मुंबई,१३ ऑक्टोबर २०२२ – अंधेरी पोटनिवडणुकी संदर्भात मोठी बातमी आली आहे.या पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाने ऋतुजा लटके यांना उमेदवारी घोषित केली. मात्र, त्यांचा राजीनामा मुंबई महानगर पालिकेकडून स्वीकारला गेला नाही.अखेर हायकोर्टाने ऋतुजा लटके यांना दिलासा दिला आहे.
त्यांचा राजीनामा उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत स्वीकारून तो मंजूर करावा, असे निर्देश कोर्टाने दिले. राजीनामा मंजूर होत नसल्याने लटके यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. हा राजीनामा स्वीकारण्यात यावा, असे कोर्टाने पालिकेला बजावले. यानिर्णयाने ठाकरे गटालाही दिलासा मिळाला आहे.
ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर झाला नसता तर त्यांची उमेदवारी अडचणीत सापडण्याची शक्यता होती. त्यामुळे ऋतुजा लटके यांनी उच्च न्यायालयात धाव घेत आपला राजीनामा स्वीकारला जावा, अशी मागणी केली. यावर आता मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे.
हायकोर्टाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे लटकेंना ठाकरेंकडून निवडणूक लढवण्याचे सर्व मार्ग मोकळे झाले आहेत. शिंदे आणि ठाकरे गटासाठी ही अटीतटीची लढाई आहे. अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरेंच्या बाजूने ऋतुजा लटके यांना निवडणूक लढवायची असल्याने त्यांनी बीएमसीत राजीनामा टाकला होता. अखेर बऱ्याच युक्तीवादानंतर उच्च न्यायालयाने राजीनामा मंजूर करावा असे महापालिकेला निर्देश दिले आहेत.