
मुंबई, दि. ३१ मार्च २०२६ – Marathi movie Super Duper मराठी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेत्री निर्मिती सावंत पुन्हा एकदा त्यांच्या प्रभावी अभिनयाने चर्चेत आल्या आहेत. त्यांच्या आगामी ‘सुपर डुपर’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, त्यामध्ये दिसणारा त्यांचा रांगडा लहेजा, जबरदस्त संवादफेक आणि अस्सल ग्रामीण अंदाज प्रेक्षकांना भुरळ घालत आहे.
या चित्रपटात त्या एका खंबीर, संघर्षशील गावाकडच्या स्त्रीची भूमिका साकारत आहेत. घर सांभाळताना अनेक अडचणींना सामोरे जाणारी आणि कुटुंबासाठी झटणारी ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावणारी ठरणार आहे. ट्रेलरमधूनच त्यांच्या भूमिकेची ताकद जाणवते.या भूमिकेला वास्तववादी स्पर्श देण्यासाठी निर्मिती सावंत यांनी विशेष मेहनत घेतली आहे. ग्रामीण बोलीभाषेचा अचूक लहेजा आणि रांगडेपणा साधण्यासाठी त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता मकरंद अनासपुरे यांची मदत घेतली. त्यांनी स्क्रिप्ट शेअर करून स्थानिक बोलीतील शब्द, वाक्प्रचार आणि संवादफेक यांचा बारकाईने अभ्यास केला.
याबाबत निर्मिती सावंत म्हणाल्या, “मी साकारत असलेली ही भूमिका खूप वास्तववादी आहे. तिचं आयुष्य, तिचं जगणं हे खूप जवळचं वाटणारं आहे. त्या भागातील बोली समजून घेण्यासाठी मी मकरंद अनासपुरेंशी संपर्क साधला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे त्या भाषेचा नैसर्गिकपणा आणि रांगडेपणा अचूक पकडता आला.”त्या पुढे म्हणाल्या की, योग्य तयारीशिवाय ही भूमिका फक्त आणखी एक पात्र राहिली असती, पण आता ती प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचेल, असा त्यांना विश्वास आहे.चित्रपट निवडताना निर्मिती सावंत अतिशय सजग असतात. स्क्रिप्ट, दिग्दर्शक, निर्मितीसंस्था आणि तांत्रिक बाबींचा सखोल विचार करूनच त्या प्रकल्प स्वीकारतात. नवोदित कलाकारांमध्ये क्षमता दिसल्यास त्यांच्यासोबत काम करण्यासही त्या नेहमी उत्सुक असतात.
‘सुपर डुपर’ (Marathi movie Super Duper) हा एक कौटुंबिक मनोरंजनपट असून तो येत्या ३ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केले आहे. निर्माते विजय शिंदे आणि नरेश बोर्डे असून, प्रस्तुतकर्ता उमेश कुमार बन्सल व बवेश जानवलेकर आहेत. चित्रपटाचे छायांकन संजय जाधव यांनी केले आहे.मराठी प्रेक्षकांसाठी हा चित्रपट एक खास मनोरंजनाचा मेजवानी ठरणार असून, निर्मिती सावंत यांची ही दमदार भूमिका नक्कीच चर्चेचा विषय ठरणार आहे.

