नवी दिल्ली -प्रसिद्ध कथक नर्तक आणि गुरू पंडित बिरजू महाराज यांचं पहाटे ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ८३ वर्षाचे होते. त्यांच्या निधनामुळे सर्व कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. बिरजू महाराज यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील साकेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.पद्मविभूषण पुरस्कार विजेते बिरजू महाराज यांनी रविवारी आणि सोमवारी मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला.त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली.
पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित झालेले पंडित बिरजू महाराज कथक नर्तक होतेच, याशिवाय ते शास्त्रीय गायकही होते. लखनऊच्या कथ्थक कुटुंबात जन्मलेल्या बिरजू महाराजांचे वडील आच्छान महाराज आणि काका शंभू महाराज यांचे नाव देशातील प्रसिद्ध कलाकारांमध्ये होते. त्यांचे मूळ नाव ब्रिजमोहन मिश्रा होते. वडिलांचे अकाली निधन झाल्याने कुटुंबाची जबाबदारी लवकरच त्यांच्या खांद्यावर आली. त्यांनी काकांकडून कथ्थकचे प्रशिक्षण घेण्यास सुरवात केली.
पंडित बिरजू महाराज यांनी वयाच्या १३ व्या वर्षापासून नृत्य शिकवण्यास सुरुवात केली होती. अनेक प्रसिद्ध चित्रपटांचं नृत्य दिग्दर्शनही त्यांनी केलं. त्यांच्या निधनानं नृत्यूगुरू हरपल्याची भावना व्यक्त केली जातेय..