मुंबई होस्टेज प्रकरण : रोहित आर्यचा मृत्यू, A टू Z स्टोरी! नेमकं काय घडलं?अजूनही अनुत्तरित प्रश्न
शिक्षण विभागाच्या ‘स्वच्छ मॉनिटर’ प्रकल्पाचा घोळ, दोन कोटींचा वाद आणि ....

मुंबई, दि. ३० ऑक्टोबर २०२५ – Mumbai Hostage Case मुंबईतील पवई परिसरात घडलेल्या रोहित आर्य प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. एका स्टुडिओत १७ शाळकरी मुलांना ओलीस ठेवल्यानंतर पोलिसांच्या कारवाईत रोहित आर्य ठार झाला. पण या घटनेमागचं कारण समोर आल्यानंतर चित्र अधिक गुंतागुंतीचं बनलं आहे. रोहितचा शिक्षण विभागाशी आणि माजी शिक्षामंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत वाद असल्याचं बोलले जात आहे ? काही दिवसापूर्वी रोहित आर्य याने पुण्यात उपोषण पण केले होते
💰 ‘स्वच्छ मॉनिटर’ प्रकल्प आणि २ कोटींचं देणं (Mumbai Hostage Case)
रोहित आर्य हा अप्सरा मीडिया एंटरटेनमेंट नेटवर्क या संस्थेच्या माध्यमातून ‘स्वच्छ मॉनिटर’ नावाचा एक शालेय प्रकल्प राबवत होता. या प्रकल्पाअंतर्गत ‘लेट्स चेंज’ नावाचा लघुपट तयार करण्यात आला होता. या उपक्रमासाठी रोहितला शिक्षण विभागाकडून सुमारे दोन कोटी रुपयांचे मानधन मिळणं अपेक्षित होतं. मात्र, प्रकल्पाची प्रशासकीय प्रक्रिया अपूर्ण राहिल्याने पेमेंट रोखण्यात आलं.शिक्षण विभागातील संयुक्त सचिवांनी प्रकल्पात काही त्रुटी असल्याचं सांगत त्याची फाइल स्थगित केली. त्यानंतर रोहितने स्वतःला फसवलं गेलं असं समजून गेल्या वर्षी पुण्यात तब्बल महिनाभर आंदोलन केलं होतं. तेव्हा त्याने माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं –
“मी काम पूर्ण केलं, पण ना पैसे मिळाले, ना श्रेय. सरकार माझी फसवणूक करत आहे.”
“मी दहशतवादी नाही… मी फसवलेला नागरिक आहे!” — रोहित आर्यचा व्हिडिओतील हळहळणारा आवाज
घटनेच्या काही तास आधीच रोहित आर्यने एक व्हिडिओ जारी करून स्वतःची बाजू मांडली होती. त्या व्हिडिओमध्ये तो शांत पण ठाम आवाजात म्हणतो, “मी दहशतवादी नाही… मी कुणाला नुकसान करायला आलो नाही. माझ्याशी अन्याय झाला आहे आणि मी फक्त उत्तरं मागतोय.” त्याने हेही स्पष्ट केलं की, तो एकटा नाही, त्याच्यासोबत काही लोक आहेत जे या अन्यायाविरोधात उभे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, युट्युबर म्हणून कार्यरत असलेल्या रोहितने शनिवारी सकाळी ‘अॅक्टिंग वर्कशॉप’च्या नावाखाली मुलांना बोलावलं होतं. सुरुवातीला वातावरण नेहमीप्रमाणे सामान्य होतं; मात्र काही वेळानंतर त्याने अचानक काही मुलांना आतच थांबवून घेतलं आणि उरलेल्या सुमारे ८० मुलांना सोडून दिलं. बराच वेळ मुले बाहेर न आल्याने पालकांची घबराट वाढली आणि त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पावणे दोनच्या सुमारास पवई पोलिसांना कॉल आला — “महावीर क्लासिक” इमारतीत एक व्यक्ती लहान मुलांना ओलीस ठेऊन बसला आहे. काही मिनिटांतच पोलिसांनी परिसराला वेढा घातला आणि त्यानंतर सुरू झाला मुंबईतील सर्वात नाट्यमय बचाव अभियान.
🚨Rohit Arya, a man in Mumbai’s Powai, allegedly held several children hostage and released a video in which he said he wanted to speak with specific people.
He has been shot dead now. pic.twitter.com/tLPRecUBY4
— Priyanshi Bhargava (@PriyanshiBharg7) October 30, 2025
🗣️ दीपक केसरकर यांचं स्पष्टीकरण
रोहित आर्यच्या मृत्यूनंतर माजी शिक्षामंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar)यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं,
“मी शिक्षणमंत्री असताना त्याला वैयक्तिकरित्या काही रक्कम चेकद्वारे दिली होती. मात्र, सरकारी पेमेंटसाठी ठराविक प्रक्रिया असते. त्याने जर ती प्रक्रिया पूर्ण केली असती, तर त्याचे पैसे मिळाले असते.”
केसरकर यांनी स्पष्ट केलं की, “रोहित मानसिक आजारी नव्हता. तो अत्यंत हुशार आणि कल्पक होता, पण त्याला सरकारी यंत्रणेमुळे निराशा आली होती. मात्र त्यामुळे मुलांना ओलीस ठेवणं हे अत्यंत चुकीचं पाऊल होतं.”
⚡ रोहितची पत्नी अंजलीचा जुना इशारा
या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे –रोहितची पत्नी अंजली आर्य हिने मागील वर्षीच सरकारविरोधात तीव्र भूमिका घेतली होती.
तिने तेव्हा माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं —“सरकार माझ्या नवऱ्याचे दोन कोटी रुपये अडवून ठेवत आहे. जर त्याला काही झालं तर मी कोणालाही सोडणार नाही.”आज तिचे हे शब्द अक्षरशः खरं ठरल्यासारखं झालं आहे.
🏫 शिक्षण विभाग आणि दादा भुसे यांचं स्पष्टीकरण
या प्रकरणानंतर राज्याचे विद्यमान शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सांगितलं की,
“रोहित आर्य प्रकरणात विभागाकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. उद्यापर्यंत पूर्ण तपशील स्पष्ट केला जाईल.”
भुसे यांनी स्पष्ट केलं की,
अप्सरा मीडिया एंटरटेनमेंट नेटवर्क्स या संस्थेला शालेय शिक्षण विभागाकडून कोणतीही मान्यता मिळालेली नाही.
शासन निधीचा वापर किंवा सरकारी मंजुरीचा पुरावा उपलब्ध नाही.
‘स्वच्छता मॉनिटर’ प्रकल्प केवळ सामाजिक स्वरूपात राबवण्यात आला, शासनाने त्याला औपचारिक मान्यता दिली नव्हती.
राज्याचे उपसचिव विपुल महाजन यांनीही सांगितलं की, या प्रकरणाचा कोणताही थेट संबंध शासनाशी किंवा शिक्षण विभागाच्या मंजूर प्रकल्पाशी नाही.
🔫 पोलिसांकडून ‘एन्काऊंटर’
पवईतील आर.ए. स्टुडिओमध्ये रोहित आर्यने १७ शाळकरी मुलांना ओलीस ठेवले होते. जवळपास दोन तास तणाव निर्माण झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी मोर्चा आत घेतला.
त्यावेळी रोहितने पोलिसांवर गोळी झाडली आणि प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही फायरिंग केली.
गोळी रोहितच्या छातीत लागली आणि त्याला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या कारवाईत पवई पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी निर्णायक भूमिका बजावली. मुलांची सुरक्षित सुटका करण्यात आली, मात्र या एन्काऊंटरनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
🧠 मानसिक दबाव आणि ‘व्यवस्थेचा बळी’ ठरलेला माणूस
रोहित आर्यवर मानसिक अस्थिरतेचे आरोप करण्यात आले असले तरी, त्याच्या जवळच्या लोकांचं म्हणणं आहे की तो केवळ निराश होता. शासनाच्या प्रक्रियेत अडकलेल्या फाइल्स, अडथळे, आणि देयकांसाठी चाललेली धावपळ यामुळे तो तणावाखाली गेला होता.
त्याच्या मृत्यूनंतर “सरकारी विलंबामुळे एका नागरिकाचं आयुष्य गमावलं गेलं” अशी चर्चा सुरु झाली आहे.
🚨 एनएसजी कमांडो सेंटर अगदी जवळ!
घटनास्थळापासून फक्त ३०० मीटर अंतरावर एनएसजी (National Security Guard) कमांडो सेंटर आहे. हेच केंद्र 26/11 हल्ल्यानंतर मुंबईत स्थापन करण्यात आलं होतं.
तज्ज्ञांच्या मते, परिस्थिती गंभीर होत असताना पोलिसांनी एनएसजीची मदत घेता आली असती, परंतु मुंबई पोलिसांनी स्वतःच आत घुसून कारवाई केली.
❓ अजूनही अनुत्तरित प्रश्न (Mumbai Hostage Case)
या प्रकरणानंतर काही गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत –
रोहित आर्यला खरंच दोन कोटींचं पेमेंट देणं बाकी होतं का?
‘स्वच्छ मॉनिटर’ प्रकल्पाला शासन मान्यता होती का?
शिक्षण विभागानं वेळेवर तपासणी का केली नाही?
आणि सर्वात महत्त्वाचं –पोलिसांनी एनएसजीची मदत का घेतली नाही?
या प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसांत स्पष्ट होतील, पण समाजाच्या मनात एक प्रश्न कायम राहील —
“व्यवस्थेच्या त्रुटींचा राग शेवटी निर्दोष मुलांवर का निघाला?”
रोहित आर्यचं प्रकरण हे केवळ एका व्यक्तीच्या मृत्यूचं नसून, प्रशासनातील अकार्यक्षमता, भ्रष्टाचार, आणि तक्रारींना वेळेवर उत्तर न मिळाल्याचं जिवंत उदाहरण ठरलं आहे.
मुलांना ओलीस ठेवणं नक्कीच गुन्हा आहे, पण त्यामागचा ताण, अन्याय आणि निष्काळजीपणाही समाजाने समजून घेणं गरजेचं आहे.अशी मते काहीजण जण व्यक्त करत आहेत
 
			


 
						