पुणे,दि,५ मार्च २०२४ –पुण्यातील कात्रज भागातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयातील बिबट्या पिंजऱ्यातून पसार झाला आहे.हा बिबट्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आला होता. त्याचा शोध संग्रहालय प्रशासनाकडून सुरु आहे.मात्र तो सापडला नसल्याने प्राणी संग्रहालय प्रशासनाचा गलथान कारभार समोर आला आहे.प्राणी संग्रहालयात वेगवेगळ्या प्रकारचे शंभरहून अधिक प्राणी आहेत.तसेच प्राणीसंग्रहालयाच्या शेजारी दाट लोकवस्ती आहे.बिबट्या पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्राणी संग्रहालय पर्यटकांसाठी आज बंद ठेवण्यात आले होते.
राजीव गांधी प्राणी संग्रहालयात तीन मादी आणि एक नर जातीचा बिबट्या आहे. त्यामधील नर जातीचा बिबट्या पसार झाला आहे. प्राण्यांच्या अदलाबदली कार्यक्रमांतर्गत हा बिबट्या कर्नाटकमधील हंपी येथून आणण्यात आला होता. प्राणी संग्रहालयातील प्राण्यांच्या अनाथालयात काही दिवसांपासून त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले होते.
पळालेल्या बिबट्या कात्रज प्राणी संग्रहालयाच्या आवारातच असल्याचं सांगितलं जातंय.त्याला पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरु आहेत.हा बिबट्या मानवी वस्तीत शिरु नये यासाठी प्रयत्न सुरु असून त्याला लवकरात लवकर पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आलेत. पिंजऱ्याचे लोखंडी गज वाकवून तो पळाल्याचा दावा प्राणी संग्रहालयाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आला. एवढ्या मजबूत पिंजऱ्यातून बिबट्या बाहेर आल्याने एकच खळबळ उडाल्याचं दिसून येतंय.
बिबट्या पसार झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्राणी संग्रहालय पर्यटकांसाठी आज बंद ठेवण्यात आले होते. सकाळपासून बिबट्याला शोधण्यासाठी प्राणी संग्रहालयात पथके तैनात करण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत बिबट्या निदर्शनास आला नाही.