राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा:रायगडसह पालघर,पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट

नाशिक,ठाणे,कोल्हापूर,यवतमाळ,चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट 

0

मुंबई,दि.१९ जुलै २०२३ – मुंबई, पुणे नाशिक,कोकण सह राज्यभर पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. राज्यभरात आज पावसाने धुमाकूळ घातलाय. . या पावसामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.पावसाने विश्रांती घेतल्या मुळे  शेतकऱ्यांची शेतीची कामं खोळंबली होती. अखेर अनेक भागात पावसानं हजेरी लावली आहे. काही ठिकाणी जोरदार पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर रायगड, पालघर, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नाशिक,ठाणे,कोल्हापूर,यवतमाळ,चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.तर उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या मुसळदार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे.रायगडमध्ये आंबेनळी घाटात दरड कोसळली आहे. प्रशासनाकडून नागरिकांनी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.मुंबई आणि ठाण्यात देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील दोन्ही दिवस १०० मिमीहून अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागा तर्फे वर्तवण्यात आला आहे.

रायगड जिल्ह्यातील शाळांना सुट्ट्या 
रायगड जिल्ह्याला हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. गेल्या चार दिवसांपासून रायगडला अक्षरशः पावसाने झोडपलेला आहे. तसेच विविध भागांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटना समोर येत आहेत.  रायगड जिल्ह्यातील चारही नद्यांनी देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे. रायगड जिल्ह्यातील महाड भोईघाट येथील सावित्री नदी मही कावती मंदिर येथील सावित्रीचे पात्र भरले असून या घाटाला पाणी लागले आहे. रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आज (१९ जुलै) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे. डॉ. योगेश म्हसे यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे.

महाबळेश्वरला पावसाचा जोर वाढला 
महाबळेश्वर पर्यटनस्थळी गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने बुधवारी सकाळी महाबळेश्वर-पांचगणी मुख्य रस्त्यावर बगीचा कॉर्नर नजीक पाणी आल्याने वाहतूक काहीकाळ मंदावली होती. या रस्त्यावरून मार्ग काढताना वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागली. तर लिंगमळा परिसर देखील जलमय झाल्याचे पहावयास मिळाले. मंगळवारी रात्री आंबेनळी घाटात पोलादपूर नजीक ठिकठिकाणी दरड कोसळल्याने वाहतूक अद्याप ठप्प आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.