मुंबईकडे मराठा बांधवांचा महासागर! १५ सप्टेंबरला अंतरवाली सराटीतून मनोज जरांगेंचा मोर्चा
जाणून घ्या संपूर्ण मार्ग आणि मुक्काम
मुंबई, दि. १२ सप्टेंबर २०२६ :(Manoj Jarange Mumbai Morcha) मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलनाची घोषणा केली आहे. अंतरवाली सराटी येथून १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. टप्प्याटप्प्याने मुक्काम करत हा मोर्चा मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचणार असून, १९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा जरांगे यांनी केली आहे.
“गणपती बसवायचा आणि निघायचं,” असे आवाहन करत जरांगे यांनी मराठा समाजाला आंदोलनाच्या तयारीला लागण्याचे आवाहन केले. त्यामुळे आगामी काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणासह मुंबईतील प्रशासकीय आणि पोलीस यंत्रणेचेही लक्ष या मोर्चाकडे लागले आहे.
१५ सप्टेंबरपासून मुंबईकडे कूच (Manoj Jarange Mumbai Morcha)
मनोज जरांगे पाटील यांच्या घोषणेनुसार १५ सप्टेंबरला अंतरवाली सराटीतून सकाळी ११ वाजता मराठा मोर्चाला सुरुवात होणार आहे. दररोज सुमारे १०० किलोमीटर अंतर पार करत टप्प्याटप्प्याने मुंबई गाठण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
📍 असा असेल मराठा मोर्चाचा मार्ग
१५ सप्टेंबर: अंतरवाली सराटी → पाटोदा, बीड — पहिला मुक्काम
१६ सप्टेंबर: श्रीगोंदा, अहिल्यानगर — दुसरा मुक्काम
१७ सप्टेंबर: हडपसर, पुणे — तिसरा मुक्काम
१८ सप्टेंबर: खोपोली, रायगड — चौथा मुक्काम
त्यानंतर: गरजेनुसार कोपरखैरणे येथे मुक्कामाची शक्यता
१९ सप्टेंबर: आझाद मैदान, मुंबई — आमरण उपोषणाला सुरुवात
जरांगे यांच्या नियोजनानुसार मोर्चा गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत दाखल होणार आहे. त्यामुळे मुंबईतील वाहतूक, कायदा-सुव्यवस्था आणि मोठ्या संख्येने येणाऱ्या आंदोलकांच्या व्यवस्थापनाचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे.
“मुंबईला जायचंच!” — जरांगेंचा निर्धार
मराठा समाजाला संबोधित करताना जरांगे पाटील यांनी मुंबई गाठण्याचा निर्धार व्यक्त केला. मार्ग कोणताही असो, मुंबईला पोहोचायचेच, अशी भूमिका त्यांनी मांडली.ज्या जिल्ह्यांतून मोर्चा जाणार आहे, त्या भागातील नागरिकांनी रस्त्यावर येऊन आंदोलकांना आशीर्वाद द्यावा आणि त्यानंतर आपापल्या घरी परतावे, असे आवाहनही त्यांनी केले.
श्रीमंत मराठ्यांना गाड्या देण्याचे आवाहन
मुंबईला येणे शक्य नसलेल्या नोकरदार, व्यावसायिक, शेतकरी आणि इतर नागरिकांनी ठरलेल्या दिवशी आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे जरांगे यांनी सांगितले.तसेच ज्यांच्याकडे चारचाकी वाहने आहेत, त्यांनी आंदोलकांना मुंबईच्या वेशीपर्यंत पोहोचवण्यासाठी वाहनांची मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. “चार दिवस डिझेलचा खर्च होईल; मात्र मराठा समाजाच्या लेकराबाळांच्या आयुष्याचे सोनं होईल,” असा संदेश त्यांनी दिला.
दगडफेक-जाळपोळ नको; शांततेच्या मार्गाने आंदोलन
दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी आंदोलकांना शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले आहे. दगडफेक किंवा जाळपोळ करू नका, वाहनं शांतपणे चालवा आणि लोकशाही मार्गाने आंदोलन करा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.“आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करायचे आहे आणि आमचा हक्क मिळवायचा आहे,” अशी भूमिका जरांगे यांनी मांडली.
सरकार आणि पोलिसांसमोर मोठे आव्हान
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे निघणाऱ्या या मोर्चामुळे राज्य सरकार आणि मुंबई पोलीस यंत्रणेची कसोटी लागणार आहे. मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत दाखल झाल्यास वाहतूक नियोजन, कायदा-सुव्यवस्था आणि आंदोलनस्थळावरील व्यवस्थापन हे प्रशासनासमोरील प्रमुख प्रश्न असतील.
आता १५ सप्टेंबरला अंतरवाली सराटीतून सुरू होणारा मराठा मोर्चा कोणत्या मार्गाने मुंबईत पोहोचतो, आंदोलकांची संख्या किती असते आणि सरकार या आंदोलनाला कशा पद्धतीने सामोरे जाते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.



