Jalgaon Train Accident:जळगावमध्ये रेल्वेची भीषण दुर्घटना :अनेक जणांचा मृत्यू
बंगळुरू एक्सप्रेसची प्रवाशांना धडक
जळगांव ,दि २२ जानेवारी २०२५ –जळगावमध्ये रेल्वेची भीषण दुर्घटना घडली आहे.आग लागण्याच्या भीतीने पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांनी उड्या मारल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोणीतरी रेल्वे थांबवण्यासाठी चेन ओढली पुष्पक एक्सप्रेसने ब्रेक मारल्यामुळे चाकातून अचानक धूर आला. तर यानंतर आगीची अफवा पसरून डब्यातील प्रवाशांनी घाबरुन रुळांवर उडी मारल्या. त्याचवेळी दुसऱ्या दिशेने येणाऱ्या भरधाव बंगळुरु एक्सप्रेसने प्रवाशांना चिरडल्याची घटना जळगाव येथे घडली आहे.प्राथमिक माहिती नुसार या अपघातात ११ लोकांचा मृत्यू झाला असून ८ते १० प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जळगावच्या पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ रेल्वेची ही दुर्घटना घडली आहे.जळगावात परधाडे गावाजवळ पुष्पक एक्स्प्रेसने ब्रेक मारल्याने आगीच्या ठिणग्या उडाल्याचे पाहायला मिळाले. आगीच्या ठिणग्या उडाल्याने रेल्वेमध्ये आग लागल्याची अफवा काही प्रवाशांकडून पसरवण्यात आली. त्यामुळे घाबरलेल्या आणि जीव वाचवण्याच्या भितीने आग लागल्याच्या अफवेनंतर पुष्पक एक्स्प्रेसमधून ३५ ते ४० प्रवाशांनी उड्या मारल्या. दरम्यान समोरून येणाऱ्या दुसऱ्या एका एक्स्प्रेसने या प्रवाशांना थेट उडवलं यामध्ये काही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. ही पुष्पक एक्स्प्रेस लखनऊ वरून मुंबईच्या दिशेने येत होती.