‘कृषीथॉन’ प्रदर्शनाचा गुरुवार दि.२४ नोव्हेंबर पासून श्रीगणेशा 

कृषी तंत्रज्ञानावर आधारित कंपन्या ठरणार विशेष आकर्षण आयोजक संजय न्याहारकर यांची माहिती 

0

नाशिक,२३ नोव्हेंबर २०२२ – बदलत्या कृषी क्षेत्रामध्ये नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कृषीथॉन’ प्रदर्शनाचे गुरुवार दि. २४ ते २८ नोव्हेंबर २०२२ दरम्यान ठक्कर डोम, एबीबी सर्कल जवळ त्रंबकरोड येथे  आयोजन करण्यात आले आहे, ड्रोन, विविध अॅप्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांसह कृषी निविष्ठा संस्था, कंपन्यांनी घेतलेला सहभाग यंदाच्या कृषीथॉनचे वैशिष्ट्य आहे, अशी माहिती कृषीथॉनचे आयोजक संजय न्याहारकर यांनी दिली. कोरोना महामारीच्या तब्बल दोन वर्षांनंतर कृषीथॉनच्या पंधराव्या आवृत्तीचे आयोजन करण्यात येत आहे. पाच दिवस चालणाऱ्या प्रदर्शनाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत श्री. न्याहारकर बोलत होते.

कृषीथॉनचे आयोजक संजय न्याहारकर यांच्यासह साहिल न्याहारकर, नाशिक अॅग्रीकल्चर डीलर्स असोसिएशनचे (नाडा) अध्यक्ष विजयनाना पाटील, उपाध्यक्ष अरुण मुळाणे, लक्ष्मीकांत जगताप आणि मंगेश तांबट या वेळी उपस्थित होते. संजय न्याहारकर म्हणाले, की शेतकरीवर्गामध्ये या प्रदर्शनाची ओळख अधोरेखित झाली आहे. बदलत्या प्रवाहात शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी या उद्देशाने या कृषीथॉन प्रदर्शनाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान पोहचविण्याचा प्रयत्न अखंडपणे सुरू आहे. कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार-प्रसाराचा हा वसा सार्थ ठरवत कृषी क्षेत्राचे उत्पादन वाढावे, आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचावे याकरिता विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

कृषिक्षेत्राच्या विकासासाठी नवीन तंत्रज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्याला देण्याचा आमचा प्रयत्न असून कृषी क्षेत्रासह संलग्न क्षेत्राचा विकास व्हावा असाही प्रयत्न करण्यात आला आहे. कृषी क्षेत्रात मोठया प्रमाणात बदल होत आहेत. शेतीमध्ये उत्पादनाबाबत वेगवेगळे प्रयोग केले जातात. नवनवीन तंत्रज्ञान, अवजारे विकसित केले जातात. मात्र त्यांची माहिती तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे कृषीथॉन प्रदर्शनासारख्या उपक्रमाच्या माध्यमातून हे प्रयोग एका छताखाली शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहे. साहिल न्याहारकर म्हणाले, की कृषीथॉनच्या १५ व्या आवृत्तीत तीनशेहून अधिक कंपन्या सहभागी होणार आहेत.

‘प्रयोगशील युवा शेतकरी पुरस्कार’ (पुरुष गट), ‘प्रयोगशील युवा शेतकरी पुरस्कार’ (महिला गट), ‘प्रयोगशील युवा कृषी उद्योजक पुरस्कार’, ‘प्रयोगशील युवा संशोधक पुरस्कार’, ‘प्रयोगशील कृषीविस्तार कार्य’, ‘गुणवंत कृषी ‘विद्यार्थी पुरस्कार’ या पुरस्काराचा समावेश आहे. कृषीथॉनमध्ये यंदा बोल भिडू… कृषीथॉन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा घडवून आणण्यासाठी प्रश्न शेतकऱ्यांचे, मार्गदर्शन तज्ज्ञांचे’ या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये द्राक्ष, कांदा, टोमॅटो, डाळिंब उत्पादक, दुग्ध व्यावसायिक आणि पशुपालकांच्या प्रश्नावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. नाडाचे उपाध्यक्ष अरुण मुळाणे म्हणाले, की कृषीथॉन हे केवळ प्रदर्शन नसून ते शेतकऱ्यांचे प्रश्न, प्रश्न मांडण्याचे आणि त्यांचे निराकरण करण्याचे व्यासपीठ आहे, हे प्रदर्शन शेतकऱ्यांना आवश्यक आहे. कृषीथॉनमधील सर्वात सुंदर संकल्पना म्हणजे शेतकऱ्यांचा सन्मान करणे होय. विशेषतः महिला शेतकऱ्यांचा सन्मान करणारा असा आकर्षक पुरस्कार सोहळा इतर कोणत्याही प्रदर्शनात नाही. कृषीथॉनमध्ये यंदा तीनशेहून अधिक नामांकित कंपन्या आणि संस्था प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत. तसेच कृषी निविष्ठा उत्पादक, बियाणे, अवजारे, ट्रॅक्टर, ठिबक व तुषार सिंचन, फवारणी यंत्रे उत्पादक कंपन्या, बँका,विमा कंपन्या, कृषी विद्यापीठे, कृषी संशोधन केंद्रे, कृषी विज्ञान केंद्रे, विविध कृषिपूरक उद्योग, नर्सरी, अन्नप्रक्रिया उद्योग तसेच कृषीविषयक शासकीय विभागांचा प्रदर्शनात सहभाग असेल,

कृषीथॉनचे यंदाचे आकर्षण : 
२४ नोव्हेंबर – कृषीथॉन उद्घाटन सोहळा, प्रश्न दूध उत्पादकांचे मार्गदर्शन तज्ज्ञांचे 
२५ नोव्हेंबर – कृषीथॉन युवा सन्मान, प्रश्न द्राक्ष उत्पादकांचे मार्गदर्शन तज्ज्ञांचे 
२६ नोव्हेंबर- कृषीउद्योग परिसंवाद व आदर्श कृषी सेवा केंद्र पुरस्कार वितरण,प्रश्न कांदा-टोमॅटो उत्पादकांचे मार्गदर्शन तज्ज्ञांचे 
२७ नोव्हेंबर- कृषी क्षेत्रातील महिलांचा सन्मान – प्रश्न डाळिंब उत्पादकांचे मार्गदर्शन तज्ज्ञांचे 
२८ नोव्हेंबर- कृषीथॉन गुणवंत विद्यार्थी पुरस्कार वितरण

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.