मुंबई, दि. ४ सप्टेंबर २०२५ – Narayan Rane Hospitalized भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुंबईच्या जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राणेंवर आज गुरुवारी तातडीने शस्त्रक्रिया (Surgery) होणार असल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, नेमकी कोणती शस्त्रक्रिया होणार आहे, याबाबत अधिकृत माहिती अद्याप जाहीर झालेली नाही.
नारायण राणे(Narayan Rane Hospitalized) हे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावशाली आणि वादग्रस्त व्यक्तिमत्त्व मानले जाते. त्यांनी शिवसेनेतून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. एकेकाळी ते कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जात होते. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर भाजपमध्ये सामील झाले. राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवले असून, केंद्र सरकारमध्येही त्यांनी मंत्रीपद सांभाळले आहे.
त्यांची दोन्ही मुले नितेश राणे आणि निलेश राणे राजकारणात सक्रीय आहेत. नितेश राणे हे सध्या आमदार असून राज्य सरकारमध्ये मंत्रीही आहेत. त्यामुळे राणे कुटुंब सध्या महाराष्ट्राच्या सत्तेत महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
राजकारणात राणे हे नेहमीच उद्धव ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांचे कट्टर विरोधक राहिले आहेत. त्यांच्या फटकळ बोलण्यामुळे ते सतत चर्चेत राहिले आहेत. त्यामुळेच त्यांच्या तब्येतीबाबत आलेल्या बातमीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
चार दिवसांपूर्वीच नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले होते. त्या वेळीचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागल्याने अनेकांनी त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे.नारायण राणेंवर आज शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती मिळाली