मुंबई – मुंबई हायकोर्टाने ११ वीच्या विद्यार्थांसाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षा रद्द करावी असा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. विद्यार्थ्यांना ११ वी मध्ये प्रवेशासाठी २१ ऑगस्ट रोजी सीईटी परीक्षा नियोजित होती. मात्र, हायकोर्टाने सर्व बाजू ऐकल्यानंतर प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.
१० वीच्या गुणांच्या आधारावर मुलांना अकरावीसाठी प्रवेश द्या, असें हायकोर्टाने सांगितले आहे. दरम्यान, या सीईटीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी राज्य मंडळाने २ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. तर, प्रवेश ११ वी प्रक्रिया कधी सुरु होणार?, याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. त्याच बरोबर सीईटी रद्द करण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यासही न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे हायकोर्टाचा हा निर्णय म्हणजे राज्य सरकारला एक प्रकारे मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.आधीच प्रवेश प्रक्रियेला उशीर झाला असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेशी खेळ करता येणार नाही, प्रवेश प्रक्रिया बदलता येणार नाही. अशाप्रकारचा निर्णय हायकोर्टा ने दिलेला आहे.
तसेच, आता विद्यार्थ्यांना त्यांच्या अंतर्गत मुल्यमापनानुसार इयत्ता दहावीत जे गुण मिळालेले आहेत, त्या गुणांच्या आधारावरच विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावीत प्रवेश दिला जाणार आहे. याचबरोबर, ६ आठवड्यात प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही हायकोर्टा कडून देण्यात आले आहेत. तसेच, करोनाच्या काळात प्रत्यक्ष परीक्षा घेणे मुलांचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. त्यामुळेच न्यायालयाला याप्रकरणी हस्तक्षेप करावा लागला, असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.