Nashik : जिल्ह्यातील वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या नियंत्रणासाठी लसीकरणावर भर द्यावा – छगन भुजबळ

0

नाशिक – तिसऱ्या लाटेतील कोरोना आजाराची लक्षणे सौम्य असली तरी त्याचा प्रसारणाचा वेग अधिक असल्यामुळे रूग्णसंख्या अधिक प्रमाणात वाढत आहे. या वाढणाऱ्या रूग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी लसीकरणावर अधिक भर देण्यात यावा, अशा सुचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ऑनलाईन कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, अपर जिल्हाधिकारी भीमराज दराडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कप‍िल आहेर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, उपजिल्हाधिकारी नितिन मुंडावरे, ज्योती कावरे, निलेश श्रींगी यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, तिसऱ्या लाटेतील लक्षणे सौम्य असल्याने विलगीकरणाचा कालावधी देखील कमी झालेला आहे. वाढणारी रूग्णसंख्या चिंताजनक असली तरी राज्यपातळीवर नाशिक जिल्ह्यात उपाययोजनांच्या अनुषंगाने यंत्रणांमार्फत चांगली कामगीरी होत आहे. त्याचप्रमाणे खुल्या जागेतील पर्यटन व धार्मिक स्थळांवर गर्दी होणार नाही व कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन होण्यासाठी पोलीस यंत्रणा व महानगरपालिका यांनी नियोजन करावे. तसेच कोरोना कालावधीत राज्य शासनामार्फत येणाऱ्या मार्गदर्शक सुचनांची सर्व यंत्रणांनी व्यवस्थितरीत्या अंमलबजावणी करावी, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचे अध्यक्ष सूरज मांढरे यांनी जिल्ह्यातील कोराना सद्यस्थितीची माहिती देतांना सांगितले, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विविध पातळीवर यंत्रणांना काम  करावे लागते, त्यासाठी जिल्ह्यात वॉर रूम तयार करण्यात आला आहे. या वॉर रूमच्या अंतर्गत कोरोनामुळे मयत व्यक्तींच्या कुटुंबीयांना ५० हजार रूपयांची मदत तसेच ऑक्सिजन, बेडस्, औषध पुरवठा, स्वयंसेवी संस्था यांचे व्यवस्थापन व रूग्णालयांमार्फत महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा नियमित लाभ देण्याबाबतची माहिती अशा विविध कामांचे नियंत्रण व नियोजन करण्यात येत आहे.

कोरानामुळे मयत झालेल्या रूग्णांच्या कुटुंबीयांनी आतापर्यंत १२ हजार ४४७ऑनलाईन अर्ज सादर केले असून त्यापैकी ५ हजार ३६६ अर्जांची छाननी करून ते अर्ज मंजूरीसाठी पाठविण्यात आले आहेत. व उर्वरीत अर्जांची छाननीची प्रक्रिया सुरू आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात ४८३ मेट्रीक टन ऑक्सिजन साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. जिल्ह्यातील वाढणारा  पॉझेटिव्हीटीचा दर पाहता तपासणीचे प्रमाण वाढविणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यावेळी सांगितले.

मालेगावमधील कमी येणाऱ्या रूग्णसंख्येचा अभ्यास करण्याकरीता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मदतीने सुत्र या संस्थेकडुन सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून त्यास मालेगावकरांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती देखील जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बैठकीत दिली.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.