नाशिक,दि.११ ऑगस्ट २०२३ –नाशिक मधील अंबड लिंक रोडवर संजीवनगर परिसरातील शिवनेरी चौकात दहा ते बारा जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने दोन युवकांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला.मेराज खान (१८ वर्षे) असे हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे,तर इब्राईम शेख या तरुणावर नाशिक जिल्हा रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याने त्याचा मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा संशय आहे.
या बाबत मिळालेल्या माहिती नुसार नाशिकच्या अंबड लिंक रोडवर गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास संजीवनगर परिसरातील शिवनेरी चौकात दहा ते बारा जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने दोन युवकांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्यात मेराज खान या १८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. तर इब्राईम शेखवर जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा पोलिसांना प्राथमिक संशय असून पोलीस आयुक्त अंकुश शिंदेंसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर रात्री दाखल झाले होते.
संतप्त नातेवाईकांनी पोलिसांचा निषेध आणि जिल्हा रुग्णालयात उपचारात हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप करत मयत मेरजला रुग्णवाहिकेतून थेट पोलीस आयुक्त कार्यालयात घेऊन गेले होते. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी समजूत घालताच पुन्हा रुग्णवाहिका जिल्हा रुग्णालयाकडे वळवण्यात आली होती.दरम्यान या घटनेनंतर अंबड लिंक रोडसह जिल्हा रुग्णालयाच्या आवारात रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण पसरले होते. शीघ्र कृती दलासह चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.