नाशिकमधील ‘त्या’दोन नेत्यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा !
तक्रार मागे घेतल्याने राजकीय हालचालींना वेग
नाशिक, दि. १४ जुलै २०२५ –(Nashik BJP politics)नाशिक जिल्ह्यातील राजकारणात मोठी हालचाल पाहायला मिळाली असून, शिवसेना (ठाकरे गट) चे माजी उपनेते सुनील बागुल आणि माजी महानगरप्रमुख मामा राजवाडे यांचा भाजप प्रवेश लवकरच निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामागचं कारण म्हणजे, या दोघांविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यावर तक्रारदारानेच तक्रार मागे घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय भविष्यावरचे मळभ दूर झाले आहे.
याआधी, बागुल आणि राजवाडे यांच्या भाजप प्रवेशाचा निर्णय जवळपास ठरलेला असताना, संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या विरोधात दाखल गुन्ह्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. परिणामी, त्या दोघांचा पक्षप्रवेश रद्द करण्यात आला होता. मात्र आता परिस्थिती बदलली आहे.
🔹 बागुल यांची प्रतिक्रिया: “मारहाण झालेलीच नाही” (Nashik BJP politics)
सुनील बागुल यांनी स्पष्ट केलं की, “तक्रारदाराने स्वतः सांगितले आहे की आमच्याकडून कोणतीही मारहाण झालेली नाही. गुन्हे चुकीचे दाखल झाले होते. पक्षाने आमच्याकडून विचारपूसही केली नाही, हकालपट्टी हा शब्द चुकीचा आहे. आम्ही गिरीश महाजन यांना भेटायला गेलो होतो, कारण ते मंत्री आहेत. मात्र, आता आमच्या भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.”
🔹 मामा राजवाडे यांचे वक्तव्य: “पुढची दिशा लवकरच ठरवू”
मामा राजवाडे यांनी सांगितले, “गुन्हे राजकीय वैरातून दाखल झाले होते. आता तक्रार मागे घेतली गेली आहे. शिवसेनेत माझ्या जागेवर दुसऱ्याची नेमणूक झाल्याने, मी पुढचा निर्णय घेणार आहे. माझी दिशा लवकरच स्पष्ट करेन.”
🔹 राजकीय विश्लेषण:
या दोन्ही नेत्यांनी भाजप प्रवेशासाठी तयारी दाखवली असून, सध्या त्यांच्या पार्श्वभूमीतील कायदेशीर अडथळे दूर झालेले आहेत. त्यामुळे नाशिकमधील भाजपची ताकद आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे. शिवसेना (ठाकरे गट) ला मात्र हा मोठा धक्का मानला जात आहे.