
नाशिक, दि. २४ ऑक्टोबर २०२५ –Nashik Diwali Event दीपावलीच्या मंगलमय वातावरणात नाशिककरांसाठी एक सुरेल मेजवानी साकारली गेली. प्रभाग क्र. ३१ शिवसेना प्रणित इच्छापूर्ती बहुउद्देशीय मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित “दीपावली सांज पाडवा” या संगीत कार्यक्रमाने चेतना नगर परिसरात संगीत,आनंद आणि प्रकाशाचा अद्भुत संगम घडवून आणला.
‘सांज स्वरांची अमोल पाळेकर’ या शीर्षकाखाली झालेल्या या मैफिलीला नाशिकमधील असंख्य रसिक संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दीपावलीच्या पारंपरिक उत्साहात संगीताचा रंग भरत या कार्यक्रमाने नाशिकच्या सांस्कृतिक जीवनात एक आगळंवेगळं स्थान निर्माण केलं.
🔸 दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ(Nashik Diwali Event)
कार्यक्रमाची सुरुवात लकी ड्रॉ स्पर्धेचे आयोजक विनोद दळवी व वैशाली दळवी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली. त्यांनी उपस्थितांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर विनायक पांडे, दत्ता गायकवाड, सुभाष गायधनी, माधुरी ढेमसे, सुदाम कोंबडे, सुनील कोथमिरे, दादा मेढे, संदेश एकमोडे, राजू कदम, शारदा दोंदे, शोभा दोंदे, राजेश जाधव, आकाश कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
अतिथींचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष अभिजीत खरोटे यांनी केले.
🔸 गाण्यांनी उजळली सुरांची दीपावली
संगीत मैफिलीचा प्रारंभ पं. सुरेश वाडकर यांचे शिष्य ज्ञानेश्वर कासार यांनी “सुर निरागस हो” या लोकप्रिय गीताने केला. त्यानंतर त्यांनी पं. भीमसेन जोशी यांनी गायलेले “भाग्यदा लक्ष्मी बारम्मा” हे विभास रागातील भजन सादर करून भक्तीभावनेचा माहोल निर्माण केला.
प्रसिद्ध गायिका-अभिनेत्री प्रांजली बिरारी नेवासकर यांनी “सांज ये गोकुळी”, “हसता हुआ नूरानी चेहरा” आणि जोशपूर्ण “एकविरा आई” हे कोळी गीत सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले.
लोकसंगीत गायिका जागृती शृंगार हिने “लक्षदीप”, “दीपावली गीत” आणि “दुधात नाही पाणी” ही गवळण सादर करत ग्रामीण संस्कृतीचा रंग उधळला.
🔸 रसिकांनी घेतली वन्स मोरची हाक
झी युवा सिंगर चेतन लोखंडे यांनी “चल ग सखे पंढरीला” आणि “रामकुंडाच्या तीरावर महादेव” या भावगीतांनी रंगत आणली. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थित रसिकांनी “वन्स मोर” च्या हाका देत टाळ्यांचा वर्षाव केला.
एकापेक्षा एक सरस गाण्यांची मेजवानी “मळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी”, “मल्हार वाडी”, “लल्लाटी भंडार”, “डोंगर हिरवा गार” अशा सुरेल गीतांनी अधिकच खुलली. कार्यक्रमाचा समारोप “माऊली माऊली आमची ज्ञानेश्वर माऊली” या भावस्पर्शी भैरवीने झाला.

🔸 वाद्यवृंद आणि सहकाऱ्यांचे अप्रतिम योगदान
या संगीतमय सायंकाळीला साथ-संगत ‘मराठी सारेगमप फेम उत्सव नात्यांचा’ वाद्यवृंदाने दिली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विकास शर्मा, रोशन विचारे, संदिप खरोटे, निलेश महाले, राहूल हांडगे, प्रयास परदेशी, सुधिर महाले, मिलिंद देशपांडे, प्रकाश थोरात, विजयराव निनावे, अमोल मोरे, कौस्तुभ दळवी, महेश चव्हाण, अमोल राजपूत, रोहन नाहीरे, अंकुश किणी, यश नानकर, बन्सील पटेल, वेदांत लांडगे आदींनी विशेष मेहनत घेतली.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रमेश वरपे यांनी केले.
🔸 लकी ड्रॉमध्ये पैठणी आणि सोन्याची बक्षिसे
दीपावलीच्या या आनंद सोहळ्यात आकर्षक लकी ड्रॉ स्पर्धा घेण्यात आली. त्यात २०० महिला, पुरुष आणि बालगोपाळांना गिफ्ट हॅम्पर मिळाले.
तसेच २१ महिलांना पैठणी आणि पाच महिलांना एक ग्रॅम गोल्ड प्लेटेड नेकलेस अशी विशेष बक्षिसे आयोजक वैशाली दळवी आणि विनोद दळवी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
🔹 सांज पाडवा – नाशिकच्या संस्कृतीचा सुरेल सण
दीपावलीच्या शुभसंध्येला आयोजित ‘सांज पाडवा’ हा कार्यक्रम केवळ संगीताचा नव्हे, तर एकतेचा, संस्कृतीचा आणि आनंदाचा सण ठरला. पारंपरिक मूल्यांना आधुनिकतेची जोड देत नाशिकच्या या संगीत-संध्येने अनेकांच्या मनावर अमीट ठसा उमटवला.


