१६ ते २२ जून रंगणार जनस्थान फेस्टिव्हल
जनस्थानच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त नाशिककर अनुभवणार सांस्कृतिक पर्वणी
नाशिक,दि, १२ जून २०२४ – नाशिकच्या सांस्कृतिक जीवनात आधुनिक साधनांच्या उपयोगाने नवीन पर्व सुरू करणाऱ्या ‘जनस्थान’ या व्हाट्सअप ग्रुपचा दहावा वर्धापनदिन दिनांक १६ जून ते २२ यादरम्यान नाशिकमध्ये साजरा होत असून महोत्सवाच्या तयारीला वेग आला असल्याची माहिती ग्रुपचे प्रमुख अभय ओझरकर यांनी दिली.
नाशिक ही सांस्कृतिक भूमी म्हणून ओळखली जाते. पं.विष्णू दिगंबर पलुस्कर, दादासाहेब फाळके, स्वातंत्र्यवीर सावरकर, कुसुमाग्रज, कानेटकर, बाबूराव बागूल यांच्यासारखे एक ना अनेक देदीप्यमान तारे नाशिकच्या नभांगणात चमकले. त्यांचीच परंपरा वेगवेगळ्या माध्यमातून पुढे नेणारे कलावंत आजही नाशिकचे नाव भारतीय पातळीवर नेत आहेत. या सगळ्यांचा एकत्रित असणारा ‘जनस्थान’ हा व्हाट्सअप ग्रुप दरवर्षी आपला वर्धापनदिन अनोख्या पद्धतीने साजरा करतो.
यंदा हा सात दिवस चालणारा उत्सव नाशिकमध्ये साजरा होत असून चित्र – शिल्प प्रदर्शन, आयकॉन पुरस्कार सोहळा,नृत्य, गजल गायन असा भरगच्च कार्यक्रम होणार आहे.
या सोहळ्यासाठी मान्यवर प्रमुख पाहुणे येणार असून त्यांचे अनुभवी विचार या महोत्सवाद्वारे नाशिककरांना ऐकता येतील. ग्रुपमध्ये असलेल्या चित्रकार आणि शिल्पकार यांच्याबरोबरच शहरातील इतर मान्यवर चित्रकार छायाचित्रकार यांच्या कलाकृतीचे दृश्यभान हे प्रदर्शन कुसुमाग्रज स्मारकामध्ये दि १६ ते १९ असे चार दिवस भरणार आहे. याच प्रदर्शनात कलावंतांनी आपली व्यावहारिक आणि कलात्मक बाजूची सांगड कशी घालावी आणि त्यांनी जगात कलावंत म्हणून वावरतानाच आपला व्यवहार कसा जपावा; हे सांगणारी ‘हेल्थ आणि वेल्थ’ ही व्याख्यानमाला दि. १७ रोजी होणार आहे, १८ आणि १९ असे दोन दिवस नाशिक कलाक्षेत्रातील उगवत्या ता गप्पांचा कार्यक्रम होईल; त्याचा लाभ सर्व नाशिककरांना घेता येईल.
दि.२० जून या दिवशी आयकॉन पुरस्काराचे वितरण होणार असून यामध्ये तिघांना आयकॉन तर एकास युवा आयकॉन पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल. दि. २० पासून पुढील कार्यक्रम सायंकाळी साडेसहा वाजता प. सा. नाट्यमंदिरात होणार आहेत. आयकॉनसाठीची निवड प्रक्रिया सुरू असून कलाक्षेत्रातील प्रख्यात मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा साजरा होणार आहे.
दि. २१ जून या दिवशी ‘दशावतार’ हा नृत्यात्मक कार्यक्रम साजरा होणार असून त्यामध्ये भगवान विष्णूचे दहा अवतार शास्त्रीय नृत्यातून दाखवले जाणार आहेत. यासाठी नाशिकमधील विविध मान्यवर नृत्यांगना आपापला विषय घेऊन काम करत असून दहावा वर्धापन दिन या एका सूत्राला समोर ठेवून दशावतार हा कार्यक्रम बसवण्यात आला आहे.
दि. २२ जून या दिवशी गझलचा कार्यक्रम होणार असून दहा गझलकार यासाठी गायकांनी डोळ्यासमोर ठेवले आहेत. ‘दिल-ए-नादान’ असे या कार्यक्रमाचे शीर्षक आहे. त्यामुळे या अनोख्या महोत्सवाचा नाशिककरांनी आनंद घ्यावा असे आवाहन ग्रुपचे प्रमुख अभय ओझरकर, विनोद राठोड, स्वानंद बेदरकर यांनी केले आहे.
कार्यक्रमासाठी दीपक बिल्डर्स चे दीपक चंदे, एस डब्लू एस चे रघुवीर अधिकारी , गोपाळ पाटील,रेडिओ मिर्चि, राजेश पिंगळे,हॉटेल पंचवटी यात्रीचे भुतडा ,सचिन गीते यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.