सामाजिक विकृती साफ करण्यासाठी गोदावरीच्या रूपात आली गौतमी …
६३ वी मराठी राज्य हौशी नाट्य स्पर्धा ,नाशिक केंद्र
६३ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत १२ डिसेंबर रोजी हस्तलेख्यम मैन्यूस्क्रिप्ट इन्स्टिट्यूट, नाशिक संघातर्फे गौतम हे नाटक सादर करण्यात आले. सदरील नाटक “गौतमी” या नाटकातून गोदावरी आणि गौतमी याचे स्त्रीत्व एकसारखे आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. २०२४ मध्ये जसे गौतमी वर अत्याचार होता आहेत, तिला जसा त्रास होतो आहे, त्याच पद्धतीने गोदावरी नदीला देखील त्रास देणाऱ्या विकृती या समाजात बळावत आहेत, त्याांच्या विरोधात समाज जेव्हा एकवटेल तेव्हाच या विकृतींचा विनाश होईल हे सांगण्याचा प्रयत्न या नाटकात केला आहे. सदरील नाटकात गोदावरी नदी ही अमूर्त रुपात असून गौतमी गोदावरीचे प्रतिनिधित्व करते आहे. नद्या या आपल्या समाजाचा आरसाच असतात त्या नेहमी शुद्धच असल्या पाहिजे म्हणून हा छोटासा प्रयत्न या नाटकातून केला आहे.
गोदाआरतीच्या ठिकाणी गोदामाईची सेवा आणि समाजकार्य करणाऱ्या गौतमी कडून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सनीची हत्या होते. जो शहरातल्या मोठ्या राजकारणाचा मुलगा असतो. आरती बघायला आलेले वकील अभय मगरे गौतमीला रक्तबंबाळ अवस्थेत बघून पोलिसांच्या ताब्यात देतात. पोलीस स्टेशनमध्ये एकीकडे राजकारणाच्या दबावाखाली पोलिस आणि कॉन्स्टेबल गौतमीला अडकवण्याचा प्रयत्न करत असताना गौतमीला भेटून, तिची व तिच्या परिवारची पूर्वकथा जाणून घेत वकील तिची केस लढण्याचा निर्णय घेतात आणि सुरू होते गौतमी विरुद्ध दादासाहेब टोणगे ही केस. केस कोर्टात गेल्यानंतर राजकारणी व्यक्ती त्याची भ्रष्टाचाराची संपूर्ण ताकद पणाला लावून गौतमीला शिक्षा होईल याचा पूर्ण प्रयत्न करतो, तर वकील आपली चाणाक्ष बुद्धी वापरून त्यांचे सारे प्रयत्न हाणून पाडतो. या केसमधून बाहेर येण्यासाठी गौतमीला तिचा सामाजिक प्रवास आणि गोदावरीची केलेली सेवा का मी येते. शेवटी भ्रष्टाचारी कॉन्स्टेबल गौतमीच्या बाजूने होते आणि गौतमी विरुद्ध दादासाहेब टोणगे ही केस गोदावरी विरुद्ध दादासाहेब टोणगे इकडे वळण घेते. पोलीस इन्स्पेक्टर ही त्यांच्या खाकी वर्दीचा मान राखून गौतमीची, सत्याची बाजू घेतो आणि निकाल गौतमीच्या बाजूने लागतो.
नाटकाचे लेखन व दिग्दर्शन चैतन्य गायधनी यांचे होते. रंगभूषा माणिक कानडे तर वेशभूषा नम्रता सरोज यांची होती. संगीत कवी कुणाल व प्रकाशयोजना चैतन्य गायधनी यांचे होते. नेपथ्य ऋषिकेश पाटील, सिद्धराज देशमुख यांनी केली. नाटकामध्ये गौतम – रिया राजा, अभय मगरे – प्रद्युम्न शेपाळ, इन्स्पेक्टर – ललित श्रीवास्तव, कॉन्स्टेबल – सुहास जाधव, सनी – अमित सोनवणे, दादासाहेब – शुभम पाटील, सरस्वती – रसिका मुळे, दत्तात्रेय – प्रद्युम्न देवकर, नारायणी – कीर्ती तांदळे, महावीर – सार्थक कर्पे, रुद्र – लोकेश सावंत, फिर्यादी वकील – मधुरा तरटे, न्यायाधीश – शारदा मिश्रा यांनी भूमिका साकारल्या.
दिगंबर काकड
मो-९५९५९९६०३३
आजचे नाटक – अकल्पित
संस्था – एच ए इ डब्ल्यू आर सी रंगशाखा,ओझर
लेखक व दिग्दर्शक :-मिलिंद मेधने