ग,ग गणेशाचा, तसंच ग,ग, गणवेशाचाही !
आदिती तुषार मोराणकर (शिक्षण विश्लेषक) (बालक पालक नात्यावर आधारित) बाल मानसशास्त्र व संगोपन लेखमाला : ३१
आदिती तुषार मोराणकर (शिक्षण विश्लेषक)
आपल्या घरात एखाद्याला सर्दी पडसे झाले तर आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर एकंदरीत प्रकृती बघून औषधाचा डोस ठरवून देतात. त्यानंतर त्या व्यक्तीची लागण घरातल्या इतरांनाही होते आणि संपूर्ण कुटुंब सर्दी पडश्याचा त्रास सहन करतं, पण तेव्हा आपण पहिल्या व्यक्तीला दिलेल्या औषध गोळ्या एकमेकांमध्ये वाटून खात नाही. प्रत्येक जण डॉक्टर कडे जाऊन वेगवेगळ्या औषध गोळ्या घेऊन येतो. बरोबर ना? मग हेच तत्व मुलांना शाळेत घालतांना आपण का वापरत नाही ? “माझ्या मुलाची प्रकृती आणि प्रवृत्ती बघून याला शिक्षण द्या!” हा अट्टाहास आपण का धरत नाही?
मुलांना योग्य ते देण्याचा आपला प्रयत्न असतो आणि पालक म्हणून तो असायलाच हवा; पण म्हणून आपण आपल्या मुलांना खरोखरच योग्य ते देतो आहे का? याची चाचपणी करण्यासाठी हा लेख!
मुलं ३ वर्षांची झाली की आपण खेळघर शोधतो, त्याला प्रीस्कुल किंवा किंडरगार्टन असंही म्हणतात. म्हणतांना जरी काहीही म्हटलं तरी ती जागा प्रेशर कुकर तर नाही ना? तिथे आपल्या मुलांना आपण ‘ॲडमिट’ तर करत नाही ना? तिथे खरोखर आपल्या हिऱ्याला पैलु पाडले जातील की नाही हे तपासुन पहायला हवं.
मेंदू शास्त्रावर आधारित शिक्षणाच्या नव्या प्रयोगांमधून मुलांचं शून्य ते आठ वर्ष हे वय सर्वांगीण विकासाचे अतिशय मौल्यवान वय समजले जाते.मुल कसे वाढते,कसे घडत जाते, मुलाचा स्वभाव घडतांना त्यावर कसला कसला परिणाम होतो? या सगळ्याचा शोध घेऊन त्याच्या आधारावर बाल शिक्षण दिले गेले पाहिजे मुलांच्या रोजच्या वागण्या-बोलण्याचं निरीक्षण करून त्यांच्या विचारांचा अंदाज घेतला पाहिजे.
मुलांना शाळेत पाठवतांना आपण त्यांच्या मनाची नक्की काय तयारी करतो हे अतिशय महत्त्वाचं आहे. कित्येक घरातून “तू घरात त्रास देतोस ना म्हणून तुला शाळेत टाकणार आहे. तिथे तू त्रास दिलास तर तुला डांबून ठेवतील. संडास मध्ये कोंडतील, अभ्यास केला नाही तर तुला मारतील.” असे सांगितले जाते तर काही ठिकाणी “तू जिथे जाणार आहेस ती शाळा एक आनंददायी जागा आहे. तिथे तुला विविध प्रकारची खेळणी खेळता येणार आहेत. वेगवेगळ्या नवीन गोष्टी शिकता येणार आहेत. नवे मित्र मैत्रिणी मिळणार आहेत.” अशा पद्धतीने शाळेचे वर्णन मुलांसमोर केलं जातं.
घरून कळत नकळत अशी शाळेची प्रतिमा घेऊन ही मुलं जेव्हा शाळेत येतात आणि दुर्दैवाने जर त्या शाळेतील वातावरण अतिशय निरस असले, शाळेमध्ये शिस्तीचा अवास्तव बडगा उभारलेला असेल तेव्हा त्या शिस्तीच्या दबावाखाली वावरतांना मुलांना अनेकदा शिक्षा होण्याची भीती सतावत असते. यातून मानसिक ताण निर्माण होतो आणि अशी मुलं कधीही शैक्षणिक वातावरणात रमत नाहीत.
आपल्या घरात एखाद्याला सर्दी पडसे झाले तर आपण डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर एकंदरीत प्रकृती बघून औषधाचा डोस ठरवून देतात. त्यानंतर त्या व्यक्तीची लागण घरातल्या इतरांनाही होते आणि संपूर्ण कुटुंब सर्दी पडश्याचा त्रास सहन करतो पण तेव्हा आपण पहिल्या व्यक्तीला दिलेल्या औषध गोळ्या एकमेकांमध्ये वाटून खात नाही. प्रत्येक जण डॉक्टर कडे जाऊन वेगवेगळ्या औषध गोळ्या घेऊन येतो ना मग हेच तत्व मुलांना शाळेत घालताना आपण का वापरत नाही ? “माझ्या मुलाची प्रकृती आणि प्रवृत्ती बघून याला शिक्षण द्या!” हा अट्टाहास आपण का करत नाही ? जशी प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते आणि त्याला लागू पडणारी औषधाची मात्रा वेगळी असते तशीच प्रत्येक मुलाची शिकण्याची क्षमता वेगळी असते म्हणूनच व्यक्तिगत अनुभवांवर आधारित शिक्षणाची प्रत्येक मुलाला गरज असते हे समजून घ्यायला हवं.
एकसारखा गणवेश घालून शाळेत जाणं ठीक आहे पण तिथे जाऊन सगळ्यांना एकाच मापात तोलणं अतिशय चूक आहे. किमान जेव्हा मुलांना त्यांच्या ‘स्व’त्वाची जाणीव होत असते, त्यांच्या स्वभावाची जडणघडण होत असते तेव्हा त्यांना त्यांच्या प्रकृती प्रमाणे भिन्न भिन्न अनुभव येत असतात.
त्या भिन्न भिन्न अनुभवातून मुलांना जी अनुभूती येत असते त्यातूनच मुलांच्या जीवनाचा पाया घडत असतो. अशावेळी त्यांना येणारे अनुभव नाकारून जर आपण ‘सिद्ध करून ठेवलेले शिक्षण’ दिलं तर त्याचा काहीही उपयोग मुलांना होत नाही.
माझ्या शाळेत येणारी चार वर्षाची आद्या एक दिवस सहज मला म्हणाली,”टीचर तुम्हाला माहिती आहे आता मी मोठी झाली आहे आणि माझे आई-बाबा म्हातारे झालेत.” चार वर्षाच्या आद्याचं बोलणं ऐकून मला हसू आलं पण हि असं का म्हणते आहे हे कुतूहल जागं झालं. मी तिला म्हटलं,”आद्या,आई बाबा म्हातारे झालेत असं तुला का वाटलं?” त्यावर तिने दिलेलं उत्तर खरोखर विचार करायला लावणार होतं. ती म्हणाली,”टीचर, तुम्हाला माहिती आहे? आम्ही जेव्हा घरातून बाहेर पडतो ना तेव्हा माझा एक हात आई पकडते आणि दुसरा हात बाबा पकडतात. मी त्यांना सांभाळून नेते म्हणजे मी मोठी झाली आणि ते म्हातारी झाले ना!”
खरंच किती निरागस विचार आहे हा! ‘आपण मोठे झाल्यानंतर आपल्या आई-वडिलांची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागणार आहे’ याची जाणीव इतक्या लहान वयात मुलांना असते आणि ते आपला हात धरून चालताहेत यामागे ‘ते आपली काळजी करतायेत’ असा अर्थ नसून ‘आता आपण मोठे झालो आहोत आणि त्यांना आपली गरज आहे’ हा अर्थ आद्यानी लावला याबद्दल तिचं कौतुकच करायला हवं नाही का!
असे अनेक अनुभव शाळेत आम्हाला येत असतात एखाद्या प्रसंगाकडे बघण्याचा आपल्या दृष्टिकोन आणि त्याच प्रसंगाकडे बघण्याचा लहान मुलांचा दृष्टिकोन यात जमीन अस्मानाचा अंतर असतं. प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा त्यांचा निष्पाप निरागस दृष्टिकोन आपल्यालाही नवीन काहीतरी शिकवत असतो पण आपण मात्र “पक्ष साध्य सिद्धता” या त्रिसूत्री वर आधारित शिक्षण मुलांच्या माथी मारत असतो.
एक सजग पालक म्हणून या गोष्टींचा आपण सखोल विचार करायला हवा कारण एकदा निघून गेलेली वेळ, त्या वेळात आपल्या हातातली मुलांना घडवण्याची संधी आणि मुलांचं हे वय आणि आपल्याला परत मिळणार नाही हे लक्षात ठेवा. ‘पेराल ते उगवेल’ या म्हणीनुसार आज आपण मुलांना जे काही देणार आहोत तेच घेऊन मुलांची जडणघडण होणार आहे म्हणूनच आपली जबाबदारी मोठी आहे. सगळ्या गोष्टींचा योग्य तो विचार करूनच तुमच्या मुलांसाठी एक आनंददायी जागा, जिथे ते फुलतील, खुलतील, त्यांच्या कल्पना बहरतील, त्यांना स्वतःचं म्हणणं सांगायला मोकळीक मिळेल अशी जागा शोधा आणि तुम्हीही निश्चिंत व्हा. परत भेटूया पुढच्या लेखात !
आदिती तुषार मोराणकर (शिक्षण विश्लेषक)
संचालिका : ईस्कुलिंग डिजीस्मार्ट किंडरगार्टन ,
इंदिरानगर, नाशिक.
![Aditi Morankar](https://janasthanonline.com/wp-content/uploads/2021/07/Aditi-Morankar.jpg)
आज साथी हात बढाना या युक्तीप्रमाणे पती-पत्नी दोघांनाही अर्थाजनासाठी घराबाहेर पडावे लागते आणि ती आता काळाची गरजही होऊ लागली आहे. स्त्रियांच्या बाबतीत ती गरज निव्वळ अर्थाजन हा एकच उद्देश नसून स्व विकासासाठी व मानसिक समधनासाठीही ते आवश्यक झाले आहे. पण असं असतानाही या घराबाहेर पडलेल्या स्त्रीला ओढ लागते ती मातृत्वाची आणि ते मातृत्व पेलवताना तिला बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यापैकी सर्वात जास्त मनावर दडपण निर्माण करणारी समस्या म्हणजे बाळाचे संगोपण. त्यातही आज कालानुरूप विभक्त कुटुंब पद्धतीमुळे ही समस्या असा दाम्पत्यापुढे एक मोठी समस्या म्हणून उभी राहते. त्यावेळी असा बालसंगोपन संस्थांची खूप मदत होते.