ज्येष्ठ रंगकर्मी कैलास पाटील यांच्या कवितासंग्रहाचे रविवारी प्रकाशन
ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांच्या हस्ते होणार प्रकाशन : लेखक आणि अर्थतज्ञ दीपक करंजीकर यांची प्रमुख उपस्थिती
नाशिक,१३ ऑक्टोबर २०२२ –येथील ज्येष्ठ रंगकर्मी कैलास पाटील यांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन रविवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२२ रोजी ‘कुसुमाग्रज स्मारका’मधील ‘विशाखा’ सभागृहात सायंकाळी ६ वाजता होणार आहे.
शब्द आणि शब्दांमध्ये फिरणारी नाद-लय ही कैलास पाटील यांच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीतील महत्त्वाची गोष्ट राहिली. विशेषतः लोकसंगीताच्या अंगाने त्यांनी केलेले काम त्यांना या नाद-लयीकडे खेचून आणणारे ठरले. त्यालाच पुढे शब्दरूप मिळाले असून कोरोना आणि कोरोनोत्तर काळात फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी या कविता रसिकांपर्यंत पोहोचवल्या. त्यातील निवडक कवितांचा संग्रह प्रकाशित होत असून ज्येष्ठ कवी अशोक बागवे हे या संग्रहाच्या प्रकाशनासाठी येणार आहेत. त्यांच्या शुभहस्ते आणि दीपक करंजीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा होणार आहे.
या कार्यक्रमास सुनीलभाऊ बागुल, शाहू महाराज खैरे,लक्ष्मणजी सावजी,हेमंतराव टकले,.विलासभाऊ लोणारी आणि विश्वासजी ठाकूर ह्यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.कवितासंग्रहाच्या प्रकाशन समारंभात काही निवडक कवितांचे सादरीकरणही होणार असून ‘कुसुमाग्रज स्मारका’मधील ‘विशाखा’ सभागृहात सायंकाळी ६ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन निर्मल फाउंडेशन आणि जनस्थान यांनी केले आहे.