नाशिक – पावसाच्या बेछूट सरींबरोबर जेव्हा कविता रिमझिम बरसू लागते तेव्हा आपल्या अंतर्मनावर शब्दांचा शिडकावा एक वेगळीच तृप्ती देऊन जातो. काहीश्या अशाच तृप्तीचा आनंद जनस्थान कलारंगच्या संपन्न झालेल्या मैफिलीत रसिकांनी घेतला.
शब्द माझे चेहरे अन् हे शब्द माझा आरसा आहे”
असं म्हणणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या कवितांनी जनस्थान कलारंगभध्ये एक वेगळाच रंग भरला.
गायनाच्या अरण्यातून मुशाफिरी केल्यानंतर मधुर बासरीच्या मनमोहक सुरांनी चिंब भिजल्या नंतर शांता शेळके यांच्या कवितेतील शब्दांची जादू मला रंगाच्या रसिकांनी अनुभवली. येत्या ऑक्टोबरपासून शांताबाई शेळके यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे या निमित्ताने जनस्थान परिवारातील सख्यांनी शांताबाईंच्या सहजसुंदर आणि तरल काव्याची ही सुरेख गुंफण कलारंग मध्ये सादर केली.
पैठणी या शीर्षकांतर्गत सादर झालेल्या या कार्यक्रमाची संकल्पना विद्या करंजीकर यांची होती तर कार्यक्रमाचं संहितालेखन अपर्णा क्षेमकल्याणी यांनी केलं होतं. यात जनस्थान च्या सदस्य व नामवंत अभिनेत्रींनी सहभाग घेतला. शांताबाईंची “पैठणी” ही असंख्य धाग्यांचा पट उलगडणारी कविता विद्या करंजीकर यांनी सादर केली. शांताबाईंच्या सर्व प्रकारच्या लेखनामध्ये विशेष गाजलेल्या दोन रचना म्हणजे “शोध” व “कळ्यांचे दिवस फुलांच्या राती” या रचना पल्लवी पटवर्धन व शुभांगी पाठक यांनी पेश करुन वाहवा मिळवली. शांताबाईंच्या सातत्याचा सराव आणि जीवनाकडे बघण्याची सकारात्मक दृष्टी त्यांच्या कवितांमधून कायम दिसून येते.
यापैकीच हे एक झाड आहे,दान या कविता लक्ष्मी पिंपळे व शुभांगी पाठक यांनी सादर केली.शांताबाईंच्या लेखणीतून अनेक गीतांनी, कवितांनी जन्म घेतला. कवितेच्या एकेका ओळीतून अनेक प्रकारचे कल्पनाविलास रसिकांच्या भेटीला येत गेले. अनुभवाच्या सर्वोच्च टोकाला स्पर्श करून आल्यावर सामान्य माणसाच्या हाती रितेपण येतं मात्र शांताबाई म्हणजे साक्षात वागेश्वरी, त्यांनीच ज्या शब्दाला स्पर्श केला त्या शब्दाचं गीत झालं. त्यातुनच बहरलेली “हे विश्व प्रेमिकांचे” “आठवते का” ह्या कविता लक्ष्मी पिंपळे यांनी, “रात रंगली रास रंगला” ही कविता विद्या करंजीकर यांनी तर”एकाकी” ही रचना पल्लवी पटवर्धन यांनी सादर केली.”चाहुल ये कुणाची” ही कविता विद्या करंजीकर यांनी पेश केली.
शांताबाईंच्या शब्दांच्या चांदण्या मध्ये रात्र चढत होती पण ही मैफिल थांबू नये,संपू नये असं प्रत्येक रसिकाला वाटत होतं. शांताबाई शेळके यांच्या गीतांनी कवितांनी मराठी माणसाचा जग व्यापून टाकलं आहे. या मैफिलीचा समारोप करण्याआधी विद्याताई करंजीकर यांनी त्यांच्या अभिनयातून साक्षात शांताबाई शेळके यांना जनस्थान कलारंग च्या मैफिलीमधे अवतरवलं.”असेन मी नसेन मी तरी असेल गीत हे”असे म्हणणाऱ्या शांताबाई भेटल्याची साक्षात अनुभूती रसिकांना मिळाली.
प्रत्येक कवितेच्या सादरीकरणातुन रसिकांची मिळणा-या दादरुपी पावतीमुळे.कलाकारांची ऊर्जा आणि हुरूप वाढत होता.,सध्या कोणीच एकमेकांना भेटू शकत नसल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने का होईना अश्यापद्धतीने कार्यक्रमांचे आयोजन करून प्रत्येक कलाकार आपल्या जगात जातोय ह्यात शंकाच नाही..प्रत्येक शुक्रवार हा कलारंग ने सजवून उजळलेला असतो..जनस्थान कलारंगच्या निमित्ताने आम्हा प्रत्येक कलाकाराच्या मनातल्या सकारात्मक तरंगाची अनुभुती जनस्थानीय घेत आहेत …
“शब्द हा मला जगाशी जोडणारा सर्वात मोठा दुवा आहे. माझ्या कवितेतून चाललेला हा माझा आणि माझ्या संदर्भात जगाचा शोध कधीच संपू नये असं मला वाटतं” हे म्हणणार्या शांताबाई त्यांच्या शब्दांमधून, कवितांमधून कला रंगाच्या रसिकांना भेटल्या आणि या भेटीनंतर शुक्रवारी होणाऱ्या कलारंग ची उत्सुकता मनात घेऊन रसिकांनी कलारंग मैफिलीचा निरोप घेतला