग करण्याची परवानगी आहे त्यानंतर आलेले मेसेज वाचले तरीही त्याला रिप्लाय देऊ नका, नाहीतर तुम्ही ‘अवेलेबल’ आहात असा चुकीचा संदेश समोरच्याला जातो”, असं आपण कितीही प्रेमाने समजावलं तरी आपल्या मुलांना “साडेआठचं बंधन” मान्य नसतं. आलेल्या मेसेजला उत्तर दिलं नाही किंवा त्यावर आपण व्यक्त झालो नाही तर ते अस्वस्थ व्हायला लागतात आणि मग मोबाईल फेकणे, मोबाईल स्वीच ऑफ करून टाकणे अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया बघायला मिळतात. यानंतरही आपण मुलांच्या मनाप्रमाणे न वागता त्यांच्यावरची बंधन कायम ठेवली तर मुलं वे-आउट शोधायला लागतात. आपण त्यांचं व्हॉट्स ॲप चेक केलं तर तिथे आपल्याला साडेआठनंतर काहीच हालचाल दिसत नाही. पालक म्हणून आपण खूश होतो. आपल्या मुलांनी आपल ऐकलं असा गोड गैरसमज आपण करून घेतो. लक्षात घ्या, आपण मुलांना रात्री साडेआठनंतर रिप्लाय देऊ नका असं सांगितलेलं असतं ‘साडेआठनंतर मोबाईल हातात घेऊ नका’ असं नाही आणि नेमक्या याच गोष्टीचा फायदा घ्यायला मुलं फार लवकर शिकतात.

साडेआठनंतर आपल्यासमोर, आपल्या बरोबरीने मुलं मोबाईल हातात घेऊन बसलेले असतात. “काय करता?” विचारलं तर युट्युबवर काहीतरी बघतोय, रील्स बघतोय अशी उत्तर आपल्याला मिळतात. आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला त्यांच्या हातातून मोबाइल खेचून बघणं पटत नसतं, त्यांच्या उत्तरांवर समाधान म्हणून आपणही आपलं डोकं आपल्या मोबाईलमध्ये खूपसतो. एव्हाना आपल्या नकळत त्यांनी त्यांचं चॅटिंग इंस्टाग्राम चॅटवर शिफ्ट केलेले असतं. व्हाट्सअप वर शांतता बघून आपण परत एकदा निरागस विश्वास टाकतो आणि मुलं मात्र इंस्टाग्रामच्या चॅटिंग मध्ये रममाण झालेले असतात. इन्स्टाच्या चॅटिंग वर बरेच सेटिंग आहेत. तुम्ही आठवड्यातून एकदा मोबाईल चेक करायला घेतला तर तोपर्यंत इंस्टाग्रामवर चॅटिंग निघून गेलेलं असतं अर्थात डिलीट झालेल असत. तिथे पाठवलेले फोटो एकदा बघून झाल्यावर निघून गेलेले असतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा इन्स्पेक्शन करणाऱ्या आपल्यासारख्या इन्स्पेक्टरच्या हातात काहीही लागत नाही आणि त्यामुळे आपला मुलांवर विश्वास वाढत जातो. मुल काहीच गैर करत नाहीयेत, गैर बघत नाहीयेत, चुकीचं वागत नाहीये या आपल्या विश्वासाचे रूपांतर हळूहळू ‘अति विश्वासात’ व्हायला लागतं.

एकदा विश्वासाची पायरी अति विश्वासावर गेली की मग आपण मुलांचे मोबाईल तपासून पाहणं बंद करतो. आता आपल्या मुला-मुलींना मोबाईल साक्षरता आली आहे, असं उगीचच आपण समजायला लागतो मोबाईलवर काय बघावं? काय टाळावं? किती वेळ बघावं? हे मुलांना समजत आहे असा आपला गैरसमज होतो आणि मग आपण आपल्या मोबाईल टूरमध्ये मग्न होतो आणि मुलांना त्यांचं रोलर कोस्टर एन्जॉय करू देतो.

अचानक एक दिवस आपल्याला इंस्टाग्राम वर चॅटिंग करता येतं याचा शोध लागतो आणि आपण अस्वस्थ होत मुलांचं इंस्टाग्राम ओपन करतो. तिथे आपल्याला ‘साडेआठनंतर व्हाट्सअप शांत का?’ या प्रश्नाच उत्तर मिळतं. आपला खूप संताप होतो. परत एकदा व्हॉट्सऍपच्या वेळेला दिलेले प्रवचन आता इंस्टाग्रामच्या विषयाला अनुसरून सुरु होतं. पहिल्यांदा जेवढ्या भक्तिभावाने मुलांनी ऐकलेलं असतं त्यापेक्षा जास्त निष्काळजीपणाने आपलं यावेळचं बोलणं ऐकलं जातं आणि आता आपलं इंस्टाग्राम चॅटिंगही बंद होणार याची मुलांना खात्री असते पण पर्वा नसते, कारण आता “स्नॅप चॅट” हा पर्याय खुला झालेला असतो.

व्हाट्सअप आणि इंस्टाग्राम चॅटिंगपर्यंत असलेली आपली मजल लक्षात घेता स्नॅपचॅट वर चॅटिंग करता येत हे समजायला आपल्याला पुढचे कित्येक महिने लागणार असतात आणि तोपर्यंत मुलांना परत एकदा मोकळीक मिळणार असते. काही महिन्यांनी परत एकदा निरव शांततेनंतर याच एपिसोडचं रिपीट टेलिकास्ट होतं मात्र यावेळी प्रवचन ‘स्नॅपचॅट’ या विषयावर असतं.

अति विश्वासामुळे मुलांनी जेवढ्या पळवाटा शोधल्या, त्या शोधण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळाला. विश्वास आणि अतिविश्वास यांच्यातली बारीकशी सीमारेषा ओळखण्यामध्ये पालक म्हणून आपण आज चुकलो.

३-४ संधी दिल्यानंतर आता मात्र आपल्या मुलांवरचा विश्वास उठायला लागतो. विश्वाळसाची जागा जी अति विश्वासाने घेतली होती ती आता अविश्वास घेऊ लागतो. नात्यांसाठी हा अविश्वास “स्लो पॉयझनिंगचं” काम करतो. खूप वेळा संधी दिल्यानंतरही मुल आपल ऐकत नसतील, आपण जे सांगतो आहे ते ऐकल्यासारख दाखवून त्याच्या ऐवजी नवीन पर्याय शोधत असतील, तर कालांतराने आपणही हतबल होतो. प्रेमाची जागा चिडचिड, संवादाची जागा वाद आणि संयमाची जागा आक्रमकता घेऊ लागते.
लहानपणी हाताचा पाळणा करून झोपवलेल्या आपल्याच बाळाला त्याच हाताने फटके मारतांना आपल्याला भयंकर वेदना होत असतात. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे जेव्हा मुलांना प्रेम, द्वेष, राग, लोभ, काही समजत नसतं, त्या वयात आपण त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केलेला असतो आणि आता त्यांच्या समजत्या वयात त्यांच्याच काही वागणुकीमुळे आपल्याला त्यांना रागवण्याची, मारण्याची वेळ येते आणि अर्थातच या सगळ्या प्रवासात आपलं प्रेमळ वागणं विस्मरणात गेलेल असतं. मुलं लक्षात ठेवतात ते फक्त आपलं आत्ताच, वर्तमानातलं वागणं!

आपल्या चांगल्या वागणुकीचा, आपल्या चांगल्या हेतुंचा गैरफायदा मुलांनी घेणं हे केव्हाही चुकीचंच आहे पण पालक म्हणून इतकं सगळं करूनही आपण कुठे कमी पडतोय का याचा विचार करायला हवा. मुलाला मोबाईल देतानांच त्याच्या वापराची नियमावली ठरवून द्यायला हवी. मुलांनी जर मोबाईल वर गेम ठेवू नये असं वाटत असेल तर आपणही मुलांसमोर मोबाईल घेऊन तासन्तास बसू नये. “तू साडेआठला चॅटिंग बंद करायचं पण मी मात्र डोळे मिटेपर्यंत बोटांचे व्यायाम चालू ठेवेल” ही मानसिकता बदलायला हवी. नियमावली लावताना “फक्त लेक्चर पुरताच मोबाईल मिळेल हं” असं करून चालणार नाही कारण यातून बंडखोरी शिवाय दुसरं काहीही हाती लागणार नाही. आजूबाजूच्या घडलेल्या उदाहरणांमधून मोबाईल मुळे नक्की काय परिणाम होत आहेत? यावर घरात चर्चा करायला हवी. मुलांची दुसऱ्या कुणाशीही तुलना न करता ‘त्याच्या व्यक्तिचगत आरोग्यासाठी, त्याच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या टप्प्यांसाठी मोबाईल बाजूला ठेवून सजगतेने काही गोष्टी करणं कसं गरजेचं आहे’ यावर मुलांशी संवाद साधायला हवा. जेव्हापासून मोबाईल हातात आला आहे तेव्हापासून तुमच्या पाल्याने किती नवीन गोष्टी स्वतःहून करून बघितल्या? याचा उहापोह करायला हरकत नाही, कारण मोबाईल हातात येण्यापूर्वी आपली मुलं खूप सृजनशील असतात. सतत काहीतरी नवीन करून बघत असतात. कुणी लिहून व्यक्त होत असतात तर कुणी चार वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधून स्वतःला समृद्ध करत असतात. मोबाईल हातात आल्यापासून त्यांचं हे वागणं 100% बदललेलं तुमच्याही लक्षात येईल.

विश्वास, अति विश्वास आणि अविश्वास या सगळ्या पायऱ्या चढत असताना नात्यांमधली ओढ, प्रेमाचा ओलावा, एक एक पायरी उतरत असतो याचा आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा. आज आपल्याला एक किंवा दोनच मुलं आहेत. तीसुद्धा जर आपल्या सांगण्याला, आपल्या नियमांना पळवाटा शोधत राहिली तर त्याचे परिणाम फारसे चांगले नसतील. एखादी गोष्ट  करायला आपले आई-बाबा नाही म्हणतात किंवा थांबवतात त्या पुढे दोनच पर्याय मुलांसाठी शिल्लक असतात. एक “ती गोष्ट पूर्णतः थांबवणं” आणि दोन “आई वडिलांना चोरुन ती गोष्ट तशीच चालू ठेवूणं”. आपली मुलं यातला कुठला पर्याय निवडतील असं तुम्हाला वाटतं?

जर त्यांना शांततेत, प्रेमाने आणि वेळोवेळी त्यांच्या वागण्याचे दुसरी बाजू दाखवत राहिली तर पहिला पर्याय निवडणं मुलांना सोप्प जाईल, पण रागवून, चिडचिड करून, सतत टोमणे मारले, घालून पाडून बोललं तर प्रत्येकवेळा तुमच्या विरुद्ध जाण्याची, तुमच्यापासून गोष्टी लपवून ठेवण्याची इच्छा प्रबळ होत जाईल आणि मुलं दुसरा पर्याय निवडतील.

आपल्या मुलांसाठी काहीवेळा आपल्याला समजूतदारपणा दाखवावा लागणार आहे. अविश्वासाचे रूपांतर परत एकदा विश्वासात करावे लागणार आहे आणि हा ‘विश्वास यानंतर कधीही अति विश्वासात बदलणार नाही’ याची काळजीही पालक म्हणून आपल्यालाच घ्यावी लागणार आहे. मी कायम या प्रवासात तुमच्या बरोबर असणारच आहे कारण मी ही एक पालक आहे. मी ही तुमच्यासारखच, तुमच्याबरोबरच काही गोष्टी नव्याने शिकण्याचा प्रयत्नही करते आहे. चला तर मग विश्वासाच्या या नवीन प्रवासाला पालक म्हणून आपण सगळेच सुरुवात करूया!

तुमच्या मुलांबद्दलचे प्रश्न तुम्ही ई-मेल किंवा व्हाट्सअप करून मला विचारू शकता. भेटूया मग पुढच्या सदरामध्ये एका नवीन विषयासह!

आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)
संचालिका : ईस्कुलिंग व्हर्च्युअल डिजीस्मार्ट किंडरगार्टन.
eskooling2020@gmail.com | 8329932017 / 9326536524
https://www.instagram.com/theblooming.minds

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.