मुंबई,दि,२८ जुलै २०२४ –महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी.पी.राधाकृष्णन यांची नियुक्ती झाली आहे.मध्यरात्रीनंतर १ वाजता राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी या नियुक्त्या केल्याचं पत्रक राष्ट्रपती भवनाकडून जारी करण्यात आलं. विद्यमान राज्यपाल रमेश बैस यांची मुदत आज म्हणजेच २८ जुलै रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे राज्यात नवीन राज्यपालांची नियुक्ती केली जाईल असे संकेत होते.मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळामध्ये नियुक्त झालेल्या राज्यपालांना मुदतवाढ देण्यात आली नव्हती. यामुळे मुदत संपणाऱ्या राज्यपालांना आणखी संधी दिली जाण्याची शक्यता कमीच होती.
सी.पी.राधाकृष्णन या आधी झारखंडचे राज्यपाल होते.दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकांची तयारी सुरु आहे.अशातच राधाकृष्णन यांची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.तर दुसरीकडे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सी.पी.राधाकृष्णन हे मागील पाच वर्षातील महाराष्ट्राचे तिसरे राज्यपाल ठरले आहेत.२०१९ साली भगतसिंह कोश्यारी यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आलेली. त्यानंतर ५ सप्टेंबर २०१७ ते १७ फेब्रुवारी २०२३ दरम्यान कोश्यारी राज्यपाल होते. त्यानंतर रमेश बैस यांनी १८ फेब्रुवारी २०२३ ते २८ जुलै २०२४ दरम्यान महाराष्ट्राचं राज्यपालपद भूषवलं. आता राज्याला सी. पी. राधाकृष्णन यांच्या रुपात २४ वे राज्यपाल मिळाले आहेत.
दक्षिणेमधील भारतीय जनता पार्टीच्या सर्वात विश्वासार्ह नेत्यांमध्ये सी.पी.राधाकृष्णन यांचा समावेश होतो.सी.पी.राधाकृष्णन हे ६७ वर्षांचे आहेत.ते भाजपाचे नेते असून त्यांचा जन्म ४ मे १९५७ साली तिरुपूरमध्ये झाला आहे. वयाच्या १६ व्या वर्षापासूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी काम करु लागले. त्यांनी जनसंघासाठीही काम केलं. कोइमतूर मतदारसंघामधून सी. पी. राधाकृष्णन दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी तामिळनाडूचे भाजपा प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे. २००४ ते २००७ दरम्यान ते तामिळनाडूमध्ये पक्षाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. त्यांनी राज्यात पक्षाध्यक्ष असताना काढलेली रथयात्रा चांगलीच गाजली होती. ही रथयात्रा तब्बल तीन महिने सुरु होती. त्यांनी संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेमध्ये भारताचं प्रतिनिधित्वही केलं आहे.
नवे राज्यपाल खालीलप्रमाणे :
सी. पी. राधाकृष्णन् – महाराष्ट्र
हरिभाऊ किसनराव बागडे – राजस्थान
संतोषकुमार गंगवार – झारखंड
रमण डेका – छत्तीसगड
सी. एच. विजयशंकर – मेघालय
ओमप्रकाश माथूर – सिक्किम
गुलाबचंद कटारिया – पंजाब, चंदीगड
लक्ष्मण प्रसाद आचार्य – आसाम, मणिपूर (अतिरिक्त कार्यभार)
जिष्णू देव वर्मा – तेलंगणा
के. कैलाशनाथन – पुद्दुचेरी (उपराज्यपाल)