मतदान प्रक्रियेसह भ्रष्ट राजकीय व्यवस्थेवर भाष्य करणारे नाटक”फुली”
६३ वी हौशी मराठी राज्यनाट्य स्पर्धा,नाशिक केंद्र
मानवता बहुउद्देशीय विकास संस्था ,धुळे, संचलित स्कूल ऑफ हार्टस,नाशिक संस्थेतर्फे फुली हे नाटक सादर करण्यात आले. लोकांनी लोकांच्या हितासाठी लोकांकरवी चालवलेले लोक कल्याणकारी राज्य म्हणजे लोकशाही. अशी थोडक्यात लोकशाहीची व्याख्या मांडली जाते आणि हीच लोकशाही आज ७५ वर्षांपूर्वी स्वातंत्र भारताने स्वीकारून संविधान रूपी घटनेच्या माध्यमातून भारत देशात रुजवली. यातीलच एक महत्त्वाचा भाग म्हणजे निवडणूक प्रक्रिया. या प्रक्रियेत वर्षानुवर्षे विविध माध्यमातून आवाज उठवण्यात आला व ही प्रक्रिया अधिक निपक्ष:पाती कशी होईल यावर प्रबोधनाचा विविध अंगाने प्रयत्न झालाय. याच विषयाशी निगडित मात्र जरा वेगळ्या मार्गाने नाटकाचे माध्यम वापरत एका वेगळ्या अंगाने नाट्यकलाकृतीतून प्रबोधन करण्याचा ध्यास मनात ठेवून अशा सुंदर संकल्पनेवर आधारित नाट्य कलाकृती म्हणजे “फुली”.
फुली हा शब्द मराठी जन माणसात वेगवेगळ्या अंगाने जरी प्रचलित असला तरी सदर नाटकात राजकीय व्यवहारात मतदान प्रक्रियेत फुली शब्दाला खूप वेगळे महत्त्व दिले जाते. अर्थात न आवडत्या उमेदवाराच्या नावासमोर फुली मारून आवडत्या उमेदवाराच्या नावा समोर किंवा निशाणीवर शिक्का किंवा ईव्हीएम द्वारे बटन दाबून मत देणे अशी ही फुली संकल्पना. मात्र नेमकं या फुली संकल्पनेचा गैरवापर करत काही भ्रष्ट राजकीय व्यवस्थापकांनी किंवा ठराविक राजकारण्यांनी फुली विकत घेऊन चक्क मतदान प्रक्रियेत प्रचंड गोंधळ निर्माण करण्याची प्रथाच वर्षानुवर्ष सुरू केली. ज्याचा मतदान प्रक्रियेवर प्रचंड वाईट परिणाम पडून देशाच्या विकासात अडसर निर्माण होत गेलाय आणि नकळत मतदार राजा देखील या राजकीय षडयंत्राला वर्षानुवर्ष बळी पडत गेलाय. या विषयावर प्रबोधन किंवा भाष्य होणं गरजेचं होतं ते फुली या नाटकात प्रभावीपणे मांडण्यात आले आहे.
गरीब लाचार कष्टकरी मजूर वर्गांना हाताशी धरून त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा गैरवापर करत त्यांना फुलीप्रमाणे पैसे देऊन मत विकत घेणारा एक राजकीय पुढारी पुढे काही काळ त्यांच्या जीवावर सत्तेत येतो. मात्र पुढे काही राजकीय नाव पेचामध्ये तो सत्तेतून बाहेर पडतो व त्याचा ठपका तो सदर मजूर वर्गांवर लावतो आणि नकळत त्यांच्या जीवाशी हा खेळ येतो. मात्र न्यायालयीन प्रक्रियेला देखील विकत घेत पुढे पुन्हा तो सत्तेमध्ये येण्यासाठी कसोशीने वेगवेगळे राजकीय डावपेच वापरत प्रयत्न करतो. त्याचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी त्याच मजूर वर्गातील एक सुशिक्षित तरुण बंड करतो. त्याला शहरातील गरीब मजूर वर्ग साथ देखील देतात. मात्र राजकीय डावपेचात पटाईत असलेला हा पुढारी शेवटच्या क्षणाला शहरातील मतदान फुलीप्रमाणे विकत घेऊन पुन्हा सत्तेमध्ये येतो आणि शेवटी नकळत फुलीचाच विजय होतो. हे वास्तव या नाटकातून परखडपणे मांडण्यात आले आहे. नाटकत शेवटी मतदान करणाऱ्या रसिक मतदाराला देखील पारदर्शकपणे मतदानाचा अधिकार बाजवण्याचा व या भ्रष्ट मतदान प्रक्रियेला छेद देण्याचे आवाहन करत नाटकाचा सुंदर शेवट होतो. या नाटकाची जमेची बाजू म्हणजे नाटकात जवळपास ३० च्या आसपास कलावंत रंगमंचावर विविध भूमिका साकारत असून या सुंदर आणि महत्त्वपूर्ण विषयाला लेखकाने हात घातला असून त्याला उत्तम रित्या रंगमंचावर सादर करण्यासाठी दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ यांनी आपली कुशलता अतिशय प्रामाणिक पणे मांडली आहे. अशा सर्वांगाने या नाट्य प्रयोगाची सदर स्पर्धेमध्ये दमदार सादरीकरण झाले असून याकरिता सदर संस्थेचे लेखक ,दिग्दर्शक, तंत्रज्ञ व सहभागी कलावंत यांनी मेहनत घेतली आहे.
नाटकाचे लेखन संदीप पाचंगे यांचे तर दिग्दर्शन मुकेश काळे यांचे होते. संगीत भूषण भावसार यांचे तर नेपथ्य प्रतिक वाघ यांचे होते. प्रकाशयोजना कृतार्थ कंसारा यांची तर रंगभूषा माणिक कानडे यांची होती. नाटकामध्ये तात्या – संजय पाटील, आक्का – सुचित्रा पगारे, विठ्ठल – भूषण महाले, विमल – शितल म्हस्के, छोटा बंटी – नक्ष विसपुते, मोठा बंटी – प्रतीक वाद्य, वसंत – गौरव आचारी, छोटी चुटकी – पिनाकी छाजेड, मोठी चुटकी – प्रांजल सोनवणे, जब्या – मयूर सोनवणे, सीमा – सिमरन कुमावत, चिऊ – सायली जाधव, पंढरी – आदित्य रिढे, सुष्मा – अनुष्का जोशी, माऊ – धनश्री बागुल, बब्या – सम्राट भावसार, ईश्वर भाकरे पाटील – नचिकेत दीक्षित, बायको – ऋतुजा घाटगे, जमदाडे बापू – विशाल लहाने, शेवाळे – सम्राट देशमुख, समाधान पैलवान – रुपेश कदम, पक्या – गणेश आव्हाड, गण्या – प्रफुल्ल तुपेरी, विकी – अर्णव पेटकर, उषा – श्वेता छाजेड, वकील – भानुप्रिया पेटकर, छोटा विठ्ठल – केतन पगारे, तरुण तात्या – ध्रुव चाचणे, तरुण अक्का – गार्गी ब्राह्मणकर, कार्यकर्ता – श्रीपाल जाधव यांनी भूमिका साकारल्या.
दिगंबर काकड
मो-९५९५९९६०३३
आजचे नाटक – आवर्तन
लेखक-अक्षय संत
दिग्दर्शक -आनंद कुलकर्णी
संस्था- लोकहितवादी मंडळ,नाशिक
आजच्या राजकीय परिस्थिती वर ज्वलंत वस्तुस्थिती सादरीकरण करणारे नाटक म्हणजे फुली. उत्कृष्ट सादरीकरण व दर्जेदार अभिनय. अप्रतिम संदेश. फुली टीम हार्दिक शुभेच्छा.