आदिती मोराणकर
ढोल ताशांचा आवाज कमी कमी होत गेला पण नाचणाऱ्यांच्या मागे नाईलाजाने हतबल होऊन चालणाऱ्या, हळद, कुंकू, गुलाल टाकलेल्या टोकदार शिंगांच्या त्या रेड्याची रखडणारी पावलं माझ्या हृदयात खोल कुठेतरी रुतली ! ढोल ताशांचा आवाज बंद झाला पण रेड्याची आर्त “मुक साद” आता माझ्या कानात घुमते आहे. झिंगाट होऊन, अंगविक्षेप करत नाचणाऱ्या त्या टवाळ गर्दीपेक्षा रेड्याच्या अंगात नक्कीच जास्त रग होती पण रुबाबदार, टोकदार शिंग असलेली मान खाली घालून रेडा त्या झिंगाट गर्दीमागे निमूट चालत होता. एकदा जरी त्याने गर्दीवर नुसती शिंग उगारली असती तरी गर्दी पांगली असती आणि त्याचा जीव वाचला असता; पण रेड्याचा ‘आत्मविश्वास’ कमी पडला. “आता सगळं संपलं” ही प्रवृत्ती रेड्यासारखाच आपलाही घात करते!*
‘लढा’ हा शब्द फक्त इतिहासात वापरण्यासाठी नाही. हा शब्द आपल्या रोजच्या आयुष्याचा, प्रत्येक दिवसाचा, किंबहूना प्रत्येक क्षणाचा एक भाग आहे. आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी ‘लढा’, आपलं म्हणणं सिद्ध करण्यासाठी ‘लढा’, आपण जे करतो आहे ते बरोबर आहे ते सिद्ध करण्यासाठी ‘लढा’ आणि जर आपण लढलो नाही तर आपलीही अवस्था वरातीमागून चालणाऱ्या त्या रेड्यासारखी होणार !
संत ज्ञानेश्वरांनी आपला आणि रेड्याचा आत्मा एक असल्याचं सिद्ध केलं. त्याकाळीही जन्माला आल्यापासून ज्ञानेश्वरांचा ‘लढा” चालूच होता. संजिवन समाधी घेताना, अवघ्या जगाची माउली ठरलेल्या संत ज्ञानेश्वरांनी त्यांचा लढा मध्ये सोडला असता तर?
अलीकडेच आपल्याला पोरकं करून गेलेल्या “माई अर्थात सिंधुताई!” त्यांच्या निधनाची बातमी समजताच हजारो-लाखो लोकांचे सोशल मीडियावर स्टेटस बदलले. आपण सगळ्यांनी अश्रूंना मिळेल त्या माध्यमातून वाट करून दिली; पण ‘ममताची आई ते अनाथांची माई’ ही “वाट” सिंधुताईंसाठी फार अवघड होती. अनाथांची माय असणाऱ्या सिंधुताईंनी त्यांचा ‘लढा’ मधेच सोडला असता तर?
आता आपल्या मुलांच्या आयुष्याची ही सुरुवात आहे म्हणूनच आज अगदी मनापासून एक विनंती करते आहे, “आपल्या मुलांना लढा द्यायला शिकवा. जेवढी आपली लढाई ते स्वतः लढतील तेवढीच त्यांची जास्त प्रगती होईल.”
‘निसर्ग’ हा आपल्या सगळ्यांत मोठा गुरू समजला जातो पण पुस्तकात हरवून चाललेलो आपण निसर्गातून मिळणाऱ्या शिक्षणाकडे रीतसर दुर्लक्ष करतो. निसर्गात कितीतरी अशा गोष्टी घडत असतात, ज्या आपल्याला जगण्याचं सार शिकवून जातात. आपल्या डोळ्यांना आनंद देणारी फुलपाखरं! अवघ्या १४ दिवसांचं आयुष्य अनुभवण्यासाठी त्याआधी कित्येक दिवस अंड्यांपासून सुरवंटापर्यंतचा प्रवास फुलपाखराने केलेला असतो. आमच्या घरासमोरील बागेत अनेकदा फुलपाखरं अंडी देतात. ‘त्यांनी अंडी दिल्यापासून त्यातून फुलपाखरू बाहेर येईपर्यंत निरीक्षण करणे’ याचा माझ्या लेकीला छंद लागला होता. सकाळी उठल्यानंतर रोज बाहेर जाऊन त्या अंड्यांची किती वाढ झाली आहे? त्यातून अळी बाहेर आली आहे की नाही? याचं निरीक्षण करून ती घरात येऊन त्याचे चित्र काढून ठेवायची. यातून ती समृद्ध होत होती. त्याच बरोबर ‘अवघ्या १४ दिवसांच्या आयुष्यासाठी फुलपाखराला किती वाट बघावी लागते?’ याची जाणीव सुद्धा तिला होत होती. ‘जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची खूप वाट बघतो आणि मग ती गोष्ट आकाराला येते तेव्हा मिळणारा आनंद’ माझ्या लेकीला समजत होता आणि ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती.
केवळ फुलपाखराचे जीवन चक्र असा पुस्तकातला धडा वाचून तिला समाधान मिळालं नसतं, अनुभव मिळाला नसता. तिच्या अनुभवातून ती काहीतरी शिकते आहे याचा मला जास्त आनंद होता. सुरवंटाच्या कोषातून फुलपाखरू बाहेर येण्याची वेळ झाली होती. कोष फाटून फुलपाखराचं डोक बाहेर आलं होतं. अतिशय कष्ट घेऊन फुलपाखराला आवरणातून बाहेर पडायचं होतं. अशावेळी आपल्यालाही माणुसकी आठवते आणि संकटात सापडलेल्याला मदत करण्याची आपली प्रवृत्ती स्वस्थ बसू देत नाही. त्याप्रमाणे माझी लेक धावत आली आणि “त्या फुलपाखराला मदत करू का ?”असे विचारू लागली.
त्यावेळी मला कुठेतरी वाचलेली एक गोष्ट आठवली. मी तिला बाहेर त्या कोषाजवळ नेत म्हणाले,” तुला माहितीये, एका वर्गात विझानाचे शिक्षक सुरवंटाचा कोष घेऊन गेले होते. त्या कोषातून थोड्याच वेळात फुलपाखरू बाहेर येण्याची शक्यता होती. त्याचा अनुभव मुलांनी घ्यायला हवा असं शिक्षकांना वाटत होतं. काय काय घडतंय ते लांबुनच बघा असं त्यांनी मुलांना सांगीतलं आणि शिक्षक वर्गाबाहेर गेले. थोड्या वेळाने खरंच कोष फाटुन फुलपाखरू बाहेर यायला धडपडु लागलं. सगळी मुलं कुतुहलाने बघत होती. मात्र तुझ्यासारख्या एका हळव्या मनाच्या मुलाला फुलपाखराची ती धडपड बघवली नाही आणि त्याने तो कोष फाडला.
फुलपाखरू विनासायास बाहेर आले. मात्र दुर्दैवाने ते उडु शकलं नाही कारण कोषातून बाहेर पडण्याच्या लढ्यात फुलपाखराच्या पंखांना बळ मिळतं, ऊभारी येते. कोष आयता फाडुन मिळाला म्हणुन तो लढा न दिल्याने फुलपाखरू कायमचं अपंग झालं.” हे ऐकून माझ्या लेकीला वाईट वाटलं आणि मनापासून मदत करावीशी वाटत असतांनाही ‘फुलपाखराला बाहेर येण्यासाठी मदत न करण्याचा निर्णय’ माझ्या लेकीने घेतला. त्या क्षणी ‘लढ्याचं महत्त्व’ तिला पटलं. त्यादिवशी समोरच्या कोषातून फुलपाखरू त्याच्या हिमतीवर बाहेर आलं पण अनुभवांचे रंग मात्र माझ्या लेकीच्या आयुष्यात भरले गेले.
अश्याच अर्थाची अजून एक गोष्ट माझ्या वाचनात आली होती. ती गोष्ट आहे एका आजोबांची आणि एका तरुण इंजिनियरची! दोघांनीही त्यांच्या अंगणात झाडे लावली होती. आजोबा त्यांच्या झाडांना ठराविक वेळी कमी पाणी घालायचे. इंजिनियर मात्र मनात येईल तेव्हा भरपूर पाणी घालायचा. दोघांचीही झाडं वाढत होती. एक दिवस सोसाट्याचा वारा आला. वाऱ्यापाठोपाठ वादळ आल. वादळ निघून गेल्यानंतर जेव्हा इंजिनीयर आणि आजोबा आपापली झाडे बघण्यासाठी आले त्यावेळेला इंजिनीयरची सगळी झाडं जमीनदोस्त झालेली होती पण आजोबांची झाडं मात्र अंग झटकून परत उभी होती. त्यावेळी उच्च शिक्षित असलेल्या त्या तरुणाने आजोबांना असं होण्यामागचं कारण विचारलं. आजोबा म्हणाले,” बाळा, झाडांनी जगावं इतपत पाणी मी रोज ठराविक वेळी झाडांना टाकत होतो. त्यापेक्षा जास्त पाणी हवं असल्यास त्या पाण्याचा शोध घेत माझ्या झाडांची मुळे आत जमिनीत खोलवर गेली आणि घट्ट झाली. तू मात्र अगदी मनात येईल तेव्हा भरपूर पाणी तुझ्या झाडांना टाकलं. त्यामुळे तुझ्या झाडांची मुळे पाण्याच्या शोधात जमिनीत रुतले नाहीत उलट अती पाण्याने कुजली . म्हणूनच वरवर राहिलेल्या मुळांमुळे तुझी झाड नष्ट झाली, मात्र या वादळात खोलवर रुतलेल्या मुळांनी माझ्या झाडांना घट्ट धरून ठेवलं. बाळा, झाडाला घडवायचं असेल तर त्यांच्या अस्तित्वाचा लढा त्यांनीच लढायला हवा. तुझे तासन्तास घेतलेले कष्ट झाडांना उपयोगी नाही.”
हेच तत्व पालक म्हणून आपणही अंगीकारायला हवं. आपल्या मुलांना घडवायचं असेल तर त्यांना गरजेपुरत्या गोष्टी देऊन बाकीचे अति लाड बंद करायला हवेत. दुर्दैवाने आपण मुलांच्या तोंडातून शब्द निघण्याआधीच त्यांना सगळ्या वस्तू पुरवतो आणि त्यांची अवस्था आपण “फाडून दिलेल्या कोषातून बाहेर आलेल्या फुलपाखरासारखी” करतो. ना त्यांना त्यांचे पंख पसरवता येतात, ना त्यांना उडता येतं! याला पालक म्हणून सर्वस्वी आपण जबाबदार असतो. आपल्या लहानपणी “पडो झडो पण माल वाढो” अशी एक म्हण होती. याचा अर्थ सगळ्या प्रकारचे अनुभव घ्या. पडा, लागू द्या पण त्यातून भक्कम व्हा असा होता.
आपण झाडावर चढायचो, विटी दांडू, लिंगोर्च्या खेळायचो, माती माती खेळायचो. आपल्या मुलांना मात्र आपण रिमोटच्या कार, व्हिडिओ गेम, बार्बी या खेळण्यांमध्ये अडकवतो. अंगाला मातीचा स्पर्श नाही, पाण्याचा ओलावा नाही, ओल्या मातीची आर्द्रता नाही, निसर्गातला सुगंध नाही, पावसामध्ये भिजले नाही, पाण्यात कागदाच्या होड्या सोडणार नाही, हे असं बालपण काय कामाचं? आपल्या मुलांना अनुभव कशातून मिळणार? चांगलं काय, वाईट काय, कुठे थांबायचं, कशासाठी लढायचं? याचा निर्णय आपली मुले कशी घेणार.
माझं एक वाक्य लक्षात ठेवा.”मुलांसाठी तुम्ही लढणार तर मुलं आयुष्यभर लोळत पडणार पण मुलं स्वतःसाठी लढणार तर ते खऱ्या अर्थाने घडणार !”
“लढा आणि घडा” हा मुलांच्या आयुष्याचा मूलमंत्र असायला हवा. ‘लढा, तेही योग्य कारणासाठी’ याचं महत्त्व मुलांना सांगायला हवं. नाही तर कुठेतरी मारामारी करून येतील, कुठेतरी बाचाबाची करून येतील, कुणाला दोन देऊन-दोन घेऊन येतील आणि म्हणतील “तुम्हीच लढायला सांगितलं ना?” मुलं फार गमतीशीर असतात. आपण काय सांगतो आहे याचा अर्थ ते कधी कधी त्यांच्या सोयीने घेऊ शकतात. म्हणूनच आपल्याला जे सांगायचं आहे ते योग्य वेळी आणि योग्य शब्दात सांगण्याचं कौशल्य पालक म्हणून आपल्यात असायलाच हवं.
या लढाईत तुम्ही फक्त मुलांच्या मागे नाही तर मुलांच्या सोबत रहा आणि आपल्या या छोट्याशा रोपट्याची मुळं खोल जमिनीत जाऊन त्याचा वटवृक्ष होण्याचा आनंद मनसोक्त पहा!
तुमच्या मुलांबद्दलचे प्रश्न तुम्ही ई-मेल किंवा व्हाट्सअप करून मला विचारू शकता. भेटूया मग पुढच्या सदरामध्ये एका नवीन विषयासह!
आदिती मोराणकर (शिक्षण विश्लेषक)
संचालिका : ईस्कुलिंग व्हर्च्युअल डिजीस्मार्ट किंडरगार्टन.
eskooling2020@gmail.com | 8329932017 / 9326536524
https://www.instagram.com/theblooming.minds/