
नाशिक, दि. २९ ऑक्टोबर २०२५ – MRF Supercross 2025 नाशिककरांसाठी १ नोव्हेंबर हा दिवस उत्साह, रोमांच आणि वेगाचा संगम ठरणार आहे! देशभरातील १२५ पेक्षा अधिक नामांकित रायडर्स सहभागी होणार असलेल्या एम आर एफ मोग्रीप एफएमएससीआय नॅशनल सुपरक्रॉस चॅम्पियनशिप २०२५ च्या तिसऱ्या फेरीचा थरार नाशिकमध्ये अनुभवायला मिळणार आहे.
ही राष्ट्रीय स्पर्धा भारत सरकार आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या मान्यतेने चालणाऱ्या फेडरेशन ऑफ मोटरस्पोर्ट्स क्लब्स ऑफ इंडिया (FMSCI) च्या अधिपत्याखाली आयोजित करण्यात आली आहे. सात वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेल्या शाम कोठारी यांच्या नेतृत्वाखालील गॉडस्पीड रेसिंग ही संस्था या भव्य स्पर्धेचे आयोजन करत असून, मागील २५ वर्षांपासून ते सुपरक्रॉसच्या आयोजनात अग्रणी आहेत.
या वर्षीची नाशिक फेरी विशेष ठरण्याची शक्यता आहे. सुरज कुटे, मोहन पवार, हर्षल कडभाणे, विक्रम राजपूत, अमित सूर्यवंशी आणि आनंद बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली ट्रॅकची आखणी करण्यात आली आहे. या ट्रॅकमध्ये १५ जम्प्स, १ टेबलटॉप आणि १ कट टेबलटॉप असून, वेगवान आणि आव्हानात्मक रचना या स्पर्धेला अधिक रोमांचक बनवते.
सुपरक्रॉस हा कृत्रिमरित्या तयार केलेल्या उंचवट्यांवरून मोटरसायकल चालवण्याचा खेळ असून, रायडर्स हवेत उड्या घेताना बघणे ही प्रेक्षकांसाठी नेत्रदीपक मेजवानी असते. नाशिकमध्ये दरवर्षी या खेळाचा उत्साह वाढत असून, यंदाही मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे.
या फेरीत एसएक्स-१ (SX-1) या विदेशी बनावटीच्या मोटारसायकल गटात तुफान स्पर्धा पाहायला मिळेल. देशातील प्रसिद्ध टीव्हीएस रेसिंग टीम सह अनेक दिग्गज रायडर्स या फेरीत सहभागी होणार आहेत. स्पर्धेचे प्रायोजक म्हणून एमआरएफ टायर्स लिमिटेड, टीव्हीएस मोटार कंपनी, सिडवीन एनर्जी, मॉन्स्टर एनर्जी आणि आयओसी सर्वो यांचे सहकार्य लाभले आहे.
स्पर्धेच्या व्यवस्थापनात एफएमएससीआयचे मुख्य प्रबंधक रवी श्यामदासानी, तर मनीष चिटको आणि सत्यजित नायक हे अधिकारी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहणार आहेत. अंकित गज्जर हे वाहन तपासणीचे काम पाहतील, तर रवी वाघचौरे हे तांत्रिक समिती प्रमुख असतील.
स्पर्धेचे ठिकाण ठक्कर डोम, सिटी सेंटर मॉलजवळ, नाशिक येथे निश्चित करण्यात आले आहे.(MRF Supercross 2025)
📍 ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी वाहन आणि कागदपत्र तपासणी
📍 १ नोव्हेंबर रोजी सकाळी सराव सत्र
📍 दुपारी १ वाजता मुख्य स्पर्धेला प्रारंभ
स्पर्धकांचे कौशल्य, इंजिनांचा आवाज आणि प्रेक्षकांचा जयघोष – या सर्वांचा संगम नाशिककरांना मोटरस्पोर्ट्सच्या थरारात बुडवणार आहे. आयोजक शाम कोठारी आणि सुरज कुटे यांनी सर्व नागरिकांना या “वेगाच्या पर्वणी”चा आनंद घेण्याचे आवाहन केले आहे.
मीडिया प्रतिनिधींसाठी सूचना:
वार्तांकनासाठी विशेष आसनव्यवस्था ठेवण्यात आली असून, पत्रकारांनी आपल्या दैनिकाचे ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. छायाचित्रकारांसाठी पासची व्यवस्था असून, २९ ऑक्टोबर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत छायाचित्रकाराचे नाव सचिन निरंतर यांच्याकडे कळवावे. पासशिवाय मैदानात प्रवेश मिळणार नाही.
🔥 १ नोव्हेंबर रोजी ठक्कर डोम, नाशिक येथे तयार रहा — सुपरक्रॉसच्या गर्जनेसाठी!


