Nashik:सिटीलिंक कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे,तीन दिवसांनंतर बस सेवा पुन्हा सुरळीत होणार
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या लढ्या ला मोठं यश !
नाशिक,२९ जुलै २०२४-मागील तीन दिवसांपासून सिटीलिंक बस सेवेच्या चालक कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला होता.त्यामुळे शहर बस सेवा मागील तीन दिवसांपासून ठप्प असल्यामुळे नाशिककरांची मोठ्या प्रमाणात वाहतुकीची अडचण निर्माण झाली होती. अखेर आज शहर बससेवेच्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढीचा निर्णय प्रशासनाने घेतला असून मनसे (MNS) कामगार सेनेने मनपाच्या सिटीलिंक बससेवा चालकांच्या वेतनवाढीसाठी पुकारलेले आंदोलन बंद कर्मचाऱ्यांनी मागे घेतले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या लढ्या ला मोठं यश मिळाले आहे.
शहरात महापालिका प्रशासनाने सिटीलिंक बससेवा ठेकेदारामार्फत सुरू करून यासाठी चालक व वाहक भरती करण्यात आली होती.मात्र,ठेकेदाराकडून वेतन वेळेत दिले जात नसल्याने तब्बल नऊ वेळा वाहकांनी संप पुकारल्याने बससेवा विस्कळीत झाली होती. मात्र, चालकांनी शनिवारी पंधरा हजारांच्या पगारवाढीसाठी आंदोलन पुकारत नागरिकांना वेठीस धरले होते.
नाशिकच्या सिटीलिंकच्या जवळपास ६०० कर्मचाऱ्यांनी काम बंद केल्याने तपोवन व नाशिकरोड डेपोतून दोन दिवस एकही बस रस्त्यावर धावू शकली नाही. त्यामुळे नाशिककरांचे गेल्या तीन दिवसांपासून प्रचंड हाल झाले होते. मनसे (MNS) कामगार सेनेने मनपाच्या सिटीलिंक बससेवा चालकांच्या वेतनवाढीसाठी पुकारलेला बंद रविवारीही कायम होता. मनसे कामगार संघटना व चालक मक्तेदार यांच्यात रविवारी उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. आज त्यांच्यात पुन्हा एकदा बैठक झाली.
पाच हजार रुपये पगारवाढ आणि प्रति एक किलोमीटर इन्सेंटिव्ह देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार आघाडीच्या संपात जवळपास ६०० कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे शहरातील बस सेवा ही तीन दिवसांपासून ठप्प झाली होती. अखेर आज प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर त्यांनी अखेर आपला संप मागे घेतला आहे. तर एलपीएलनुसार वार्षिक १५ ते २० सुट्ट्या देण्याचाही निर्णय शहर बससेवेचे अधिकारी आणि कंपनी व्यवस्थापनाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.या वेळी सिटी लिंक चे अधिकारी मिलिंद बंड व कंत्राटदार कंपनी व्यवस्थापन यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष अंकुश पवार व अँड.संदेश जगताप यांचे आभार व्यक्त केलेले आहे.मागण्या मान्य झाल्यानंतर बस चालकांनी आनंद उत्सव साजर केला.
संप मिटल्या मुळे आता शहर बस सेवा टप्प्याटप्याने सुरळीत होत आहे.यामुळे नाशिककरांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.