नाशिक विमानतळावर विमान पार्किंग हब विकसित करा -छगन भुजबळ यांची मुख्यमंत्रींकडे मागणी

0

नाशिक, दि. ६ ऑक्टोबर २०२५ Nashik Airport Parking Hub राज्य शासनाच्या विमानतळांना इंटरलिंक करण्याच्या धोरणांतर्गत नाशिक विमानतळाला नवा ओळख मिळू शकतो. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नाशिक आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान पार्किंग हब विकसित करण्याची मागणी केली आहे.

भुजबळ यांनी नमूद केले आहे की, नाशिक विमानतळाच्या वाढत्या प्रवासी संख्येचा आणि भविष्यातील विमान वाहतुकीच्या गरजांचा विचार करता विमान पार्किंग हब विकसित करणे अत्यंत आवश्यक आहे. एचएएल (HAL) ने नाशिक विमानतळावर ३००० मी x ४५ मी आकाराची नवीन समांतर धावपट्टी मंजूर केली असून, ३४३ कोटींच्या कामांची निविदा ९ जून २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

🔹 कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सुविधा(Nashik Airport Parking Hub)

प्रयागराज विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा संदर्भ देत भुजबळ म्हणाले आहेत की, महाकुंभ नियोजनादरम्यान प्रयागराज येथे पार्किंग बे ४ वरून १५ पर्यंत वाढवण्यात आले होते. त्या धर्तीवर २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक विमानतळावर पार्किंग हब विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

🔹 मुंबई- दिल्लीवरील ताण कमी करण्याची संधी

मुंबई आणि दिल्लीसारख्या मोठ्या विमानतळांवर पार्किंगसाठी जागेची कमतरता असल्याने विमान कंपन्यांना इतरत्र विमानं पार्क करावी लागतात. त्यामुळे २० ते ३० टक्क्यांपर्यंत इंधन खर्च आणि वेळेचा अपव्यय होतो. मुंबई विमानतळावर प्रति तास प्रति मेट्रिक टन १७.८८ ते ३६ शुल्क आकारले जाते, ज्यामुळे एका बोईंग ७३७ विमानाचे रात्रभर पार्किंग सुमारे १० ते २० हजार इतके महागडे ठरते. या तुलनेत नाशिक विमानतळाचे दर अत्यल्प आहेत, त्यामुळे येथील पार्किंग हब विमान कंपन्यांसाठी फायदेशीर ठरू शकते, असे भुजबळ यांनी अधोरेखित केले.

🔹 नाशिक विमानतळाचे तांत्रिक सामर्थ्य

नाशिक विमानतळावर आधीच नाईट लँडिंग सुविधा, रनवे लायटिंग, रडार आणि २४ तास कार्यरत सेवा उपलब्ध आहे. मुंबईपासून केवळ १५८ किमी अंतरावर असलेला हा विमानतळ मुंबईच्या अतिरिक्त विमान पार्किंग गरजा पूर्ण करू शकतो. यामुळे नवीन फ्लाइट मार्ग, विशेषतः धार्मिक पर्यटन आणि कुंभमेळा प्रवाशांसाठी सुरू करण्यास मदत होईल.

🔹 MRO सुविधेमुळे नाशिकला स्पर्धात्मक फायदा

HAL ने मार्च २०२५ मध्ये A320 विमानांसाठी DGCA आणि EASA प्रमाणित “C-Check” MRO सुविधा सुरू केली आहे. दरवर्षी २० विमानांच्या ओव्हरहॉलचे उद्दिष्ट ठेवले असून, त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांना नाशिककडे आकर्षित करता येईल. MRO आणि पार्किंग हब या दोन्ही सुविधा एकत्र आल्यास विमान कंपन्यांचा पार्किंग खर्च ३०% पर्यंत कमी होऊ शकतो आणि Secondary Maintenance (SM) सुलभ होईल.

🔹 १८५ कोटींचा विकास आराखडा

HAL च्या महाव्यवस्थापकांनी २० जून २०२५ रोजी १०,००० चौ.मी.चे नवीन प्रवासी टर्मिनल (१५० कोटी), टॅक्सी लिंक रनवे (३५ कोटी) आणि तीन नवीन पार्किंग बे उभारण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिला आहे. नाशिक विमानतळावरील ATF इंधनावरील कर कमी असल्याने आणि हॉल्टिंग चार्जेस स्वस्त असल्याने तो पश्चिम भारतातील स्पर्धात्मक विमान पार्किंग केंद्र ठरू शकतो.

🔹 १० हजार रोजगार संधी आणि पर्यटन वाढ

या प्रकल्पामुळे १० हजारांहून अधिक रोजगार निर्मिती, स्थानिक उद्योगांना चालना, तसेच कार्गो वाहतुकीत वाढ होईल. नाशिकची धार्मिक आणि औद्योगिक ओळख लक्षात घेता हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल.

🔹 कुंभमेळा २०२७ साठी धावपट्टी तयार

नाशिक विमानतळाची नवी धावपट्टी जून २०२७ पर्यंत कार्यान्वित होणार असून, कुंभमेळ्यादरम्यान Peak Hour Passenger Load १००० प्रवाशांहून अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विमान पार्किंग हब उभारणी ही केवळ गरज नाही तर राज्याच्या विमानतळ विकास धोरणातील पुढचे पाऊल आहे, असे भुजबळ यांनी आपल्या पत्रात नमूद केले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!