MIvsGT Eliminator2025:मुंबईचा शानदार विजय,गुजरातचं आव्हान समाप्त

क्वालिफायर 2 मध्ये आता पंजाब विरुद्ध मुंबईचा मुकाबला

1

📍 चंदीगड, ३१ मे २०२५ – MIvsGT IPL 2025 Eliminator आयपीएल २०२५ च्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सवर २० धावांनी शानदार विजय मिळवत आपलं क्वालिफायर २ मध्ये स्थान निश्चित केलं आहे. न्यू चंदीगडमध्ये खेळलेल्या या थरारक सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० ओव्हरमध्ये ५ बाद २२८ धावा केल्या आणि गुजरातसमोर २२९ धावांचं मोठं आव्हान ठेवलं. प्रत्युत्तरात गुजरातची टीम २० ओव्हरमध्ये ६ गडी गमावून केवळ २०८ धावाच करू शकली.

मुंबईची स्फोटक सुरुवात (MIvsGT IPL 2025 Eliminator)
मुंबईच्या फलंदाजीची सुरुवात दमदार झाली. रोहित शर्मा आणि जॉनी बेअरस्टो यांनी पहिल्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी करत मुंबईला झपाट्याने पुढे नेलं. बेअरस्टोने २२ चेंडूंमध्ये ४७ धावा केल्या, तर रोहितने ५० चेंडूंमध्ये ८१ धावांची जबरदस्त खेळी केली. नंतर सूर्यकुमार यादव (३३), तिलक वर्मा (२५) आणि कर्णधार हार्दिक पांड्या (२२*) यांनीही उपयुक्त योगदान दिलं. गुजरातकडून प्रसिद्ध कृष्णा आणि साई किशोर यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

गुजरातची  झुंज अपुरी
२२९ धावांचा पाठलाग करताना गुजरातला पहिल्याच ओव्हरमध्ये झटका बसला जेव्हा ट्रेंट बोल्टने शुबमन गिलला १ धावांवर बाद केलं. त्यानंतर साई सुदर्शन (८०) आणि कुसल मेंडिस (२०) यांनी डाव सावरला. कुसल हिट विकेट झाला, तर साईने वॉशिंग्टन सुंदरसोबत तिसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली. वॉशिंग्टनने २४ चेंडूंमध्ये ४८ धावा केल्या.

साई सुदर्शनचे अर्धशतक निष्फळ
गुजरातकडून साई सुदर्शनने ८० धावांची झुंजार खेळी केली. मात्र इतर फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. मुंबईच्या अचूक यॉर्कर्स आणि रणनीतीमुळे गुजरातला लक्ष्य गाठता आले नाही. त्यामुळे गुजरातचे या हंगामातील आव्हान संपुष्टात आले.

सामना गुजरातच्या बाजूने झुकत असताना जसप्रीत बुमराहने अचूक यॉर्करने वॉशिंग्टनला क्लीन बोल्ड करत निर्णायक विकेट घेतली. यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी दबाव कायम ठेवत साई सुदर्शनलाही बाद केलं आणि गुजरातच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या.

क्वालिफायर 2 मध्ये मुंबई विरुद्ध पंजाब
मुंबई इंडियन्स आता १ जून रोजी अहमदाबादमध्ये होणाऱ्या क्वालिफायर २ मध्ये पंजाब किंग्सचा सामना करणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने सामन्याच्या निर्णायक क्षणी जबरदस्त रणनीती वापरली आणि गुजरातविरुद्ध दोन पराभवांचा हिशोबही चुकता केला.

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कॅप्टन), नमन धीर, राज बावा, मिचेल सँटनर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह आणि रिचर्ड ग्लीसन.

गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कॅप्टन), साई सुदर्शन, कुसल मेंडिस (विकेटकीपर), शाहरुख खान, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, जेराल्ड कोएत्झी, मोहम्मद सिराज आणि प्रसीद कृष्णा.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
Don`t copy text!