स्टार प्रवाहच्या ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतून नवी जोडी भेटीला

0

मुंबई – स्टार प्रवाहवर ठिपक्यांची रांगोळी हि मालिका येत्या ४ ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. या मालिकेच्या प्रोमोजना रसिकांकडून भरभरुन प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेतून ज्ञानदा रामतीर्थकर आणि चेतन वडनेरे ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या मालिकेत अपूर्वा आणि शशांक असं दोघांच्या व्यक्तिरेखेचं नाव असून ज्ञानदा आणि चेतन यांनी याआधी बऱ्याच मालिकांमधून लक्षवेधी भूमिका साकारली आहे. ठिपक्यांची रांगोळी या स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेसाठी दोघंही खूप उत्सुक आहेत.

या मालिकेतल्या भूमिके विषयी बोलतांना ज्ञानदा म्हणाली, ‘मी पहिल्यांदाच अश्या पद्धतीची भूमिका साकारते आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मालिकेची संपूर्ण टीम. अनेक दिग्गज कलाकार आणि आमचे दिग्दर्शक गिरीश वसईकर यांनी अतिशय छान पद्धतीने मला ही भूमिका पार पाडण्यासाठी प्रोत्साहित केलं आहे. सेटवरचं सकारात्मक वातावरण काम करण्यासाठी नवी ऊर्जा देतं. अपूर्वा साकारताना तिची एनर्जी कॅरी करणं सुरुवातीला थोडं कठीण गेलं मात्र आता हळूहळू मला सवय होतेय. अशी भावना ज्ञानदाने व्यक्त केली.’

तर शशांक ही व्यक्तिरेखा साकारणारा चेतन म्हणाला, ‘शशांक हा अतिशय हुशार मुलगा आहे. तो वैज्ञानिक आहे. परदेशातून कामाची संधी मिळत असली तरी कुटुंबाला सोडून त्याला परदेशी जाण्याची इच्छा नाही. त्याचा त्याच्या कुटुंबावर खूप जीव आहे. संस्कार आणि मूल्य जपणाऱ्या शशांकच्या आयुष्यात जेव्हा त्याच्या विरोधी विचारांची मुलगी येते तेव्हा नेमकं काय होतं हे मालिकेत पाहायला मिळेल. ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या नावाप्रमाणेच मालिकेचं कथानकही नाविन्यपूर्ण आणि एकत्र कुटुंबाचं महत्त्व पटवणारं आहे.

स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती रुपाली गुहा आणि पिंटू गुहा यांच्या फिल्मफार्म संस्थेची असून गिरीश वसईकर या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. शरद पोंक्षे, सुप्रिया पाठारे, सारिका नवाथे, लीना भागवत, मंगेश कदम, अतुल तोडणकर, ज्ञानदा रामतीर्थकर, चेतन वडनेरे, राजन ताम्हाणे, मुग्धा गोडबोले, राधिका हर्षे अशी कलाकारांची तगडी फौज मालिकेत आहे. तेव्हा स्टार प्रवाहच्या या नव्या कुटुंबाला भेटण्यासाठी सज्ज व्हा. पाहायला विसरु नका नवी मालिका ठिपक्यांची रांगोळी ४ ऑक्टोबरपासून रात्री ९ वाजता प्रवाहवर.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.