झी मराठी अवॉर्ड्स २०२१ मध्ये कतरीना कैफची हजेरी
मुंबई – दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने झी मराठी अवॉर्ड्स २०२१ हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. कलाकारांचे दिलखेचक परफॉरमन्स, विनोदी स्किटस् आणि सोबतीला कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणतं कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरेल याची लागलेली उत्सुकता अशा वातावरणात हा कार्यक्रम रंगला. तसेच रेड कार्पेटवर सेलिब्रिटीजनी दिमाखदार पोषाखांत दमदार हजेरी लावली. यंदाचं वर्ष अजूनच खास आहे कारण यावर्षी मराठी कलाकारांसोबत हिंदीमधल्या सुप्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली.
संपूर्ण भारताला आपल्या अभिनय आणि डान्सने वेड लावणारा प्रेक्षकांचा लाडका अभिनेता गोविंदा, तसेच सुपरहिट चित्रपटांचा सुपरहिट दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि आपल्या मनमोहक अदांनी आणि सौंदर्याने सगळ्यांना घायाळ करणारी अभिनेत्री कतरीना कैफ यांनी यावर्षी झी मराठी अवॉर्ड्सना उपस्थिती दर्शवली. त्याच सोबत प्रेक्षकांच्या लाडक्या मालिकांचे कलाकार देखील ग्लॅमरस अंदाजात या सोहळ्यासाठी सज्ज झाले होते.
प्रत्येक मालिकेचा एक कलर कोड ठरवलेला होता. मन झालं बाजींद – पिवळा, मन उडु उडु झालं – लाल, येऊ कशी तशी मी नांदायला – निळा, माझी तुझी रेशीमगाठ – जांभळा, तुझ्या माझ्या संसाराला काय हवं – भगवा, ती परत आलीये – काळा, रात्रीस खेळ चाले ३ – पांढरा या रंगात रेड कार्पेटवर सेलिब्रिटीजनी दिमाखदार पोषाखांत दमदार हजेरी लावली आणि सोहळा अजूनच रंगतदार केला. झी मराठीवरील मालिकांपैकी यंदा मन झालं बाजींद, मन उडु उडु झालं, येऊ कशी तशी मी नांदायला, माझी तुझी रेशीमगाठ, तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं!, ती परत आलीये, रात्रीस खेळ चाले ३ या मालिकांमध्ये तीव्र चुरस बघायला मिळणार आहे. ‘झी मराठी अवॉर्ड’ सोहळा रविवार ३० ऑक्टोबर संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर प्रसारित होईल.