६३ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत २३ डिसेंबर रोजी सुरभी थिएटर्स, नाशिक संघातर्फे तन माजोरी हे नाटक सादर करण्यात आले. मालक आणि शेतमजूर यांच्या संघर्षाचे चित्रण केल्या असून नाटकाच्या सुरुवातीलाच वाश्या नावाचा शाळकरी मुलगा नकळतपणे हुकूमशाही प्रवृत्तीच्या मालकाला विरोध करतो या प्रसंगावरून नाटकाच्या संघर्षाची पुसटशी कल्पना प्रेक्षकांना येते. या संघर्षाला इंगळे मास्तरांची प्रेरणा मिळते व माणसाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून दिली, की तो बंड करून उठतो. असा कानमंत्र देत इंगळे मास्तर गावातील अन्यायग्रस्त गण्या, देव्या, राम्या, सिताक्का, सारजा, धुरपदा या विविध पात्रांना जागृत करतो. जसा मालकाविरुद्ध तसाच तो अन्याय व्यवस्थेविरुद्धही आवाज उठवतो. स्वत्व आणि स्वाभिमान यामुळे निर्माण झालेला संघर्ष, हक्क अधिकार व स्वातंत्र्याच्या पातळीवर पोहोचतो. संपूर्ण नाटक वाश्या आणि मालक यांच्या संघर्षावर आधारलेले असून वाश्या स्वतंत्र होऊ इच्छितो तर मालक त्याला गुलाम बनवू इच्छितो. असा संघर्ष नाटकभर दिसतो. हा संघर्षाचा वनवा कधी न विझणारा असून सगळ्या माजोरी तनाची राख करण्यासाठी तो भडकला असल्याचा प्रखर विचार या नाटकातून मांडला आहे.
नाटकाचे लेखन प्रेमानंद गज्वी यांचे तर दिग्दर्शन राजेश शर्मा यांचे होते. नेपथ्य प्रवीण राशिनकर यांचे तर प्रकाश योजना विनोद राठोड यांची होती. संगीत शुभम शर्मा तर रंगभूषा माणिक कानडे यांची होती. नाटकात मालक – भगवान निकम, मुकादम – राजेंद्र काळे, वाश्या – मल्हार धारणकर, सिताक्का – नयना सनांसे, राम्या – विकास हगवणे, गण्या – प्रकाश बर्वे, धुरपदा – विशाखा धारणकर, इंगळे गुरुजी – सुनील भारद्वाज, सारजा – पुजा उत्तेकर, दिव्या – नागेश धुर्वे, मन्या – श्लोक जाधव, गावकरी – शितल जाधव, पुनम जानेराव यांनी भूमिका साकारल्या.
दिगंबर काकड
मो-९५९५९९६०३३
आजचे नाटक -बिल्वपत्र
लेखक व दिग्दर्शक -अंबादास जोशी
संस्था – अभिरंग बालकला संस्था, नाशिक